अनाथ बालकांची माता – श्रीमती अंबुताई मेहेंदळे

प्रसूतिगृहसंचालिका, अनाथ बालकांची प्रेममयी माता व आदर्श समाजसेविका अशा अनेक रूपात सहजपणे वावरणार्‍या अंबुताई ह्या सांगलीत सर्वपरिचित आहेत. त्यांची जन्मभूमी जरी पुणे परिसरात असली तरी कर्मभूमी मात्र सांगली होती हे सांगलीवासियांचे महद्भाग्यच म्हटले पाहिजे!

अंबुताईंचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. लहानपणापासून त्या अत्यंत बुद्धिमान व अतिशय मायाळू स्वभावाच्या होत्या. दुर्दैवाने १५ व्या वर्षीच वैधव्य आल्याने संसाराची सर्व स्वप्नांवर पाणी पडले. तरीही खचून न जाता अंबुताईंनी हिंगणे येथील आश्रमात राहून चिकाटीने शिक्षण पूर्ण केले व तेथेच काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. त्यानंतर पुणे सेवासदन मधून नर्सिंग कोर्समध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. मुंबई, नाशिक इ. ठिकाणी काही काळ परिचारिका म्हणून नोकरी केल्याने त्यांचे अनुभवविश्व विशाल झाले.

पुण्याच्या सेवासदनचे प्रमुख डॉ. गोपाळ कृष्ण देवधर यांच्या कन्या डॉ. मनोरमाबाई थत्ते यांच्याबरोबर १९३५ साली अंबुताई सांगलीला आल्या आणि कायमच्या सांगलीच्याच झाल्या. थोडे दिवस डॉ. मनोरमाबाई थत्ते यांचेबरोबर काम केल्यानंतर लोकाग्रहास्तव अंबुताईंनी स्वतंत्रपणे प्रसूतिगृह चालविले. या काळात त्यांच्या आईची फार मोठी मदत त्यांना झाली. अंबुताईंच्या अत्यंत प्रेमळ स्वभावामुळे प्रसूतिगृहात येणार्‍या प्रत्येक स्त्रीला त्या आपल्या आईप्रमाणेच वाटत असत. लहान बालकांबद्दल तर त्यांना फारच लळा वाटे. यातच त्यांचा अनाथ अर्भकालय काढण्याच्या महान कार्याची नांदी दिसून येते.

हिंगणे येथील अण्णासाहेब कर्वे यांच्या तीन मानसकन्यांपैकी अंबुताई ह्या अग्रगण्य होत्या. १९४५ साली त्यांनी स्वतंत्रपणे अनाथ अर्भकालय स्थापन केले. म्हणून अण्णासाहेब कर्वे स्वत: अनाथ अर्भकालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. सुरूवातीस कोणतीही आर्थिक मदत नसताना सुद्धा अंबुताईंनी स्वखर्चाने संस्था चालविली. पुढे दादासाहेब वेलणकरांनी ५००० रू. देणगी दिली त्यामुळे संस्थेचे नाव वेलणकर अनाथ बालकाश्रम असे ठेवण्यात आले. आश्रमातील मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अंबुताई स्वत: जातीने लक्ष घालीत. मुलांचे दुखणे खुपणे बघत. मुलांना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक हुशारीही यावी म्हणून वाणसामान, भाजीपाला आणण्यासही मुलांना आपल्यासोबत नेत असत.

आश्रमाचा चोख कारभार पाहून तेरदेस या जर्मन संस्थेकडून आर्थिक मदत मिळू लागली. सुरूवातीस आश्रमातील मुलांची संख्या थोडी कमी होती. हळूहळू ती १००च्या वर गेली आहे. काही पालक संस्थेतील मुलांना स्वखुशीने दत्तकही घेतात. मुली मोठ्या झाल्यावर त्यांची योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाते. महाराष्ट्र शासनाने १९८५-८६ चा दलित मित्र पुरस्कार देऊन अंबुताईंचा सत्कार केला. स्वत: जळून अनेक अनाथांची जीवने प्रकाशित करणार्‍या अंबुताई मेहेंदळे यांना शतश: प्रणाम.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *