आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके

सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल.

आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. प्राचार्य सोनोपंत दांडेकर, श्री. म. माटे, के. ना. वाटवे, पु. ग. सहस्त्रबुध्दे इत्यादी दिग्गज बुध्दीवंतांकडून मिळालेली शिकवण आणि प्रा. नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, साने गुरुजी, एस्. एम्., नानासाहेब गोरे यांच्या सामाजिक विचारांनी भारून राष्ट्रदलाच्या सच्च्या सेविकेचे व्रत त्यांनी आयुष्यभर स्वत:हून स्वीकारले आहे. विवाहबंधनात न अडकता आईची सेवा, सामाजिक संस्थांचे कार्य आणि मुलांवर चांगले संस्कार हेच त्यांनी आपले सर्वस्व मानले.

साधेपणा, नीटनेटकेपणा, इंग्रजी वाचनाची प्रचंड आवड, भाषांतर तसेच संस्थांच्या कार्याची रेखीव टिपणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. पहाटे पाचला उठल्यापासून विविध इयत्तांतील मुलांच्या अभ्यासातील शंका सोडविणे, घरकाम, बागकाम, वाचन, गीतादर्शन, विज्ञानविषयक लेखांची टिपणे काढणे, वसंत बापट, शांता शेळके, सरोजिनी बाबर यांच्या कविता व श्री. म. माटे यांचे लेख वाचणे यात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. या वयाच्या लोकांचा सहसा देवाधर्मात वेळ जातो. पण सुमतीबाइंर्ना देवधर्म संस्कारांत कधीच रस वाटला नाही.

सूर्य हा एकच देव त्या मानतात व सर्वांना शक्ती व प्रकाश देणे हीच त्याची पूजा अशी त्यांची श्रध्दा आहे. समतेसाठी व न्यायासाठी आंदोलनात कार्यरत राहावे असे त्यांना वाटते.मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, सर्वांनी सामाजिक जाणीव ठेवून व आपली जबाबदारी ओळखून व्यवस्थितपणे काम करावे यावर त्यांचा कटाक्षअसतो.त्यांचे जीवन म्हणजे सांगलीतील एक ज्ञानदीपच आहे. त्यांचे कार्य असेच चालू राहो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवे कार्यकर्ते तयार होवोत ही शुभेच्छा

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *