सांगलीचा इतिहास – इ. स. १९०१ ते इ. स. १९४०

१९०१ श्रीमंत धुंडिराव तात्यासाहेब निधन पावले. याच साली सांगलीचे अँडमिनिस्ट्रेटर म्हणून प्रथमच ब्रिटीश अधिकारी सोडून अच्युत भास्कर देसाई यांना नेमण्यात आले. कारण दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब अज्ञान होते.

१९०२ सांगलीत वेदशाळेस ज्योतिष शास्त्राची जोड देण्यात आली.

१९०३ पोलिटिकल एजंट यानी दरबार भरवून सांगली संस्थानचे मालक श्रीमंत दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब झाले असल्याचे जाहीर केले.

१९०४ अडमिनिस्ट्रेटर देसाई यांनी संस्थानात लोकल बोर्ड व स्कूल बोर्ड निर्माण केले व पागा खर्च कमी केला. याच साली सांगली पांजरपोळ संस्थेची स्थापना झाली. कै. विष्णू रामचंद्र राजवाडे यांनी सांगलीत खाजगी मालकीचा पहिला चिंतामणी छापखाना सुरु केला.

१९०५ प्लेगची दुसरी साथ आली साली अँडमिनिस्ट्रेटर कॅप्टन बर्क यांची नेमणूक झाली. याच साली म्युनिसिपालिटीने स्टीम रोड रोलर खरेदी केला. हळद वायदे बाजार प्रारंभ.

१९०७ मिरज – सांगली रेल्वे फाटा सुरु झाला.

१९०८ श्री गजानन मिल्सची स्थापना.

१९१० दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब यांच्याकडे कॅप्टन बर्क यांनी संस्थानचा कारभार सोपविला व खर्च इंग्लंडला निघून गेले.

१९०५-१९१० अँडमिनिस्ट्रेटर क्रॅप्टन बर्क यांची कारकिर्द :- १) रयत सभा स्थापन केली. २) शहरात व संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. ३) १९०८ साली वखारभाग स्थापून व्यापारास उत्तेजन दिले. ४) कृष्णा नदीचे पाणी पंपाने नळात घेऊन टाकीत साठवून त्याचा नळाने घरोघरी पुरवठा केला. ५) संस्थानात व शहरात शाळा व कचेर्‍या यांच्या सुंदर इमारती बांधल्या. ६) सांगली शहराचे सौंदर्य वाढविले.

१९११ पेवाचे संडास बंद होऊन भंगी संडास सुरु झाले.

१९१३ वॉटर वर्क्सची स्थापना. याच साली प्लेगची चौथी साथ आली.

१९१४ ४ ते ६ ऑगस्ट कृष्णा नदीस महापूर आला. शहरात तीन दिवस पाणी होते . ४ डिसेंबर रोजी पहिली खाजगी माध्यमिक शाळा सुरु. (सिटी हायस्कूल)

१९१६ ५ ऑक्टोबरला सांगली बँकेची स्थापना.

१९१७ मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन कॉलेजची स्थापना व उच्च शिक्षणास प्रारंभ.

१९२० २० फेब्रुवारीस सांगलीत ज्योतिष संमेलन लोकमान्य टिळक यांची भेट, याच साली लाकूड वखार भाग (टिंबर एरिया ) व शिवाजी नगर वसाहतीस सुरवात. १२ नोव्हेंबरला महात्मा गांधींची सांगलीस भेट. व्यापारी मोफत वाचनालय कोनशिला गांधींनी बसविली.

१९२१ सांगलीत जैन महिला आश्रमाची स्थापना.

१९२२ दक्षिण संस्थांनी प्रजा परिषद चळवळ. सांगली संस्थान प्रजापरिषद पहिले अधिवेशन, अध्यक्ष मंगसुळी.

१९२२ महात्मा गांधी यांचे सांगलीस आगमन.

१९२५ मुंबई इलाक्याचे गर्व्हनर ना. सर फ्लेड्रिक राइस यांची सांगली शहरास भेट व नगरपालिकेतर्फे त्यांना मानपत्र समर्पण.

१९२७ कॉलर्‍याची मोठी साथ.

१९२८ सांगली नगरपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यास प्रारंभ.

१९२९ प्लेगची साथ.

१९२९ १८ नोव्हेंबर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाचे उद्घाटन, हस्ते व्हाईसराय लॉर्ड आयर्विन.

१९३० १७ मे राऊंड टेबल कॉन्फरन्सला चिंतामणराव पटवर्धन यांचे प्रयाण.

१९३० सांगली मेडिकल असोसिएशनची स्थापना

१९३१ बटलर कमिशन सांगलीत आले.

१९३२ प्लेगची साथ

१९३३ १) सांगली महिला परिषदेची स्थापना, २) महिला शिक्षण मंडळामार्फत मुलींच्या स्वतंत्र हायस्कूलची सुरवात, ३) कराचीचे कार्पोरेशनचे मेअर जमशेटजी नवरोसजी मेहता यांची नगरपालिकेस भेट.

१९३३ भाई परमानंद व डॉ मुंजे यांची सांगलीस भेट. डॉ. आंबेडकर यांची सांगलीस भेट

१९३४ कै. रामनारायण शेठ लड्डा यांनी सांगलीत बालाजी मिल सुरु केली.

१९३५ सांगलीत बाल क्रीडा उद्यानाची सुरुवात. १० मे सांगलीत ज्युबिली इलेक्ट्रिकल वर्क्सच्या कामाला प्रारंभ

१९३७ सांगलीस प्रेस अँक्ट लागू झाला याचवेळी ‘दक्षिण महाराष्ट्र’ व ‘विजय’ही साप्ताहिके निघू लागली. याचवेळी शहरात वीज सुरु झाली.

१९३८ दक्षिण संस्थान प्रजापरिषद सांगलीत भरली. या परिषदेस वल्लभभाई पटेल, कमलादेवी चट्टोपाध्याय; पट्टाभी सितारामय्या हजर होते.

१९३९ लोकनियुक्त अध्यक्ष असण्यासंबंधीची सांगली नगरपालिकेची घटना मंजूर झाली.

१९४० पंडित जवाहरलाल नेहरु यांची सांगलीस खाजगी कामास्तव भेट.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *