प्रा. परदेशी – एका नाट्यपर्वाची अखेर

संदर्भ – दै. सकाळ ६-११-२०११
सांगली – सांगलीची नाट्यपताका राज्यभर फडकवणारे प्रा. दिलीप गुलाबसिंग परदेशी (वय 64) यांचे पनवेल येथे काल निधन झाले. गेले काही वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर कळंबोली एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. 1980 पासून वीस वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्‍वात आपला ठसा उमटवला. नाटक, कादंबरी, काव्य, ललित लेखन अशा साहित्याच्या प्रातांत त्यांनी मुशाफिरी केली.

कलंदर व्यक्तिमत्त्वाचे प्रा. परदेशी विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्ग्युसन व बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी मराठी नाटकात स्वतःचीच वाट तयार केली. त्यांनी सुमारे तीसहून अधिक नाटक व एकांकिका लिहिल्या. राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सांगलीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीने त्यांची अनेक नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर करताना पुरस्कार पटकावले. त्यांच्या “काळोख देत हुंकार’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक वर्ष तर असे होते, की त्यावर्षी अंतिम फेरीत महाराष्ट्रातील पाच नाट्य संस्थांनी नाटक सादर केले. चंदू पारखी, रिमा लागू, सदाशिव आमरापूरकर या यशस्वी कलावंताना त्यांच्या नाटकांमधून ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या “हम नौजवान’ आणि “सच्चे का बोलबाला’ या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले. नाटककार वसंत कानेटकर यांनी जाहीर समारंभात “मी तुम्हाला उद्याचा वसंत कानेटकर देतो’ अशी शब्दात त्यांची ओळख करून दिली होती.

“गोष्ट तशी जुनीच’ या नाटकाने मराठी नाट्यक्षेत्रात समांतर नाटकाचा प्रवास सुरू केला. नाट्यलेखनात त्यांनी सतत प्रयोग केले. नाटक, म्हाराज म्येले, स्वप्न एका वाल्याचे, मातृवेणा, कहाणी, निष्पाप, अस्त, थेंब थेंब आभाळ, प्रेमी चतूर, प्रिया फितूर, अबोली, भैरवी, नको स्वातंत्र्य स्त्रीला, अशा नाटकांनी मोठा लौकिक मिळवला. लोलक, तुझ्या माझ्या चार ओळी, हे काव्यसंग्रह तसेच पतिहर्ता, पिया या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी “राणा प्रताप’ यांच्या चरित्रावर महाराणा ही दीर्घ कादंबरी लिहिली.

प्रा. परदेशींच्या नावे नवोदितांना पुरस्कार
“अबकड’ चे सचिव शरद मगदूम आणि नाट्यपरिषदेच्या चिंतामणीनगर शाखेचे कार्याध्यक्ष शफी नायकवडी म्हणाले, “” संस्थेच्या वतीने प्रा. परदेशी यांच्या नावे नवोदित लेखकासाठी आम्ही दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांची स्मृती जतन करू. अबकड संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने यशस्वी वाटचाल केली. “आई’ प्रिय लेखक म्हणून त्यांची ओळख होती. सलग नऊ वर्षे त्यांनी “अबकड’ची धुरा वाहिली. संस्थेने त्यांचे “नको स्वातंत्र्य स्त्रीला’ आणि “अस्त’ ही दोन नाटके सादर केली. त्यांच्या फिनिक्‍स एकांकिकेमुळे राज्यभर संस्थेचे नाव झाले.

समांतर नाटक चळवळीचा अग्रणी
सदस्य अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीचे विनायक केळकर म्हणाले, “”सर्वमान्य नाटककार म्हणून प्रा. परदेशी यांनी महाराष्ट्रात लौकिक मिळवला. विदर्भात त्यांच्या नाटकांचा मोठा रसिकवर्ग होता. ते चांगले कवी होते, म्हणूनच नाटककार होऊ शकले. प्रयोगशीलता, व्यक्तीरेखेतील नेमकेपणा आणि प्रभावी संवाद लेखन ही त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये होती. शेक्‍सपियरचे “ज्युलीयस सिझर’ नाटक त्यांना मराठीत वेगळ्या ढंगात आणायचे होते. समांतर नाटक चळवळीचे ते अग्रणी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन स्मृती जपल्या जातील.”

प्रा. परदेशी एक नाट्यपर्व
ज्येष्ठ नाट्यकलावंत अरुण नाईक म्हणाले, ‘प्रा. दिलीप परदेशी नावाचे सांगलीच्या नाट्यविश्‍वात एक पर्व होते. राज्य नाट्यस्पर्धेच्या चळवळीत त्यांनी कोल्हापूर, बेळगावची मक्तेदारी मोडून काढली. प्रभावी प्रयोगशील नाटककार म्हणून महाराष्ट्र त्यांना लक्षात ठेवेल.”

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *