मिरज येथे आदिलशहाच्या काळातील हैदरखान नावाच्या सरदाराने ७५० वर्षापूर्वी १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल अशी विहीर बांधली आहे.
मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत आहे. मिरज रेल्वेस्थानकात असलेल्या हैदरखान विहिरीचा ताबा १८८७ मध्ये रेल्वेकडे आला.
त्यानंतर सुमारे सव्वाशे वर्षे रेल्वेचे डबे धुणे, स्थानकाची स्वच्छता व रेल्वे गाड्यात पाणी भरण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता. रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने दहा वर्षांपूर्वी रेल्वेने मिरज स्थानक व कर्मचारी वसाहतीसाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू केली. त्यानंतर या विहिरीचे महत्त्व कमी झाले. २०१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत हैदरखान विहिरीत कृष्णा नदीच्या पाण्याचा साठा करून मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. जलपरी एक्स्प्रेसने सलग चार महिने दररोज लाखो लिटर पाणी नेऊन लातूरकरांची तहान भागवली होती.
रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या राज्यातील पहिल्याच यशस्वी प्रयोगामुळे हैदरखान विहिरीला मोठी प्रसिद्धी मिळाली. लातूरची तहान भागवणारी ही विहीर आता वापरात नाही. विहिरीत परिसरातील लोक कचरा टाकत आहेत. काठावरील झाडांची पाने पाण्यात पडत आहेत. विहिरीत शेवाळ साचले आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने कठडे पडण्याच्या स्थितीत आहेत. रेल्वेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू केल्याने हैदरखान विहिरीतील मुबलक पाण्याचा वापर थांबल्याने विहिरीचे डबके झाले आहे. लातूरला पाणीपुरवठ्यासाठी विहिरीत बसविण्यात आलेल्या मोटारी व जलवाहिन्या काढण्यात आल्या आहेत.
या विहिरीची स्वच्छता, देखभालीकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे. विहिरीचे पुनरुज्जीवन न झाल्यास ती इतिहासजमा होणार आहे.आदिलशहाच्या सरदाराने बांधली विहीरविहिरीला ऐतिहासिक वारसा आहे. १५८३ मध्ये आदिलशहाचा सरदार हैदरखान याने बांधलेल्या या मोठ्या विहिरीतून त्याकाळी परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत होता. संस्थान काळातही सिंचनासाठी वापर होत असल्याची नोंद आहे. तिचे पाणी मिरज शहरात मीरासाहेब दर्ग्यात दगडी कारंजासाठी नेण्यात आले होते. त्यासाठी हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीत हत्ती बांधण्यासाठी तयार केलेले दगडी अंकुश आजही सुस्थितीत आहेत.”