रुग्णसेवेमध्ये निरंतर रमलेले – हरिपूरचे परांजपे घराणे

सांगलीनजीकच, कृष्णा-वारणा संगमाच्या अन्‌ डोंगरांच्या कुशीत वसलेले एक सुंदर मोहमयी बालग्राम- हरिपूर, संगमेश्वराच्या आस्तित्वानं पुनीत झालेलं हरिपूर, साहित्य-कला-नाट्य-संगीत अशा विविध क्षेत्रातील समर्थ परंपरा लाभलेलं हे गाव. याच हरिपूरमध्ये वैद्यकशास्त्राची अन्‌ रुग्णसेवेची थोर परंपरा सुरू झाली आणि गावाची कीर्ती पार अटकेपार पोहोचली ती इथल्या ‘परांजपे ’घराण्यामुळे !

भिषग्‌रत्न वैद्य गणेश पांडुरंग परांजपे यांनी २ जानेवारी १८९२ साली जन्म घेतला तीच मुळी या दीन -पीडितांची सेवा करण्यासाठी. गुरुकुल परंपरेने आयुर्वेद व संस्कृतचा गाढा अभ्यास संपादन केल्यानंतर १९१९ साली, जेंव्हा गोरगरिबांना साधेसुधे औषधोपचार मिळणेही अवघड होते, तेंव्हा त्या रंजल्या-गांजल्यांना औषध मिळून आरोग्यप्राप्ती व्हावी या सुसंकल्पनेतून ‘मोफत कुमार औषधालयाचा’ जन्म झाला. स्वत:ची पदरमोड करून समाजातल्या सर्व स्तरातील बालकांना मोफत औषधोपचार करण्याचे हे थोर कार्य एक तप सुरु राहिले.आणि मग यानंतर १९३३ साली कै. श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, इचलकरंजीकर यांच्या हस्ते ‘ कुमार औषधालय’ ही संस्था अधिकृत रीत्या सुरू झाली. रोज १००-१५० रुग्णांवर वैद्यबुवा उपचार करीत. गरीब रुग्णांना स्वत:च्या घरचे अन्न खाऊ-पिऊ घालीत. विविध गावात बालोपचार शिबिरे भरविली जायची. सांगली, सांगलवाडी, कर्नाळ, हरिपूर येथील दलितवस्तीमधून परांजपेशास्त्री स्वत: जाऊन फिरता दवाखानाही चालवीत असत. ज्वर, उदर, यकृतवाढ, कावीळ, फुफ्फुसरोग, गोवर, देवी, डांग्या खोकला, न्युमोनिया इ. बालरोगांबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘बालस्वास्थ्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित केले जात असत. कुमार औषधालयाच्या माध्यामातून ‘आरोग्य-संवर्धकमालेअंतर्गत ’ वैद्य परांजपे यांनी ‘ताक व आरोग्य’, ‘ब्रह्मचर्य’, ‘सायकलचे परिणाम’, ‘उष:पान-अमृतपान’, ‘साष्टांग नमस्कार’, बालकांची जोपासना’, हृद्‍रोग इ. पुस्तके लिहून प्रकाशित केली व अत्यल्प मूल्यामध्ये उपलब्ध करून दिली.

डॉ. मुंजे, प्रा. शं. वा. दांडेकर, स्वामी शिवानंद, डॉ. देवधर एम. डी (मुंबई), माणिकराव बडोदे, पंडित श्री. दा. सातवळेकर, वकील श्री. दा. भोपटकर, डॉ. हेडगेवार , श्री. ना. ह. आपटे, स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक इ.. महत्तम व्यक्तींनी संस्थाभेट व देणग्या दिल्या. श्री. न. चि. केळकर , श्री. धोंडो केशव कर्वे, डॉ. कोकटनूर, श्रीमंत बाळसाहेब प्रतिनिधि, गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे या सर्वांनी कुमार औषधालयाचा यथोचित गौरव केलेला आहे. शंकराचार्य व डॉ. कूर्तकोटी यांनी वैद्यबुवांना ‘ भिषग्‌रत्न ’ ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली.

१९१३ पासून हरिपूर येथे मोफत वाचनालयाची शिळा रोवली ती या धन्वंतरीनेच !. . . वैद्यकाबरोबरच साहित्याचीही रुची असलेले परांजपे शास्त्री . . . यांनी त्याकाळी हरिपूरसारख्या लहान गावातही ‘वसंत व्याख्यानमाला’ सुरू केली होती. या वाच नालयास लोकमान्य टिळक , लोकनायक बापूजी अणे, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार इ. मान्यवरांनी भेटी दिल्या. गांधी हत्येदरम्यान झालेल्या जाळपोळीत सारे घरदार जळाले.असूनही बालकांना विनामूल्य उपचार करण्याचे कार्य अविरत चालूच होते. सांगलीच्या आयुर्वेद महाविद्यालयात परांजपे वैद्य प्राध्यापक म्हणूनही काम पहात असत.

भिषग्‍वर्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गंगाधर गणेश परांजपे हे सुद्धा १९४४ साली जे. जे. मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एम्‌.‍ बी. बी. एस्‌. ची परीक्षा देऊन पदवी संपादन करून आपल्या पित्याच्या थोर सेवाकार्यात रुजू झाले. तेही आपल्या वडिलांचाच वसा हाती घेऊन त्यांच्यासह शिबिरे, मोफत रुग्णसेवायातून कार्यरत राहिले. भिषग्‌रत्न परांजपे यांच्या पश्चात कुमार औषधालयाची धुरा सांभाळत हरिपूर व सांगली येथे रुग्णसेवा करीत मोलाचे दान समाजाच्या पदरात टाकण्याचे सत्कार्य वयाच्या ७५ वर्षांपर्यंत अखंड दिवस-रात्र केले ते डॉ. गंगाधर उर्फ जी. जी. परांजपे यांनी . . . आणि हे दोघेही मानवतेची सेवा करणारे तपस्वी योगी ठरले.

बालकांना रोगमुक्त करून भारताची समर्थ भावीपिढी बळकट बनविण्याचे हे राष्ट्रकार्य वैद्य परांजप्र यांच्या तिसर्‍या पिढीनेही पुढे सुरूच ठेवले. अशी ही परंपरा आजच्या जगात विरळाच असते. वैद्यराजांचे ज्येष्ठ नातू डॉ. चंद्रशेखर परांजपे यांनी आजतागायत कुमार औषधालयाचा सर्व कार्यभार समर्थपणे पेलेला आहे. आजोबांच्याच पावलावर पाऊल टाकून आयुर्वेदासह आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतलेले डॉ. चंद्रशेखर परांजपे यांनी अविरत रुग्ण्सेवा करीत असतानाच ‘रेकी मास्टर’ ही पदवी सुद्धा संपादन केली. तसेच ‘रेकी भाग – १ ’, ‘रेकी भाग – २ ’, ‘लसीकरण – बाळाची कवच कुंडले’ ही पुस्तके समाजाच्या सेवेत अर्पण केली आहेत.

वैद्यराजांचे दोन नंबरचे नातू कै. डॉ. प्रमोद परांजपे यांनी ‘जनरल सर्जरी’ या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण अहमदाबाद येथे घेऊन सांगली ग्रामी २० वर्षे रुग्ण्सेवा समर्पित केली. गोरगरिबांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. हर्निया, पित्ताशय, प्लिहारोग यावर सहज व यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा होता. रुग्णाविषयी सहृदयता, कळकळ त्यांच्या उपचारातून व वर्तनातून उमटत असे. सर्वस्व झोकून देऊन रुग्णसेवेसाठी झिजणारा ासा हा सर्जन आजच्या काळात दुर्मिळच. रुग्णसेवेची पताका उंच ठेवीतच त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने देहावसान झाले. परंतु त्यांनी केलेले रुग्णकार्य सांगलीच्या पंचक्रोशीत अजूनही दुमदुमत आहे. आणि पुढेही राहील.

वैद्यबुवांची नात सौ. जिज्ञासा परांजपे-दुदगीकर यांनीही आयुर्वेदाच्या पदवीसह योग व मसाज या विषयाअतील पदव्युत्तर पदविका संपादन करून वैद्यराजांच्या हरिपूर येथील पवित्र वास्तूमध्ये १० वर्षे अखंड रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. त्या गरजू व गरिबांना मोफत उपचार , विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन हरिपूर व परिसरात करीत असतात. रोटरी या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून ‘आयुर्वेद व भारतीय संस्कृती’ या विषयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या अमेरिका या अतिप्रगत देशासही भेट देऊन आल्या. तेथे त्यांनी अनेक परिसंवादांमध्ये भाग घेतला. रोटरीच्या माध्यमातून विविध रोगंविषयी जागरुकता निर्मिती, तपासणी- उपचार शिबिरांचे आयोजन इ. समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत.

वैद्य परांजप्यांची चौथी पिढी सुद्धा लवकरच या क्षेत्रात येऊ पहात आहे. कै. डॉ. प्रमोद परांजपे यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि. यश हे सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. शिक्षण पूर्ण करून नक्कीच ते या रुग्ण्सेवेत रुजू होतील. यात शंका नाही. केवळ परोपकार बुद्धीने भारताच्या समाजातील अब्जावधी बालकांना दीर्घायु करण्याच्या दृष्टीने चालविलेले हे कार्य सांगलीला भूषणावहच म्हणायला हवे.

वौद्यराज परांजपे याच्या या घराण्यामध्ये साहित्यसेवा करणारे त्यांचे चिरंजीव श्री अशोकजी परांजपे हे सर्वांना परिचित आहेतच. कैवल्याच्या चांदण्याला, वाट इथे स्वप्नातील, नाविका रे . . . या गाण्यांचे गीतकार तसेच ‘संगीतरत्न’, ‘गोरा कुंभार’, ‘मातीचे स्वप्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा ’ या नाटकांचे लेखक, नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. इंडियन नॅशनल थिएटरचे मराठी लोककला विभागाचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे. लोककलांचा गाढा अभ्यास त्यांना अनेक लोककलकारांसह जपान, इंग्लंड, आअयर्लंड इ. देशांना घेऊन गेला होता.

साहित्य व वैद्यकाची इतकी पिढ्यान्‌‍ ‍ पिढ्या परंपरा लाभणारी अशी घराणी फारच दुर्मिळ असतात. आणि अशा या दुर्मिळ घराण्याने . . . परांजपे घराण्याने इतिहासात आपले असे एक सुवर्णरेखित पानच उमटविलेले आहे असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »