
१८०१ मध्ये मूळ मिरज जहागिरीतून फुटून आप्पासाहेबांनी आपलं वेगळं राज्य बनविलं व त्यांनी सांगली राजधानी केली. सांगली राजधानीची स्थापना केल्यानंतर १८०४ मध्ये गणेशदुर्ग या भुईकोट किल्लयाचे बांधकाम त्यांनी करुन घेतले. सांगलीच्या आराध्य देवतेचे श्री गणेश मंदिराचे बांधकाम १८११ साली सुरु झाले. श्रीगणपतीपंचायतन म्हणून हे ओळखले जाते. या मंदिरात श्रीगणेश, शिव, सूर्य, चिंतामणेश्वर, लक्ष्मी – नारायण अशी वेगवेगळी पाच मंदिरे आहेत. सन १८४१ रोजी या मंदिराचे काम पूर्ण झाले.
आप्पासाहेब हे मानी पुरुष होते त्यामुळे त्यांनी बिटिशांना नोकरी करण्यास नकार दिला. त्यांनी इंग्रजांशी तह केला त्यामुळे हुबळी परिसर द्यावा लागला. सांगलीच्या प्रगतीसाठी पेठा वसवल्या. १८२१ मध्ये त्यांनी सांगलीत शिळाप्रेस छापखान्याची स्थापना व टांकसाळ सुरु केली. त्यांनी विष्णुदास भावे यांना `सीतास्वयंवर\’ हे नाटक लिहायला लावले व ते मराठी रंगभूमीवर पहिले मराठी नाटक म्हणून सादर केले.