माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.
१. शिशुविकास मंडळ – जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर या नावाने एक प्राथमिक शाळाही काढण्यात आलेली आहे.
डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरातर्फे अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेले आहेत. –
आरोग्य मंदीर – खरकटवाडी येथे डॉ. देशपांडे यांचा दवाखाना असून तेथे गोरगरिबांना मदत देण्यात येते.
अभ्यास मंदीर – गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन करणे व पुस्तक पेढी चालविणे. या योजनांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
उद्योग मंदीर – लहान वयात स्वावलंबनाची सवय लागावी, स्वकष्टार्जित पैसा मिळविण्याचा आनंद लाभावा, कमवा व शिका योजना राबविता यावी हा या योजनेचा उद्देश.
संस्कार मंदीर – प्रत्येक रविवारी गीतापाठ, संस्कृत श्लोकपाठ याद्वारे किशोर किशोरींचा संस्कार वर्ग घेतला जातो.तसेच खरकटवाडी येथेही संस्कार केंद्र चालविले जाते.
कला मंदीर – होतकरू मुलांच्या चित्रकला, नाट्यकला गायन यासारख्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना जागा, साधने, साहित्य आणि मार्गदर्शन केले जाते.
क्रीडा मंदीर – विविध खेळांसाठी जागा व साधने उपलब्ध करून देणे, स्पर्धा घेणे.
विज्ञान मंदीर – विज्ञानाच्या या युगात मुलामुलींच्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेची व खटपटघराची योजना आहे.
बालमंदीरांसाठी खेळणी व साधनांची बँक – सर्व बालवाड्यांना विविध प्रकारच्या खेळण्यांचा लाभ मिळावा हा यामागील उद्देश आहे.
स्मृति मंदीर – कै. डॉ. जी.ए. देशपांडे यांच्या विविध स्वरूपातील दुर्मिळ स्मृतींचे जतन करणे.
एक नाविन्यपूर्ण `बालभवन` उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीमती लता व अरूणा देशपांडे या दोघीही अहोरात्र झटत आहेत.