मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य लेख क्लाऊड कॉम्प्युटिंग
क्लाऊड कॉम्प्युटिंग पीडीएफ प्रिंट ई-मेल
क्लाऊड म्हणजे ढग. ढगातून पाऊस पडतो. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. याप्रमाणे कॉम्प्युटरचे सर्व काम दूरवर कोठेतरी होऊन आपल्याकडे पोहोचविण्याची व्यवस्था म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग. रेडिओसाठी आपल्याकडे आकाशवाणी हा शब्द वापरला जातो. पुराण काळातील कथांमध्ये आकाशवाणी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातून आवाज ऎकू यायचा. त्याच पद्धतीने ‘मेघसेवा’ वा ‘आभाळमाया’ यासारखे नाव याला रूढ होऊ शकेल. स्वर्गामध्ये देवता राहतात व आपल्या सर्व संकटांचे त्या निवारण करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीलोकातील सर्व कार्य त्यांच्या इच्छेनुसार चालू असते असे आपण मानतो. त्याच धर्तीचे पण व्यवसायक्षेत्रातील काम आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे भविष्यात होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे.बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यकाळात संगणक वापराच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे.

कॉम्प्युटर, नेटवर्कींग व सॉफ्टवेअर व त्या अनुषंगिक विद्युत उपकरणे व इन्व्हर्टर यांच्या खरेदीसाठी लागणार्‍या खर्चात बचत होणार आहे. तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचा खर्चही वाचणार आहे. अर्थात या क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांना ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेटच्या क्रांतीमुळे माहिती व त्याचे संकलन व उपयोग यासाठी वेबसाईटचा वापर सुरू झाला. सर्व माहिती व सॉफ्टवेअर दूरवरच्या सर्व्हर कॉम्प्युटरवर ठेऊन आवश्यक ते रिपोर्ट व उपयुक्त माहिती वेबसाईटवरून मिळविणे सोयीचे झाले. डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचे ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पत्रव्यवहारासाठी आपण इमेल सेवा वापरत आहोतच. त्यातील सर्व माहिती दूरस्थ सर्व्हर कॉम्प्युटरवर असायची त्यासाठी आता क्लाऊड सेवा वापरली जाते. फोटो व चित्रांसाठी पिकासा व फ्लिकर, संवादासाठी फेसबुक, आर्कुट, स्काईप, याहू मेसेंजर, गुगल टॉक इत्यादी सुविधा इंटरनेटवर मिळू शकतात. डॉक्युमेंटस ( लेख, पत्रे इत्यादी मजकूर), स्प्रेडशीट वा एक्सेल शीट ( तक्ते वा कोष्टके) यासारखी अ‍ॅप्लीकेशन आता गुगलवर उपलब्ध आहेतच. रेल्वे रिझर्व्हेशन, इनकमटॅक्स, ऑनलाईन शॉपिंग याची आपल्याला माहिती आहेच. मोठ्या बँकांचे कार्य आता पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. तरी अजून डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचा वापर अनेक लहान मोठ्या संस्थांमध्ये चालू आहे त्यांना लवकरच असा बदल करावा लागणार आहे.

ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट सर्व्हीस देणार्‍या संस्थामध्ये आपले संगणक ठेवून वा त्यांचे संगणक वापरून वेबसाईटच्या माध्यमातून हे कार्य केले जाते. एखादा संगणक बंद पडला तर माहिती वा सॉफ्टवेअर यांची हानी होऊ नये म्हणून अशा संस्थांमध्ये ठराविक काळाने सर्व माहितीचा बॅक अप घेण्याची सोय केलेली असते. काही वेळेच दोन किंवा जास्त संगणकावर ह्या माहितीचा प्रती ठेवल्या जातात. मात्र संगणक व सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन एकत्रितपणे केले जाते. ही माहिती वापरणार्‍यांच्या संख्येत अचानक वाढ झाली तर सर्व्हरवर या ताण पडून (बँण्डविड्थ मर्यादा) अशी सेवा खंडीत होऊ शकते.

आता क्लाऊड पद्धतीमध्ये संगणकाचा विभाग पूर्णपणे वेगळा करून अनेक संगणकांचा समूह अशा माहिती व सॉफ्टवेअरसाठी वापरला जातो.व त्याच्या व्यवस्थापनाचे कार्य हार्डवेअर तज्ञ करतात. सर्व माहिती विखुरलेल्या व अनेक प्रतींमध्ये व विखुरलेल्या स्वरुपात ठेवल्याने कोणताही संगणक बंद पडला तरी माहितीचे नुकसान होत नाही व सॉफ्टवेअर सेवा अबाधित राहते. माहितीचा एकूण साठा व सॉफ्टवेअरसाठी लागणार्‍या हार्डवेअरच्या सुविधा यांचा विचार करून आवश्यक तेवढी मेमरी व सुविधा आपोआप मिळू शकतील अशी योजना केलेली असते.

क्लाऊड मेमरी स्टोअरेज - सर्व माहिती (म्हणजे लेख चित्रे, ध्वनीफिती, चित्रपट इत्यादी) इंटरनेटद्वारे क्लाऊडमध्ये साठविण्यासाठी (ऑनलाईन मेमरी स्टोअरेजसाठी) आता ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, सीएक्स डॉट कॉम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. ठराविक मर्यादेपर्यंत वापरण्यासाठी त्या मोफत उपलब्ध होऊ शकतात.

विंडोज, लिनक्स यासारखी वेगवेगळी अ‍ॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअर आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देण्याचे कार्य दुसर्‍या स्वतंत्र विभागात केले जाते. सिस्टिम सॉफ्टवेअर तज्ज्ञ त्याची देखभाल करतात. त्यामुळे त्यातील नवीन सुधारणांचा व बदलांचा शोध घेऊन ती अद्ययावत ठेवणे व त्यानुसार प्रत्यक्ष सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आवश्यक ते बदल करणे सहज शक्य होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे इन्फ्रास्टृक्चर ( संगणक व अनुषंगिक इक्विपमेंट) सेवा, क्लाऊड मेमरी स्टोअरेज, प्लॅटफॉर्म ( लिनक्स, विंडोज, इत्यादी)सेवा, ( डाटाबेस, एम.एस ऑफिस, फ्होटोशॉप, जावा, पीएचपी, एसपी डॉट नेट, फ्लॅश, फ्लेक्स यासारखे अ‍ॅप्लिके्शन्स व लॅग्वेजेस व त्याचा उपयोग करून प्रत्यक्ष व्यवसायासाठी बनविलेले सॉफ्टवेअर यांची सेवा अशा सर्व सेवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग याशिवाय या सर्व सेवा भाडेतत्वावर असल्याने व्यावसायिकास वा वापरकर्त्या संस्थेस गरजेप्रमाणे हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये बदल वा वाढ करता येते.

या सेवांचे भाडेही प्रत्यक्ष वापरावर अवलंबून असल्याने सुट्टीच्या दिवसात वा रात्री ही सेवा लागत नसल्यास बंद करून खर्चात बचत करता येते

या सर्व सोयींमुळे व्यावसायिक व उद्योजक संस्थांना आपल्या संगणक व्यवस्थेची वा त्याच्या नूतनीकरणाची काळजी करावी लागणार नाही व तो वेळ, पैसा व मनुष्यबळ त्यांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरता येईल. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे ही सेवा आपल्याला संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल अशा कोणत्याही उपकरणाद्वारे कोठूनही व केव्हाही वापरता येईल. आजकाल बहुतेक संस्थां वा उद्योगाच्या अनेक ठिकाणी शाखा असतात. त्यातील कर्मचारी वा अधिकारी कामानिमित्त परगावी असू शकतात. अशा वेळी या पद्धतीचा फार उपयोग होईल. ऑफिसमध्ये न जाता घरात बसून वा अन्य ठिकाणाहून काम करण्याची सोय यामुळे उपलब्ध होईल.