मुख्य विभाग

हरितक्रांती प्रतिष्ठान, मिरज. पीडीएफ प्रिंट ई-मेल

हरितक्रांती प्रतिष्ठान, मिरज.
बहुउद्देशीय क्षेत्रात काम करणारी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी सेवाभावी संस्था.

यशोगाथा कोहिनूर बंगला, दत्त पेट्रोल पंपासमोर,
कृपामयी भाग, वानलेसवाडी,
ता. मिरज, जि. सांगली. ४१६४१६.
दूरध्वनी: ०२३३ / २२१२५१० फ़ॅक्स: २२१२०७०, मोबाईल: ९४२२०४०६३०.
E-mail : हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठी जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

प्रस्तावना-
पाऊल वाटेची हरितक्रांती प्रतिष्ठान, मिरज, जि. सांगली एका तपाहून अधिक काळ शेती, माती, पाणी, माणसं, पर्यावरण आणि म. गांधींचा अमोल संदेश ‘चला खेड्याकडे’ या तत्वाने तन-मनानं कार्यरत राहणारी एक संस्था म्हणून कार्यरत आहे आणि संस्थेच्या कार्याचा परिचय सर्वदूर आहे. आमच्या मातीत आमची माणसं जगली पाहिजेत या प्रयत्नवादानं आमची- आमच्या संस्थेची वाटचाल चालू आहे.

इतिहासाची पानं चाळताना, चला खेड्याकडे’ या ऐवजी चला शहराकडे, करा बकाल वस्ती, वाढवा बेकारी, प्रदुषणाचा उच्चांक गाठा, रिकाम्या हाताना काम नाही म्हणून करा गुंडगिरी, अशा एका स्फ़ोटक अवस्थेत शहर विस्थापित होत आहेत. खेड्यातल्या घरांना कुलूप ठोकून, आख्खी गावच्या गांव शहराकडे प्रस्थान करीत आहेत. सदर गंभीर परिस्थितीचा अभ्यास करणेसाठी तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी सी.एच. हनमंतय्या यांचे अध्यक्षतेखाली एक अभ्यास कमिटी नियुक्त केली व त्यांनी शिफ़ारस केलेला सर्वच अहवाल मान्य करून, अंमलबजावणी करणेसाठी अडसर ठरणाऱ्या घटनेत सुधारणा करुन थेट पंचायत राज्य व्यवस्थेला अधिकार बहाल केले. या साऱ्या परिस्थितीचा अभ्यास आमच्या संस्थेने गांभिर्याने विचार केला आणि स्वत:ची अशी एक हिरवळीकडे जाणारी पाऊलवाट मिळविण्याचा आम्ही आमचा प्रयत्न सुरु केला,

खेड्याला आकार देणारे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, पोपटराव पवार, विजय बोराडे, मोहन धारिया, प्रा. पी.बी. पाटील, यांच्या कामाची प्रेरणा घेऊन हरितक्रांतीची ज्योत घेऊन केंद्र पुरस्कृत अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमात सन १९९५ ते २००० मध्ये तीन पाणलोट यशस्विरित्या पूर्ण केले. व याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये १० पाणलोटात संस्था काम करीत आहे. संस्था केवळ एवढच काम करीत नाही. महिला सबलीकरण व सक्षमीकरण या क्षेत्रात देखील सहभाग घेऊन ग्रामीण व शहरी भागात जवळपास ६०० महिला बचत गट तयार करुन महिलांना स्वयंरोजगारी उद्योगधंदे निर्माण करुन दिले व त्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. तसेच जागतिक बॅंकेच्या मदतीने सुरु असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पात सहाय्यकारी संस्था म्हणून वाळवा तालुक्यातील कोरेगांव, बागणी व कुंडलवाडी या गांवात उल्लेखनिय कार्य केले आहे. संस्थेने निवडलेल्या कोरेगांव गांवास संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ्ता अभियान अंतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचा संस्थेस अभिमान वाटतो.

शिक्षणाची आस- कास धरण्याखेरीज उद्याची पिढी घडणार नाही या भावनेने फ़िरत्या भटक्या कुटूंबियांच्या मुलां- मुलींसाठी महात्मा फ़ुले शिक्षण हमी योजने अंतर्गत वस्तीशाळा चालविली. तर सामाजिक आरोग्य यज्ञाचा एक नंदादिप संस्थेने निरंतर तेवत ठेवला असून एड्स सारख्या रोगावर उपचार, सामुपदेश, असे उपक्रम सदैव संस्था पार पाडत आहे. याच बरोबर कृषि विस्तार कार्यक्रम, सुक्ष्म नियोजन प्रक्रिया शिबीर, आरोग्य शिबीरे, पर्यावरण, जनजागरण, निरंतर शिक्षण, महिला विकासासाठी स्वयंसहाय्यता, महिला बचत गट, त्यांचे प्रशिक्षण, उत्पादन, विक्री व्यवस्था, ग्रामीण आणि शहरी भागातील अशा विविध प्रकारच्या कार्यात संस्था कार्यरत आहे व अशी सेवाभावी संस्थांचे संघटन तयार करुन सांगली एन. जी. ओ. फ़ोरम या संस्थेची नोंदणी करुन सदर संस्थेमध्ये आमच्या संस्थेस प्रमुखता प्राप्त झाली आहे. संस्थेने आपल्या कार्याची एक पताका सर्वसामान्य माणसांच्या प्रत्यक्ष सहभागाने फ़डकवत ठेवली आहे. केवळ जनसामर्थ्य, जनहित, जनसाथ या भावनेने प्रेरित होऊन जनसेवेचा हा स्त्रोत अखंड वाहत ठेवण्याची प्रतिज्ञा करीत एक एक पाऊल पुढे टाकत या पाऊलवाटेवर एक हिरवळ, एक हरितक्रांती निर्माण व्हावी याच भावनेने आमच्या संस्थेची वाटचाल- वहिवाट- पाऊलवाट!