मुख्य विभाग

नाट्यसंमेलन सविस्तर कार्यक्रम पीडीएफ प्रिंट ई-मेल

संदर्भ- दै. लोकसत्ता १९-१-२०१२
नाटय़ पंढरी सांगली शहरात २० ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाची कार्यक्रमपत्रिका अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद अध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी जाहीर केली. या नाटय़ संमेलनाचे उद्घाटन २१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी व सिने नाटय़ कलावंत अमोल पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाटय़ संमेलन अध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, तर या नाटय़ संमेलनाचा समारोप कार्यक्रम २२ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद शाखा सांगली व चिंतामणीनगर यांच्या वतीने आयोजित नाटय़ संमेलनांतर्गत विविध नाटके, परिसंवाद व अन्य कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी नाटय़ संमेलन स्थानिक संयोजन समिती कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत हेमंत टकले बोलत होते. या पत्रकार बैठकीस स्थानिक संयोजन समिती अध्यक्ष डॉ. दयानंद नाईक, कार्यवाह शफी नायकवडी, सदस्य मुकुंद पटवर्धन, विनायक केळकर व अरुण दांडेकर आदी उपस्थित होते.

या नाटय़ संमेलनाची सुरुवात पूर्वसंध्येस म्हणजे गुरुवारी सायंकाळी सात वाजता विष्णुदास भावे नाटय़गृहातील अ‍ॅड. मधुसूदन करमरकर व्यासपीठावर लेखक विजय तेंडुलकर व विजय गोविंद दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने होणार आहे. शुक्रवार, २० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहातील लोककलावंत काळू-बाळू व्यासपीठावर सांगली जिल्ह्य़ातील लोककलावंतांचा सहभाग असणारा ग्रामीण कलाविष्कार, तर दुपारी दोन वाजता दत्तोबा खिलारे-तिसंगीकर यांचे ‘गण-गवळण-बतावणी-वगनाटय़’ सादर होणार आहे.

मिरज शहरातील बालगंधर्व नाटय़गृहातील नटवर्य गणपतराव बोडस व्यासपीठावर दुपारी दोन ते सहा या वेळेत यंदाच्या महाराष्ट्र राज्य संगीत नाटय़ महोत्सवातील अंतिम फेरीतील विजेते सांगली येथील देवल स्मारक मंदिर समितीचे गोपाळकृष्ण भोबे लिखित व चंद्रकांत धामणीकर दिग्दर्शित ‘संगीत धन्य ते गायनी कळा’, तर याच वेळेत अ‍ॅड. मधुसूदन करमरकर व्यासपीठावर सन २०१० च्या महाराष्ट्र राज्य संगीत नाटय़ महोत्सवातील द्वितीय विजेते नवरंग कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे प्रसन्न कुलकर्णी लिखित व सचिन पारेख दिग्दर्शित ‘व्हाइटलायर्स’ नाटक सादर होणार आहे. याच व्यासपीठावर संध्याकाळी सात वाजता सांगली जिल्ह्य़ाच्या रंगभूमीच्या इतिहासाचे वेध घेणारे सांगली व मिरज शहरातील सुमारे १५० कलाकारांचा सहभाग असणारे अरुण मिरजकर व राजेंद्र पोळ लिखित, तर प्रकाश गडदे व चेतना वैद्य दिग्दर्शित ‘आरंभ ते प्रारंभ’ महानाटय़ सादर केले जाणार आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजता सांगली व मिरज शहरातील विविध चौकात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या विषयावरील पथनाटय़े सादर करून नाटय़ संमेलनस्थळी बालगंधर्वनगरी येथे जमणार आहेत. बालगंधर्वनगरी येथे सकाळी दहा वाजता मुख्य मंडपात आद्य नाटककार विष्णुदास भावे व्यासपीठावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी व सिने नाटय़ कलावंत अमोल पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाटय़ संमेलन अध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या अध्यक्षतेखाली नाटय़ संमेलन उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, नाटय़ संमेलन स्वागताध्यक्ष वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, सांगली महापालिका महापौर इद्रिस नायकवडी, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद डावरे, माजी खासदार श्रीनिवास पाटील व मावळते संमेलनाध्यक्ष राम जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

याच व्यासपीठावर सायंकाळी सात वाजता आशीष पाथरे लिखित व जयवंत वाडकर व राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘कलारंग रजनी’ हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. यात अखिल भारतीय नाटय़ परिषद शाखा बोरिवली येथील कलाकार सहभागी होणार असून स्मिता तांबे व दीपाली विचारे या आपल्या सहकाऱ्यांसह नृत्य सादर करणार आहेत. याच दिवशी अ‍ॅड. मधुसूदन करमरकर व्यासपीठावर दुपारी तीन ते पाच या वेळेत समाजातील उपेक्षित घटकाचे स्वानुभवावर आधारित पुणे येथील सुषमा देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘हम और तुम सब’ हे नाटक सांगली येथील वेश्या अन्याय मुक्ती परिषद ही संस्था सादर करेल.

याच वेळेत बालगंधर्वनगरी येथील कृष्णाजी प्र. खाडिलकर व्यासपीठावर ‘कुणीही यावे व सादर करावे’ हे रंगकर्मीचे कला प्रकटीकरणासाठी मुक्त व्यासपीठ असून यात नाटय़ संमेलनात सहभागी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजिका व सूत्रधार वंदना गुप्ते आहेत. याच व्यासपीठावर सायंकाळी पाच ते सात या वेळेत नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान निर्मित ‘शिरवाडकर दर्शन’ हा कार्यक्रम होईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठावर दुपारी दोन ते चार या वेळेत ‘आम्हाला नाटक ‘असं’ हवंय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केला असून यात विजय गोखले, उदय धुरत, अशोक पाटोळे, विजय केंकरे, डॉ. तारा भवाळकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुनील बर्वे, प्रशांत दामले, प्र. ल. मयेकर व अंबर हडप आदी सहभागी होतील. या चर्चासत्राचे सूत्रधार नाटककार सुरेश खरे आहेत.

त्यानंतर सायंकाळी पाच ते सात या वेळेत मेघराज भोसले प्रस्तुत ‘जाऊ तिथे पाहू’ हे नृत्य संगीतमय धमाल नाटक सादर होणार आहे.मिरज येथील नटवर्य गणपतराव बोडस व्यासपीठावर दुपारी दोन ते तीन या वेळेत प्रा. नंदा पाटील यांचा ‘जिजाऊ’ हा एकपात्री प्रयोग, दुपारी तीन ते चार या वेळेत मिरज येथील इंद्रधनू निर्मित यशवंत कुलकर्णी लिखित व धनंजय जोशी दिग्दर्शित ‘हसाल तर शपथ’ हा स्टॅण्डअप कॉमेडीचा कार्यक्रम, तर दुपारी चार ते सात या वेळेत विविध गुणदर्शन व मूकनाटय़ कार्यक्रम सादर होणार आहे. बालगंधर्व नगरी येथील रंगकर्मी शफी इनामदार व्यासपीठावर दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सांगली शहरातील हौशी कलाकारांसाठी ‘रंगकर्मी सत्र’ आयोजित करण्यात आले असून यात अमोल पालेकर मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार, २२ जानेवारी रोजी बालगंधर्वनगरी येथील कृष्णाजी खाडिलकर व्यासपीठावर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत विषय नियामक समितीची सभा होणार आहे. याच व्यासपीठावर दुपारी दोन ते चार या वेळेत नाटय़ संगीताचा कार्यक्रम होईल. यात गायन कला सादर करणाऱ्या श्रीमती फय्याज, अमोल बावडेकर, अर्चना कान्हेरे, भरत बलवल्ली, श्रीमती मंगला जोशी व हृषीकेश बोडस आदी कलावंतांना भास्कर पेठे ऑर्गन, तर परेश देठे तबल्यावर साथ करतील. अ‍ॅड. मधुसूदन करमरकर व्यासपीठावर दुपारी दहा ते बारा या वेळेत ‘मुक्ताई’ हा स्त्री संत जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग पुणे येथील डॉ. प्रचिती सुरू सादर करतील. याच ठिकाणी दुपारी तीन ते पाच या वेळेत महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित गो. पु. देशपांडे लिखित व अतुल पेठे दिग्दर्शित पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने ‘सत्यशोधक’ नाटक सादर करण्यात येईल.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठावर सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत ‘आजचे नाटक खरेच आजचे आहे काय?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रेमानंद गज्वी, जयंत पवार, शफाअत खान, रवींद्र पाथरे, प्रा. बाबुराव गुरव, अतुल पेठे, राज काझी, प्रा. अविनाश सप्रे व गिरीश पतके आदी सहभागी होतील. याच ठिकाणी दुपारी एक ते दोन या वेळेत सुधीर गाडगीळ आजी-माजी नाटय़ संमेलन अध्यक्ष यांची मुलाखत घेतील. दुपारी चार ते साडेपाच ही वेळ ‘राज्य नाटय़ स्पर्धा आजचे स्वरूप व अपेक्षित बदल’ या विषयावर चर्चा करण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. यात सांस्कृतिक कार्य संचालक वामन केंद्रे, पी. डी. कुलकर्णी, संजय पाटील, नरेंद्र आमले, संजय पेंडसे, डॉ. शरद भुताडिया, प्रा. वैजनाथ महाजन व वीरेंद्र गणवीर आदी सहभागी होतील.

मिरज येथील नटवर्य गणपतराव बोडस व्यासपीठावर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद शाखा मुंबई आयोजित एकांकिका स्पर्धेतील अंतिम फेरीतील पाच एकांकिका सादर होतील. यात सांगली, नाशिक, अहमदनगर, अकोला व सोलापूर उपनगर यांचा समावेश आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत आदर्श शिक्षण मंदिर व चिंतामणीनगर शाखा आपली बालनाटय़े सादर करतील, तर सांगली येथील अ‍ॅक्टिव्ह ग्रुप ‘पाऊल मराठी’ हा लोकगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे.

आद्य नाटककार विष्णुदास भावे व्यासपीठावर सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत खुले अधिवेशन व या ९२ व्या नाटय़ संमेलनाचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार संभाजी पवार, सुरेश खाडे व प्रभाकर घार्गे आदी उपस्थित राहणार आहेत. या नाटय़ संमेलनाची सांगता पु. ल. देशपांडे लिखित व श्रीकांत मोघे दिग्दर्शित ‘वाऱ्यावरची वरात’ या कार्यक्रमाने होणार असल्याचेही हेमंत टकले यांनी सांगितले.