मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय समाजसुधारक श्री. टी. बी. लुल्ला एक व्यक्तीमत्व
श्री. टी. बी. लुल्ला एक व्यक्तीमत्व पीडीएफ प्रिंट ई-मेल
(श्री. टी.बी. लुल्ला यांच्या एकाहत्तरीच्या वेळी ’ सिंघू ते कृष्णा ’ हे  आत्मनिवेदन प्रकाशित केले. त्यातील एका प्रकरणाचा संक्षेप.)
मला लहानपणापासून काम करायला खूप आवडते. परंतु कामाचा ताणतणाव मला कधी जाणवत नाही. मी डॉक्टर होणार होतो, पण वकील झालो. दोन्ही व्यवसाय दोन टोकांचे असले तरी माझ्या पध्दतीत काही फरक झाला नसता. एखाद्या पेशंटच्या आजाराचा तपशील शोधत मी उपचार केले असते. तशाच प्रकारे मी माझ्या अशीलांची केस हाताळत आलो. खोट्याचे खरे करण्याची कला मी बाणवली नाही. त्यामुळे कधी माझी चूक झाली तरी मला त्याचे वाईट वाटले नाही कारण मी त्याला अपयश म्हटले नाही. डॉक्टर काय आणि वकील काय तो धंदा करत नसतो, प्रॅक्टीस करतो. त्यात चूक होऊ शकते अशी चूक मी कधी हलगर्जीपणाने केली नाही.

                हलगर्जीपणा माझ्या स्वभावातच नाही. हल्ली कधीतरी आमचा किशोर त्याच्या सामाजिक कामातले एखादे प्रकरण माझ्यावर सोपवतो मला त्या सामाजिक कार्यातले काही म्हणता काहीही कळत नाही. पण त्याचे ,काम करण्यासाठी ती सगळी मी पुरेपूर अभ्यासतो, मग हाती घेतो, शेवटपर्यंत लावून धरतो. किशोरचे मित्र, सहकारी मला त्याचे श्रेय देतात. मलाच सामाजिक कार्यकर्ता म्हणू लागतात. सामाजिक कार्य करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. किशोर अलिकडे अशा काही उपक्रमात ओढला गेलाय. तो काहीतरी सांगतो, करतो, कुठे कुठे जातो. त्याची धावपळ पाहून मीच दमून जातो. त्याच्या विचाराने कुठच्या व्यक्तीला, संस्थेला, कार्याला पैसे किंवा कसली मदत द्यायची असली तर मी कधी नाही म्हणत नाही. का नाही म्हणू ? परमेश्वराने माझ्या कर्तबगारीच्या तुलनेत उदंड दिले आहे हे ’त्याचे’ आहे. माझ्या हाती येते आणि जाते.

      मी खरे तर कुणालाच कधी नाही म्हणत नाही,स्वत:हून सिनेमाला गेलो नाही, पण घरच्यांसोबत कित्येक सिनेमाला पाहिले, हॉटेलात गेलो. मला चंगीभंगीपणा, चंगळ आवडतच नाही. साधी पोळीभाजी, वरणभात यापुढे माझी धाव जात नाही. हे जिन्नस घरातही सहज मिळतात मग त्यासाठी पैसे खर्च कशाला करायचे? मी कंजूष नाही, पण सोबतच्या मुला-नातवंडांनी खाल्ले-प्याले तरी मला आनंद होतो, पण मला स्वत:ला ते जमत नाही. त्यांच्या खाण्याने मला आनंद होतो, मी ते न खाताही मला आनंद होतो.

      आताची परिस्थिती एकंदरीत छान आहे. सगळ्या गोतावळ्यात मी वेगळा आहे असे मला जाणवते. तरुणाईत एक विलक्षण धक्का बसला आणि माझी काही वर्षे ओढाताणीत गेली. मी प्रवास वगैरे करुन आलो पण त्यात फारसे थ्रील वाटले नाही. माणसासारखी माणसं काय पहायची? पण कुणी चला म्हटले तर मी तयार होतो. इकडच्या मराठी लोकांच्यात  वावरताना एक वाक्य कानावर येते –
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे!
मला वाटते त्या तुकारामाने चारशे वर्षापूर्वी ते वाक्य माझ्यासाठीच लिहून ठेवले आहे.