मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय समाजसुधारक माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई
माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगलीचे माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई हे समाजसेवी डॉक्टर आणि लोकांसाठी झटणारे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टरांचे घराणेच समाजसेवकांचे. त्यांचे वडील डॉ. व्ही. एम. देसाई हे प्रख्यात धन्वंतरी होते. देसाई घराण्याची रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याची परंपरा डॉ. देवीकुमार देसाई यांनी समर्थपणे पुढे चालविली. सांगलीचे जिमखाना, रोटरी क्लबचे जलतरण केंद्र अशा संस्थांच्या उभारणीत या घराण्याच मोठा सहभाग आहे. गरिबांचे डॉक्टर म्हणून डॉ. देवीकुमार देसाई सर्वपरिचित होते. पटेल चौकातील त्यांचा दवाखाना म्हणजे गोरगरीब रुग्णांना दिलासा व आधार देणारे ठिकाण होते. रुग्णांकडून फी किती व केंव्हा मिळते याची त्यांनी कधी चौकशी केली नाही आणि त्याची फिकीरही बाळगली नाही. अचूक निदान, अत्यल्प पण गुणकारी औषधे, आणि रुग्णांना भक्कम मानसिक आधार ही त्यांच्या वैद्यकीय सेवेची वैशिष्ट्ये. डॉक्टर म्हणून मिळालेल्या या लोकप्रियतेचा त्यांना राजकीय क्षेत्रात अगदी सहज उपयोग झाला.

१९७४ मध्ये झालेल्या निवडणूकीत नागरिक संघटनेतर्फे डॉ. देसाई लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. १९७४ ते१९८० अशी सलग सहा वर्षे त्यांनी नगराध्यक्षपदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. सांगलीत त्यावेळी कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न तीव्रतेने पुढे अलेला होता. विषमज्वर आणि अतिसाराची साथ पसरली होती. डॉ. देसाई यांनी सांगलीसाठी पाणी शुद्धीकरणाची योजना राबवली. कृष्णा नदीपात्रातील पाणी उपशाचे जँकवेल शेरीनाल्याच्या मुखापासून दूर नेले. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच सांगली नगरपालिकेने पंचमुखी मारुती रस्त्यावर डायग्नॉस्टिक सेंटर, नगरपालिका चौकात प्रसूतिगृह आणि अतिथीगृह उभे राहिले.

नगराध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर डॉ. देसाई सातत्याने सांगलीतील प्रश्नांसाठी काम करीत होते. शेरीनाला आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला होता. त्यासाठी त्यांनी शेरीनाल्याच्या मुखापासून उगमापर्यंत फिरून एक अहवाल तयार केला होता त्यामुळेच वारणेतून सांगली शहराला थेट पाणी देण्याची योजना पुढे आली. सांगलीच्या विकासाची सतत काळजी होती. आजारामुळे प्रकृती ठीक नसतानाही विविध प्रश्नांसाठी त्यांची धडपड चालू होती. या त्यांच्या कार्याबद्दल सांगलीची जनता त्यांची सदोदित ऋणी राहील.