मुख्य विभाग

भातुकली पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन सौ. शुभांगी सु. रानडे   
दुपारची वेळ होती. ऊन मी म्हाणत होते. जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. जेवणाचा बेत आवडीचा असल्याने सर्वांनी त्यावर यथेच्छ ताव मारला होता. त्यामुळे आडवे होताच डोळे कधी मिटले ते कळले सुद्धा नाही. मला झोप तशी कमीच असल्याने मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर करीत झोपेची आराधना करीत होते. पण काही केल्या ती प्रसन्न होण्याचे लक्षण दिसेना. म्हणून माझी उगाचच चुळबुळ सुरू होती.

तेवढ्यात मला कोणाची तरी चाहूल लागली. कोण बरे असावे ? असा विचार करीत असताना अनुषा - म्हणजे आमची नात – माझ्यासमोर दत्त म्हणून हजर झाली. “ काय गं अनुषा, झोप नाही आली का ? मी न राहवून सहजच विचारले. तशी दबक्या आवाजात ती म्हणाली, “ आजी, खरंच झोप येत नाही गं. आणि खरं सांगू का ,मला काहीतरी खेळावेसं वाटतं आहे. पण तूच सांग ना, कोणाबरोबर खेळू गं मी ? तू येतेस का माझ्याशी खेळायला ? “ मला फसकन् हसूच आले. “ अनुषा, मी काय तुझ्याएवढी आहे का पळापळी करायला ? “ मी म्हटले. “ मग बसका खेळ तर खेळशील ? “ अनुषाचा प्रश्न. “ ठीक आहे. येते. “ मी उत्तरले. त्यावर खूष होऊन अनुषाने एकदम उडीच मारली. “पण काय खेळू या ? पत्ते, सागरगोटे, सापशिडी असले फालतू खेळ नको हं.” अनुषाने आपले घोडे दामटले.

तिच्या त्या उच्च स्वरातल्या बोलण्याने पलीकडे झोपलेल्या आजोबांनी आम्हला हळू बोलण्याची सूचना देत भली मोठी जांभई दिली. अनुषाच्या आवाजाची पट्टी एकदम खाली आली. मीही हळूच उठून बसले. “आपण भातुकली भातुकली खेळू या का “ मी विचारले. “ भातुकली म्हणजे काय गं ? “ अनुषाने भुवया उंचावत विचारले. “ तुला सांगते अनुषा, भातुकली म्हणजे मोठी गंमत असते हं ! हे आपले सर्वांचे घर आहे ना , तसं तुझं स्वतंत्र घर असणार म्हणे – म्हणजे खोटं खोटं घर आपण इथेच व्हरांड्यात करूया काय ! तू म्हणे त्या घरातली मुख्य. तुला पाहिजे तसा तू स्वयंपाक करायचास. म्हणजे पोहे, उप्पीट, पोळी – भाजी, लाडू – चिवडा असं काहीही तुला आवडेल ते हं ! आणि घरातल्या सगळ्यांना खायला द्यायचास कधी कोणाला हवा तर चहा – कॉफी करायची. चालेल ना ? “ अनुषा एकदम खूषच झाली. “ पण कपबशा, भांडीकुंडी आणि खाऊ पण खोटा खोटा का ? “ एवढेसे तोंड करून तिने विचारले. “ छे छे तसं कसं ? “ मी म्हणाले. आणि लहान ताटल्या, वाट्या, छोटे चमचे तिला काढून दिले. तसेच चुरमुरे, दाणे, डाळं आणि बारीक केलेला गूळही दिला हे सर्व ठेवण्यासाठी लहान लहान डबे दिले. मग काय, स्वारी एकदम खूष ! भातुकलीची ही कल्पना अनुषाला फार म्हणजे फारच आवडली. तिने तिच्या खेळातल्या वस्तूही आणल्या. तिच्या सांगण्यावरून साडीचा पडदा करून खोल्यांची विभागणी केली.

“ अनुषा, तू म्हणे ताई आणि मी म्हणे माई. तू सांगशील तसं मी ऎकणार आणि तुला मदत करणार. चालेल ना ? “ माझ्या ह्या म्हणण्यावर अनुषाने मान डोलावीत संमती दिली. मग अनुषाने साडी नेसण्याचा आविर्भाव करीत कमरेला टॉवेल गुंडाळला एप्रनसारखा. मला केरवारे करायला सांगून ती कामाला लागली. केर काढून मी तशीच तिला मदत करायला गेल्यावर “ अगं माई, हात धुऊन मग मदतीला ये हं “ तिने ताईच्या भूमिकेनून मला सांगितले. आज खाण्यासाठी काय करावे असं विचारताच दाण्याचे लाडू व साधा चुरमुर्याचा चिवडा म्हणजे तेल मसाला चुरमुरे करणार असल्याचा बेत जाहीर केला. मला तो बेत एकदम आवडला.

ताईने चुरमुरे घेतले. भाजके दाणे व डाळं एका ताटलीत कढून घेतले. नंतर चुरमुरे, दाणे व डाळं एकत्र करून त्यावर दोन चमचे तेल घातले. चवीपुरते मीठ व मसाला घातला. खोबर्याचा भाजलेला कीस होताच तोही घालून सर्व पदार्थ छान कालवले. मला चव बघण्यास दिले. कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर हे काही न घालून सुद्धा तिने बनवलेला हा खाण्याचा प्रकार मला खूपच आवडला. तिने ते एका पातेलीत म्हणजे वाटीत घालून त्यावर झाकण ठेवले. नंतर एका ताटलीत दाण्याच्या पाकळ्या करायला मला सांगून तिने हात स्वच्छ धुऊन पुसून कोरडे केले. बारीक चिरलेला गूळ घेतला. दाण्याच्या एका पाकळीवर थोडा गूळ लावून त्यावर दाण्याची दुसरी पाकळी अलगद ठेवून त्यावर हाताने थोडे दाबले. गूळ असल्याने ते अगदी सहजपणे चिकटले. मलाही तिने शिकवले. अशा रीतीने पंधरा वीस लाडू तयार झाले. एवढे होईतो घरातील सर्व मंडळी उठली. सर्वांना तिने स्वतंत्र ताट्लीत चिवडा व लाडू घालून खायला दिले. चिवडा लाडवाचा हा झटपट बेत सगळ्यांना फारच आवडला. आणि मुख्य म्हणजे अनुषाताई या खेळावर जाम खूष झाली. मज्जाच मज्जा आली.