मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य लेख सुशिक्षित बेरोजगारांसाठी वरदान - वेबमास्टर कोर्स
सुशिक्षित बेरोजगारांसाठी वरदान - वेबमास्टर कोर्स पीडीएफ प्रिंट ई-मेल

भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढते आहे. शाळा, कॉलेज, बँका, सहकारी संस्था, शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील उपलब्ध नोकर्‍यांची संख्या मर्यादित असल्याने व नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍या पदवीधरांची संख्या त्यामानाने फार मोठी असल्याने बेरोजगारीची ही समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.

शहरामध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक तरूण आपली शेतीवाडी सोडून शहरात नोकरी शोधण्यासाठी येतात मात्र त्यातील फारच थोड्यांना यात यश मिळते. बाकीच्यांच्या पदरी निराशा येते. शिवाय शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांना परत स्वगृही परतावे लागते. सुशिक्षित असूनही अर्थार्जनाचे साधन नसल्याने सामाजिक असंतोष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यासारख्या समस्या वाढीस लागतात.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळू शकतात. पण तेथेही इंजिनिअर वा पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना प्राधान्य दिले गेल्यामुळे आर्टस, सायन्स, कॉमर्स व इतर कलाशाखांतील व्यक्तींना नोकरीची संधी मिळू शकत नाही.

माहिती तंत्रज्ञानातील वेबसाईट डिझाईन या महत्वाच्या व्यवसाय कौशल्यासाठी अशा उच्च शिक्षणाची आवश्यकता नसते हे बर्‍याच लोकांना माहीत नसते. संगणक वापरण्याचे प्राथमिक ज्ञान असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला या व्यवसायात प्राविण्य मिळविता येते. साध्या नोटपॅडचा वापर करून वेबपेज करण्यापासून चित्रे, ध्वनी व व्हिडिओ सहीत अनेक पानांची आकर्षक वेबसाईट बनविण्यासाठी वापरले जाणारे प्रोग्रॅम, फोटोशॉप, ड्रीमव्हीव्हर सारख्या सुविधा वापरण्याचे ज्ञान व सर्व्हरवर वेबसाईट ठेवून त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते याची शास्त्रोक्त माहिती प्रात्यक्षिकासह दिल्यास हे तंत्रज्ञान सहज आत्मसात करता येते.

सध्याच्या इंटरनेट युगात प्रत्येक उद्योग वा व्यवसायाला आपली वेबसाईट तयार करणे व त्याचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक बनले आहे. ज्ञानदीप फौंडेशनने उद्योगांची भविष्यातील ही गरज ओळखून वेब डिझाईन व त्याचे व्यवस्थापन यांचे शिक्षण देणारा वेबमास्टर हा व्यवसायाभिमुख कोर्स सुरू केला आहे . हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणारी व्यक्ती वेबडिझाईनचा स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकते.

आपले गाव व कामधंदा न सोडता कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीस घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हा कोर्स करता यावा यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून हे शिक्षण देण्याची व्यवस्था ज्ञानदीप फौंडेशनने केली आहे. इंटरनेटवर असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत मात्र वेबडिझाईनच्या क्षेत्रात गेली बारा वर्षे कार्य करणार्‍या व १५० पेक्षा जास्त वेबसाईट डिझाईनचा अनुभव असणार्‍या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या व्यावसायिक संस्थेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर्स या कोर्सचे शिक्षण देणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभवाचा फायदा होणार आहे.

ज्ञानदीप फौंडेशनने अनेक शैक्षणिक वेबसाईट मराठी माध्यमात तयार केल्या असून वेबमास्टर कोर्ससाठी आवश्यकता भासल्यास मराठीतून विषय शिकविण्याची सोय या कोर्समध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार व घराबाहेर पडू न शकणार्‍या महिलांसाठी हा कोर्स रोजगाराची नवी संधी देणारा असल्याने एक वरदानच ठरणार आहे.