मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य लेख निसर्गदूत - पक्षी
निसर्गदूत - पक्षी पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन सौ. शुभांगी सु. रानडे   

दोन दिवस चाललेली पावसाची पिरपिर ध्ररतीप्रमाणेच मनालाही ओलंचिंब करून टाकीत होती. सुरूवातीस बरी, आनंददायक वाटणार्‍या ह्या पावसाचा हळूहळू कंटाळा येऊ लागला. आणि कवितेतले लहान मूल होऊन पावसाला पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटत होते -

"उघड पावसा ऊन पडू दे
उडू बागडू हसू खेळू दे"

लहानपणच्या ह्या कवितेत मन अगदी हरवून गेले होते. बाहेरच्या कुंद वातावरणाने मनही उदास व निरुत्साही बनले होते.

नाही म्हटले तरी दिवस पटकन्‌ संपतो पण रात्र मात्र खायला उठते - संपता संपत नाही. घड्याळात दोनचे ठोके पडले. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही एवढा काळामिट्ट अंधार सगळीकडे भरून राहिला होता. पण त्या भयाण अंधाराचा ही भेद करून एक आवाज माझ्या कानावर पडला व मनाचे औदासिन्य पार कुठच्या कुठे पळून गेले ते कळलेही नाही ! हं . . तर सांगायचं म्हणजे तो आवाज होता ‘पावशा’ पक्ष्याचा ! ‘पेरते व्हा पेरते व्हा’ असे सुरूवातीस म्हणणार्‍या पावशाचा सूर हळू हळू वरच्या पट्टीत जात होता. "पाऊस पडून गेला आहे. काळी आई आपल्याला धान्यदाणा देण्यास उतावीळ, उत्सुक झाली आहे. पण त्यासाठी आपण पेरणी करण्याची आवश्यकता आहे. एकदा का पेरणी झाली की नाजुक तृणांकुर जमिनीतून अलगदपणे मान वर करून बघायला लागतील व बघता बघता सारे शिवार हिरव्यागार शालूने लपेटून जाईल. तेव्हा कंटाळा करू नका. उठा. ताजेतवाने व्हा व कामाला लागा" हेच जणू तो पावशा पुन्हापुन्हा सार्‌यांना सांगत होता. अन्‌ तेही न कंटाळता, न दमता, न थकता ! माझे मनही उल्हसित झाले आनंदित झाले. त्या निसर्गदूताचे आभार मानून मी मनापासून निसर्गदेवतेपुढे नतमस्तक झाले.

इतक्यात टिटवीचा कर्णकर्कश आवाज ऎकू आला. मनात आले ‘का बरे ओरडत असेल इतक्या रात्री ही टिटवी? काय बरे सांगायचे असेल तिला ? काळोखात काय दिसत असेल तिला? ती आकाशात घिरट्या घालीत होती हे मला सहजपणे जाणवत होते. तसे म्हटले तर आपण माणसे किती सुखी ! रात्री घराची दारे, खिडक्या बंद करून गुरगुट्ट पांघरूण घेऊन आपण आरामात झोपतो. हे पक्षी मात्र ऊन, वारा, पाऊस झेलत आपापल्या घरट्यात कसे झोपत असतील ? पावसात घरटे सोडून घराच्या वळचणीला येऊन बसत असतील का ? सुसाट वाहणार्‍या वार्‌यावर त्यांच्या घरट्याचे काय होत असेल ? घरट्यात अंडी, छोटी पिल्ले असतील का ? कुठे जात असतील त्यांना घेऊन ? इत्यादी अनेक प्रकारच्या विचारांनी माझ्या मनात थैमान घातले.

आता रोजच मला सवय लागली. रात्री कोणता पक्षी कसा ओरडतो ? त्याला काय म्हणायचं असेल ? याचा माझ्या पद्धतीने विचार करण्याची. त्यामुळे झोपेचं खोबरं झालं तरी मला त्याचं काही वाटेना. जणू काही त्या पक्ष्यांबरोबर माझं रोजच बोलणं सुरू झालं पहाटे अडीच तीनच्या सुमारापासून मोरांचा मनमोहक आवाजही ऎकू येतो. Morआमचे घर गावाच्या बाहेरच्या बाजूला असल्याने तेथे मोरांचे वास्तव्य असते. तेही एक दोन नव्हे हं . . तर अनेक मोर त्यांच्या कुटुंबकाबिल्यासह शेतात, झाडांवर निवांतपणे राहतात. तसे मला वाटते की मोर थोडेसे घाबरट असतात. कारण रात्री अपरात्री एखादे कुत्रे भुंकायला लागले तरी त्याची पहिली चाहूल मोरांना लागते आपल्या "म्याऊ म्याऊ" अशा आवाजाने ते सर्वांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. मोराच्या ओरडण्याला ‘केका’ असे म्हणतात. मोर व मांजर यांच्या आवाजात थोडेसे साम्य असले तरी मोराच्या आवाजातील मोहकता, कर्णमधुरता भारीच सुखावह असते. एका मोरापाठोपाठ इतर मोरही साद घालीत असतात, त्याच्या री ला री ओढत असतात. यामुळे त्यांच्यातील एत्रितपणाचे दर्शन होते. क्वचित्‌ रस्त्यावरून एखादी मोटारगाडी वेगात गेली तरी लगेच मोरांचा कोलाहल लगेच ऎकू येतो. मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे रात्री फक्त मोरांचा आवाज ऎकू येतो, लांडोरींचा नव्हे. पण सकाळी मात्र मोरांच्याऎवजी लांडोरींचा आवाजच अधिक प्रमाणात ऎकू येतो.

अचानक एका वेगळ्याच पक्ष्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी नीट कान देऊन ऎकले तर तो पावशा, टिटवी किंवा मोर नसून कोकिळेचा होता. पहाटेचे चार साडे चारच वाजलेले होते. कुहू कुहू’ असा आवाज ऎकला की आपण म्हणतो ‘अरे ही तर कोकिळा !’ पण गंमत म्हणजे कोकिळा नव्हे तर नर कोकिळ ‘कुहू कुहू’ अशा सुंदर आवाजात मादीला साद घालत असतो. हा कोकिळ पक्षी तुकतुकीत काळ्या रंगाचा असतो पण अत्यंत देखणा व नाजुक असतो. तर कोकिळा - मादी - ही करड्या रंगाची असून तिच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. शिवाय मुख्य फरक हा त्यांच्या आवाजात असतो. कोकिळ हा अत्यंत मधुर स्वरात कूजन करतो तर कोकिळा मात्र "कु कु कु कु" अशा थोड्याशा कर्कश आवाजात उत्तर देते. मोरांचेही तसेच असते. मोराचा आवाज ‘म्याऊ म्याऊ’ असा गोड असतो तर लांडोर मात्र ‘क्याव क्याव क्याव क्याव’ असे घाईघाईने पटपट म्हणते. अशी त्यांच्या आवाजातली ही मोठी मौजच असते.

हळूहळू पहाट होऊ लागते. तसे म्हणजे अजून तांबडेही फुटलेले नसते पण इतर पक्ष्यांच्या आवाजाने जाग येऊन म्हणा किंवा झोप झाल्याने म्हणा किंवा घरट्यात बसून बसून कंटाळल्याने म्हणा - Dayalलहानसहान पक्षीही जागे होऊन सूर्यदेवाच्या - छे छे त्याच्याही अगोदर येणार्‌या उषादेवीच्या स्वागताची तयारी करू लागतात. आमच्या परसात आंबाफणसाची झाडे आहेत. तसे आम्ही काही कोकणात राहत नाही. पण येणार्‌या प्रत्येक झाडाला आम्ही अभयदान देत असल्याने आमच्या घराभोवती बरीच वृक्षराजी जमा झाली आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या येथे पक्षीगणांचे वास्तव्य, आवक-जावक भरपूर प्रमाणात असते. अवघ्या वीतभर उंचीचा, काळसर रंगाचा, आपल्या शेपटीचा लहानसा पिसारा फुलवून दयाळ पक्षी जेव्हा गाण्याची तान घेतो तेव्हा तर ऎकणार्‌याचे भानच हरपून जाते. दरवर्षी फणसाच्या झाडाला चाळीस पन्नास फणस तरी येतातच. एकेका ठिकाणी पाचदहा फणसांचे गुच्छच्या गुच्छ लागलेले असतात. अशावेळी त्या गुच्छांच्या बेचक्यात हमखास दयाळ पक्ष्याचे घरटे असते. आपल्या सुरक्षेबाबत तो भलताच जागरूक असतो. मांजरासारख्या शत्रूची जरा का चाहूल लागली की दयाळ नेमका त्याच्या पाठीवरून उडत जातो. व जाता जाता त्याला चोच मारून हैराण करायलाही तो कमी करत नाही. एवढ्याशा लहानग्या पक्ष्याच्या अंगी एवढी मोठी धिटाई कोठून येते कोण जाणे !

Bulbulत्यानंतर बुलबुलांचा नंबर लागतो. तसे थोडेसे उशिराच उठतात ते. दोन बुलबुलांमधील संवादही मोठा मजेशीर व ऎकण्याजोगा असतो. दोघं एकमेकांशी चहापाण्याच्या म्हणजे आज किडामुंगी शोधायला कुठे जायचे याबद्दल बहुदा खलबतं करीत असावेत. किंवा "आज झोप कशी लागली ? स्वप्न पडले किंवा कसे ? स्वप्नात काय गंमत झाली" इत्यादी चर्चा करीत असावेत - माणसांप्रमाणेच.

Satbhaiसातभाई पक्ष्यांची तर अगदी गंमतच असते. भुरक्या रंगाचे, पिंगट डोळ्यांचे, उड्या मारत चालणारे हे सात आठ पक्षी एकत्रितपणे सुखाने राहतात. एकत्र कुटुंब म्हणजे कसे असते व असावे हे त्यांच्याकडे पाहिले की सहजपणे समजून येते. त्यांच्या एकोप्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. एकजण ओरडला की त्याच्यापाठोपाठ सगळेजण आरडाओरडा सुरू करतात. नुसता आरडाओरडा नव्हे तर गोंगाट करून अगदी नकोसे करतात. एक मेंढरू खड्ड्यात पडले की इतर मेंढरेही पडतात. तसे काहीसे सातभाईंचे असते. वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत सावध व चलाख असतात. त्यांच्यात बहुतेकवेळेला एखाद - दुसरेच पिल्लू असते. प[अण सर्वजण मिळून त्याचा मोठ्या प्रेमाने व आपुलकीने सांभाळ करीत असतात. त्याला खायलाप्यायला देतात.

 

Khandyaक्वचित्‌ खंड्या पक्षीही दिसतो. त्याच्या पोटाशी लालसर निळा रंग असतो. अणकुचीदार चोचीचा, अतिशय तडफदार असा हा खंड्या पाहताक्ष्णीच आपले मन वेधून घेतो. सूर मारून आपले सावज पकडण्यात त्याच्याइतका वाकबगार पक्षी पहावयास मिळणे कठीणच ! तसेच चिमण्या तर अजिबातच दिसत नाहीत. नाही म्हणायला एखासा कावळा क्वचित्‌ "काव काव" करताना दिसतो. आमच्या सांगलीपासून जवळच असणार्‌या, कृष्णा- वारणा नद्यांच्या संगमाकाठी असलेल्या हरिपूर या गावी नदीकाठच्या झाडांवर पोपटांचे थवेच्या थवे दिसतात. आमच्या येथे यायला त्यांना भीती वाटते किंवा कसे ते ठाऊक नाही. कबुतरेही फारशी दिसत नाहीत. पण त्यांच्याच जातकुळीतला ‘होला’ - शिबिराजा व ससाणा या गोष्टीतल्या होल्यासारखा - मात्र बर्‌यचदा दिसतो. गव्हाळ, भुरक्या करड्या रंगाचा होला अतिशय नाजुक व देखणा असतो. मान वेळावून चालणे हा त्याचा आवडीचा छंद. तसेच झाडाझुडपातले किडे खाणारा, आपल्या शेपटीचा खालीवर करून आवाज करणारा इटुकला धोबी पक्षीही अधूनमधून नजरेस पडतो. फारसा नजरेस न फडणारा पण आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने सर्वांच्या परिचयाचा ‘वटवट्या’ पक्षी मोठा मजेशीर असतो. एकदा वटवट करायला लागला की पन्नास - शंभर वेळा तरी न थांबता, तो सातत्याने ओरडत असतो. आपण किती समर्थपणे वक्तव्य करू शकतो हे सिद्ध करण्याचा त्याचा हा प्रयत्न असावा असे मला वाटते.

Salunki

काळसर पिवळसर रंग असणार्‌या साळुंक्याही कलकलाट करण्याच्या बाबतीत सातभाईंच्या बरोबरीने नंबर लावतात. साळुंक्यांच्या जातीतलाच, जवळजवळ त्यांच्याचसारखा दिसणारा ‘भटजी’ पक्षीही येथे पहावयास मिळतो. त्याच्या नावावरून मोठी गंमतच वाटते. त्यांच्या डोक्याच्या मधोमध कपाळापासून मागील बाजूस मानेपर्यंत काळसर रंगाची पिसांची पट्टी असते. एका पेनच्या रुंदीएवढी तिची रुंदी असते. ती भटजींच्या शॆंडीप्रमाणे दिसते. हे भटजी इतके वैशिष्ट्यपूर्ण आवाज की त्याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. ते आवाजाची नक्कल करण्यात एकदम पटाईत असतात. मांजराचा आवाजही ते अगदी सहजपणे काढतात.

 

Kotwalसायंकाळच्या वेळी विजेच्या तारेवर बसून उडणार्‌या किड्यांची शिकार करणारा कोतवाल पक्षी ह आपले वेगळेपण दाखवून देतो. बुलबुलापेक्षा मोठा व कोकिळेपेक्षा लहान असणार्‌या ह्या कोतवाल पक्ष्याची शेपटी हेच त्याचे वेगळेपण होय. काळाकुळकुळीत रंग असणार्‌या ह्या पक्ष्याची शेपटी तिच्या टोकाशी दोन अर्धवर्तुळाकार भागात विभागलेली असते. त्याच्या आवाजातील गोडवा काही वेगळेच सांगून जातो. भारद्वाजांची जोडीही अधूनमधून दर्शन देते. चोच बंद करून ‘कुक्‌ कुक्‌’ असा आवाज करणारा भारद्वाज दिसणे हे मोठे शुभलक्षण समजले जाते. त्याला कोणी कोणी ’देवकावळा’ असेही म्हणतात. याचे महत्वाचे खाद्य म्हणजे गोगलगाय, लहनसहान किडे, पक्ष्यांची अंडी. तो झाडाच्या शेंड्यावर एकदम उडत जात नाही. जसे जिन्याची एकेक पायरी चढत जावे तसे तो झाडाच्या एका फांदीवरून दुसर्‌या जराशा उंच फांदीवर जातो. नंतर त्याच्या वरच्या असे टप्प्याटप्प्यने वरवर चढत जातो. त्यामानाने बुलबुलासारखा लहानसा पक्षीही झाडाच्या सर्वात उंच शेंड्यावर एकदम झेप घेतो व मोठ्या ऎटीत दिमाखदारपणे सभोवतालची पाहणी करतो.

आमच्या घराभोवती जशी नारळ, आंबा, फणस इत्यादी मोठी झाडे आहेत तसेच कढिलिंब, कडुलिंब, सीताफळ, रामफळ,मोसंबी, लिंबे, डाळिंब इत्यादीही झाडे आहेत. तसेच जाईजुईचे वेलही घराच्या प्रवेशद्वारावरच्या मांडवावर असल्याने लहानसहान पक्षीही त्यावर इकडून तिकडे करीत असतात. आमच्या येथे भरपूर पक्षी असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे रुद्राक्षाचे झाड. आमच्या एका नातेवाईकांनी त्याचे एक रोपटे देऊन विचारले होते "तुमच्या बागेत लावले तर चालेल का ? " कारण काय तर म्हणे ते झाड मोठे झाल्यावर त्यावर भरपूर पाने येतात. व रुद्राक्षाच्या बिया खाण्यासाठी पक्ष्यांची झुंबड उडते. हे कारण कळल्यावर आम्ही तर एकदम खूषच झालो व त्याला आनंदाने मान्यता दिली. अगदी मऊसूत मखमली पानांवर चांदण्यांसारखी लहानलहान चांदण्यांसारखी फुले येतात व पानांच्या मागे गोलगोल नाजुकशी फळे लागतात. ती खायला पक्षी मोठ्या संख्येने येतात. अर्थात्‌ हे आमचे अहोभाग्यच म्हणायचे !

Bharadwajसकाळच्या प्रहरी नारळाच्या किंवा कडुलिंबाच्या झाडावर धनेश पक्षी बसलेला दिसतो. लामसडक, छळकाटा बाकदार चोच असणारा हा पक्षी पाहून मला पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांची आठवण येते. तसा धनेश हा घारीच्याच पंथातला पण थोडा मवाळ वाटतो. घार तशी खाऊनपिऊन सुखवस्तु कुटुंबातील वाटते. धनेशचे दर्शन झाले की तो दिवस त्याच्या आठवणीत अगदी छान जातो.

दुपारी बहुदा ऊन वगैरे असताना पक्षी झाडाच्या आडोशाला निवांत विश्रांती घेतात. संध्याकाळी पुन्हा ताज्या दमाने कामाला लागतात. संध्याकाळच्या वेळेला जरा अंगणात आले की आकाशात लहान लहान पाकोळ्यांप्रमाणे दिसणारे आठ दहा पक्षी पाठशिवणीचा खेळ खेळत आकाशात स्वैर भरार्‌या घेत असतात. किती लहानसा जीव ! पण न कंटाळता सारखे भिरभिर घिरट्या घालत असतात. तसेच मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे बुलबुल पक्ष्यांचे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सहा साडेसहाच्या सुमारास हे बुलबुल झाडावर बसून इतके कलकल करतात की काही विचारु नका. मला वाटते ते दिवसभर कोणाला काय काय मिळाले, काय काय गंमतीजमती झाल्या या व अशा प्रकारच्या अनेक गप्पा मारून मगच आपापल्या घरट्यांची वाट धरतात. पण हा त्यांचा दिनक्रम मात्र अगदी न चुकता रोजचा हं !

असे - एक ना दोन - हजारो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, झाडेझुडपे असतात. या सर्वांकडून आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही असते. फक्त ते बघण्याची नजर, ऎकण्याची क्षमता मात्र आपल्या आपल्याजवळ हवी. या निसर्गदूतांच्या सहवासात आपले मन गुंतले म्हणजे माणसामाणसांमधले रागलोभ सारे दूर होऊन एक निर्भेळ आनंदाचा खजिनाच गवसल्यासारखे वाटते.