मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय सहकार डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे निधन
डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे निधन पीडीएफ प्रिंट ई-मेल

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर, हुतात्मा उद्योग समूहाचे शिल्पकार डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (वय ९0) यांचे दिनांक २२ मार्च २०१२ रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी निधन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून ते आजारी होते. अण्णांच्या रूपाने स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला.

क्रांतिसूर्याचा अस्त - सकाळ वृत्तसेवा विशेष वृत्त वाचा


15 जुलै 1922 रोजी जन्मलेल्या नागनाथअण्णांवर बालवयातच क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वतःला महात्मा गांधीजींच्या चळवळीत झोकून दिले. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची पर्वा न करता त्यांनी इंग्रजांना जबरदस्त आव्हान दिले. धुळे खजिना लूट, शेणोलीजवळ रेल्वेची लूट यांसह अनेक लढ्यात त्यांनी निधड्या छातीने इंग्रजांशी सामना केला. नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा झेंडा त्यांनी अभिमानाने हातात घेतला होता.स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची बाजी लावून लढणारे नागनाथअण्णा हे सामाजिक जीवनातील एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अण्णांनी शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी, कामगार, धरणग्रस्त, दलित, आदिवासी व महिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला.

नागनाथअण्णा नायकवडी यांनी शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी वाळव्यात हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याची उभारणी केली. वाळव्यात त्यांनी उभारलेला हा हुतात्मा कारखाना शेतकरी हिताचा विचार करणारा आदर्श कारखाना "हुतात्मा पॅटर्न' या नावाने नावारूपाला आला. ते साखर शाळेत अखंड वास्तव्यास असायचे. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. गरीब शेतकरी, कामगार वा अधिकारी या सर्वांशी ते सौहार्दपूर्ण वागत. कारखान्याचे सर्व निर्णय ते कारखाना सभासदांच्या उपस्थितीत घेत. वाळवा परिसराचा सर्वांगीण विकास करून त्यांनी तेथील शेतकर्‍यांना स्वाभिमानी व स्वयंपूर्ण बनविले.

शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ऊसाला २०५० रु. इतकी पहिली उचल देण्याचे निश्‍चित केले होते. गेल्यावर्षी ऊसदराची मोठी कोंडी झाली होती आणि त्यावेळीदेखील सर्वप्रथम ऊसदर जाहीर करुन त्यांनी कोंडी फोडली होती. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण, दलित व आदिवासी लोकांचा उत्कर्ष झाला पाहिजे, यासाठी ते लढत राहिले. सहकार आणि शिक्षण क्षेत्रातून भूमिपुत्रांना सहकार्याचा हात देऊन अनेक संसार उभे केले. त्यांना पद्मभूषण, शिवाजी विद्यापीठाची डी.लिट यांसह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.