मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग १ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग १ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
९२वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 'नाट्य पंढरी सांगलीला'' भरत आहे, पार्श्वभूमीवर २२ वर्षांपूर्वी इथेच भरलेले डिसेंबर २३,२४,२५ ..१९८८ चे नाट्य संमेलन कसे साजरे झाले त्याबद्दल काही आठवणी लिहीत आहे.
सांगलीच्या ६९ व्या नाट्य संमेलनाचे आमंत्रण प्रथेप्रमाणे आणि नियमाला अनुसरून इंदूरच्या ६८व्या नाट्यसंमेलनात दिले , त्यावेळी मी [डॉ.मधू आपटे] नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचा सदस्य होतो. माझ्याबरोबर सांगली नाट्य परिषद शाखेचे श्री. विनायक केळकर आणि विलास गुप्ते होते. त्यावेळी आण्णासाहेब कराळे भावे नाट्य मंदिराचे [अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर ] अध्यक्ष होते आणि नटवर्य श्री प्रभाकर पणशीकर यांनी आण्णांना मागे लागून सांगलीला नाट्य संमेलन घेण्यासाठी तयार केले होते.
मध्यवर्ती मध्ये तेंव्हा डॉ. श्रीपाद आडारकर, भाऊ सप्रे, होते. शिवाय माजी अध्यक्ष दाजी भाटवडेकर यासारखी मंडळी मागे उभी होती. त्यासर्वांच्या पाठींब्या मुळे ८८ चे ६९वे मराठी नाट्य सांगलीला मिळाले , यापूर्वी १९४३ साली 'मराठी नाटकास शंभर वर्षे झाली म्हणून ‘ नाटय शत सावत्सरी महोत्सव ' आणि त्याबरोबर ३३ वे नाट्य संमेलन भरून ३५ वर्षे होऊन गेली होती
सांगलीच्या ६९ व्या ह्या मराठी नाट्य संमेलनास आणखी एक पार्श्वभूमी तयार झाली. सांगलीचे लोकमान्य नेते मा, वसंतराव दादा पाटील यांनी स्वागताध्यक्ष पद स्वीकारण्यास मान्यता दिली, तशी घोषणाही झाली ... आणि माझ्या आठवणी प्रमाणे त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा पालथ झाली,
पु.लो. द. चा प्रयोग होऊन मा. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्य मंत्री झाले आणि मा, वसंतरावदादा [ बहुतेक] राजस्थानचे राज्यपाल झाले . आणि मग मा. वसंतरावदादा यांनी आपले पुतणे मा. विष्णू अण्णा पाटील यांना आपले अधिकार दिले आणि मा. विष्णू आण्णांनी ही जबाबदारी नीट पार पडली. गम्मत म्हणजे या संमेलनांची जी ' नाटय पंढरी' नामक स्मरणिका निघाली त्यात मा. शरद पवार यांचा फोटो पहिल्या पानात ठळकपणे छापला आहे. मात्र या संमेलनास मा. शरद पवार हजर राहिले नाहीत. स्वागताध्याक्षांचे म्हणजे मा. वसंतरावदादा यांचे स्वागतपर भाषण मा, विष्णू अण्णा यांनी वाचले .....
दुसरी घटना नाट्य क्षेत्रातील होती .. आणि ती म्हणजे या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री राजाराम शिंदे यांची निवड झाली. श्री राजाराम शिंदे ह्यांनी त्यांच्या ' नाट्य मंदार ' या व्यावसायिक संस्थेतर्फे उत्तम नाटके सादर केली होती, त्यात श्री विद्याधर गोखले यांची ‘ संगीत नाटके' सुद्धा होती . पण नाटय क्षेत्रात शिंदे हे 'निर्माता' आणि व्यवस्थापक म्हणून अधिक मान्यता पावलेले होते आणि आत्ता पर्यंतच्या इतिहासात अशा व्यक्तीला हे पद मिळालेले नव्हते. त्यामुळे शिंदे नाट्य संमेलन अध्यक्ष होतात हे त्यावेळच्या नाट्य वर्तुळाला मान्य नव्हते. पण शिष्ठाचार म्हणून कुणी उघड बोलत नव्हते. पण नाराजी छपत ही नव्हती. मात्र सांगली संमेलन आयोजकांनी 'निवडून आलेले अध्यक्ष ' विना तक्रार स्वीकारले आणि श्री राजाराम शिंदे यांचे सन्मान पूर्वक स्वागत केले ... पण एक गोष्ट घडलीच ... अनेक मान्यवर नाट्यकर्मींनी ह्या संमेलनात आपली उपस्थिती टाळली, अर्थात हे संमेलन संपल्यावर कळून आले ..... पण तरीही हे नाट्य संमेलन आगळे वेगळे आणि यशस्वी झाले हे नक्कीच !!!!