मुख्य विभाग

कप म्हणजे चहा नव्हे पीडीएफ प्रिंट ई-मेल

संदर्भ - दै. लोकसत्ता २२ जानेवारी -रवींद्र पाथरे
आपल्याकडे पाहुणे आले की आपण त्यांना कपातून चहा देतो. परंतु कप म्हणजे चहा नव्हे! तशी नाटकात गोष्ट निमित्तमात्र असते. ही गोष्ट म्हणजे कप! परंतु नाटकातील आशय, त्यातली जीवनदृष्टी म्हणजे चहा होय. कितीही महागडय़ा, कलात्मक कपात जर चहा नसेल- मग तो कटिंग का असेना, तर लोक तो स्वीकारत नाहीत. तसेच नाटकाचे आहे, आपल्याकडे अनेक नाटकांत ‘कप’ असतो, पण ‘चहा’ च नसतो, असे उद्गार नाटककार शफाअत खान यांनी काढले. ‘आजचे नाटक खरोखरच आजचे आहे काय?’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

आपल्या प्रेक्षकांचा बुद्धय़ांक तिसऱ्या इयत्तेतल्या मुलाएवढा असतो, तेव्हा त्याला कळेल असे नाटक लिही, असा आग्रह निर्माते धरतात आणि बरेच नाटककार त्यांच्या या म्हणण्याला बळी पडतात. परंतु प्रेक्षकांचा बुद्धय़ांक किमान दहावीच्या मुलाएवढा आहे असे लेखकाने गृहीत धरून लिहायला हरकत नाही, अशा उपरोधिक शब्दांत शफाअत खान यांनी आजच्या व्यावसायिक नाटकांवर झोड उठवली.

आज टीव्ही, इंटरनेट व चित्रपट अशा अनेक माध्यमांचे प्रेक्षकांवर बॉम्बार्डिंग होत असताना नाटकाने त्यांच्यापेक्षा वेगळे, प्रेक्षकांनी याआधी न पाहिलेले, न अनुभवलेले काहीतरी देणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, आजच्या प्रेक्षकाला विचार नको आहे, डोक्याला ताप देणारे काही त्याला पाहायचे नाहीए. त्यामुळे नाटककारानेही हे ओळखून खेळकर पध्दतीने आपल्याला जे काही म्हणायचे आहे, ते मांडायला हवे. आजच्या लेखकाने ‘उद्या’ चे नाही, तर ‘आज’ चे नाटक लिहिले तरी आपण त्याला ‘थोर’ म्हणायला हवे.

आज आपण उत्तर आधुनिक काळात जगतो आहोत. समोरचे वास्तव शतखंड स्वरूपात आपल्यावर येऊन धडकते आहे. अशावेळी त्याचा अन्वय लावणे कठीण जात आहे. आपले नाटककार सामाजिक प्रश्नांच्या काठा- काठाने नाटकांची रचना करताना दिसतात. त्याच्या खोलात उतरण्याची त्यांची तयारी नाही. त्यात भोवतालातील गलबल्यात शत्रूच ओळखता येईनासा झाला आहे. भ्रमाच्या शृंखलेत आपण अडकलो आहोत. यातून बाहेर पडून आजचे वास्तव जाणून, आकलून घेण्याची गरज आहे. वास्तववादी नाटकांत हे शतखंडित वास्तव पकडता येणे शक्य नाही. त्यामुळे नाटकाची नव्या संकल्पनेतून रचना करण्याची निकड निर्माण झाली आहे, असे मत अविनाश सप्रे यांनी व्यक्त केले.

काळाच्या निकषावर नाटक कालचे की आजचे, हे जोखणे योग्य नाही, असे सांगून प्रा. वैजनाथ महाजन यांनी ‘नाटक हे काल, आज आणि उद्याचेही असते’ असे प्रतिपादन केले. काही नाटक तात्कालिक, काही तात्पर्य सांगणारी, तर काही कायम टिकणारी असतात, अशी वर्गवारीही त्यांनी केली. अभिराम भडकमकरांचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक तुम्ही ‘काल’ चे म्हणणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी त्या त्या काळात वर्तमान मांडणारी नाटकेच रंगमंचावर आली आहेत, असे सांगून आपण केलेल्या नाटकांची आजच्या काळाशी, आजच्या समस्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. तेंडुलकरांचे ‘कमला’ हे नाटक करताना स्त्री स्वातंत्र्याबद्दल आणि तिच्या आत्मभानाबद्दल त्यांना पडलेले प्रश्न त्यांनी अधोरेखित केले होते. आज विचारांनी नाही, पण कृतीने स्त्री स्वतंत्र झाली आहे. ती तिला हवे तसे आयुष्य जगू मागते आहे, जगते आहे. परंतु याचा अर्थ ती पूर्णपणे स्वतंत्र आणि प्रगल्भ झाली आहे का, असा प्रश्न लालन सारंग यांनी आपल्याला पडला असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी श्री. ना. पेंडसे यांचे ‘रथचक्र’, जयवंत दळवी यांचे ‘कालचक्र’ इत्यादी नाटकातील माणसांचे जगणे आज तरी बदलले आहे का, याबद्दल शंका प्रकट केली. त्यामुळे ही नाटकं जरी कालची असली तरी ‘आज’ ही त्या समस्या कायम असल्याने थोडेफार संदर्भ बदलले तरी ती ‘आज’ ही करता येऊ शकतील, असे त्या म्हणाल्या.

सन १९९१ नंतर जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर माहिती तंत्रज्ञानाचा झालेला विस्फोट, त्यातून माणसाच्या जगण्यात आलेली व्याभिश्रता आणि त्यातून निर्माण झालेले नवे प्रश्न आणि समस्या यांचे प्रतिबिंब ‘आज’ च्या नाटकांत पडते का, याचा मागोवा रवींद्र पाथरे यांनी घेतला. आजचे नाटक हे आजच काळाशी संबंधित असायला हवे. परंतु संमेलनातही ‘आज’ च्या नाटकाची दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आणून नाटककार जयंत पवार म्हणाले की, भारतीय लोक एकाचवेळी अनेक काळांत जगत असतात. हे कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे म्हणणे खरे आहे.

मराठी माणूस सतत भूतकाळात जगत आलेला आहे. त्यामुळे मराठी नाटकही कायम भूतकाळाचेच चित्रण करण्यात रमलेले दिसते. म्हणूनच ‘आज’ चे नाटक रंगभूमीवर कमीच आलेले आहे. आजच्या आधुनिकोत्तर काळात जिथे माणसेच जगणेही विखंडित स्वरूपात आहे आणि भवतालही शतखंडित स्वरूपात दिसतो आहे, अशावेळी तो सर्वागाने पकडणे कठीण होऊन बसले आहे. तो वास्तववादी नाटकांत रेखाटणेच अशक्य आहे. ‘यदा कदाचित’ आणि ‘पोपटपंची’ सारख्या नाटकांतून तो पकडण्याचा यथाशक्ती प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले.