मुख्य विभाग

मुलाखत ‘दादा’ आणि ‘मामा’ यांची पीडीएफ प्रिंट ई-मेल

संदर्भ - दै. लोकसत्ता २२ जानेवारी - गणेश जोशी
नाटय़पंढरी सांगली शहरात आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे व माजी अध्यक्ष राम जाधव हे दोन नाटय़सृष्टीतील अभिजात दिग्गज कलाकार एकाच व्यासपीठावर व त्यांची प्रकट मुलाखत ऐकण्याचा दुग्दशर्करा योग नाटय़रसिकांना लाभला. ‘दादा’ अशी ओळख असणारे श्रीकांत मोघे, तर ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे राम जाधव यांचे चिंतन व बिनधास्त स्वगताने सांगलीकर रसिक कमालीचे भारावून गेले.

या दोघा दिग्गज कलाकारांना विविध विषयावर सुधीर गाडगीळ यांनी बोलते केले व या दोन्ही ‘नटसम्राटां’ नी नाटय़सृष्टीतील अनेकविध पैलू नाटय़रसिकांसमोर उलगडले. राम जाधव यांनी आपल्या खडय़ा आवाजात ‘नटसम्राट’ या नाटकातील संवाद सादर केले. त्यावेळी साक्षात ‘नटसम्राटा’ चेच दर्शन घडले. या अविट मुलाखतीवेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती.

श्रीकांत मोघे यांनी बिनधास्त शैलीत कारकिर्दीचे मुक्त चिंतन करताना भूपाळी, श्लोक, पोवाडा व गीते सादर केली. पंजाबी, हिंदी व इंग्रजी भाषेसह अनेक नाटकातील संवाद सादर केले. श्रीकांत मोघे यांच्या पहाडी आवाजाने या मुलाखतीत अधिकच रंगत आणली. पु. ल. देशपांडे यांनी जे काही दिलं, हा एक नशिबाचाच भाग आहे. ‘पीएल’ एम. ए. करण्यासाठी सांगली शहरात आले होते. विलिंग्डन महाविद्यालयात झालेल्या भेटीनंतर त्यांच्या समवेत पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यावेळी सुनीतावहिनीही समवेत होत्या, अशी आठवणही त्यांनी सांगितली. गाणं शब्द-सुरांनी नटलेलं पाहिजे, आपल्याला नाटय़ संगीत, क्लासिकल गाणं कधीच डसलं नाही, असे सांगतानाच मराठी नाटकातील गाण्याला काय अर्थ असतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राम जाधव यांनी अनेक विषयांना स्पर्श करीत चिंतनशील विचार मांडले. नव्या पिढीला शिकण्याची गरज वाटत नाही, अशी खंत व्यक्त करताना या पिढीकडे सर्व काही आहे, नाही फक्त ती चांगली संहिता, असे सांगून नाटय़ परिषदेने आपणास पावआणा कधी दिला नाही. आपणही मागितला नाही, पण नाटय़ परिषदेने माजी अध्यक्ष असलेल्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.