मुख्य विभाग

नाट्यसंमेलन समारोप पीडीएफ प्रिंट ई-मेल
फॊटो - सौजन्य - दै. लोकसत्ता

ज्या नाटय़ पंढरीत आधुनिक मराठी नाटकाचा जन्म झाला त्या आमच्या सांगलीत १०० वे नाटय़ संमेलन व्हावे, असे भावपूर्ण आवाहन सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी केले आणि त्यास ९२ व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी अनुमोदन देतानाच शंभराव्या नाटय़संमेलनाला मी प्रेक्षकांमध्ये असावा, अशी भावोत्कट इच्छा त्यांनी प्रगट केली.


बालनाट्य संमेलनाची घोषणा; पालेकरांच्या सूचनांची ठरावातून अंमलबजावणी
संदर्भ - दै.लोकमत २२-१-२०१२

सांगली - अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचे आयोजनाची घोषणा आणि अमोल पालेकरांनी उद्घाटन सत्रात केलेल्या सूचनांची दखल घेणारा ठराव करून सांगलीतील ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सूप वाजले. मायभूमीने माझा उपयोग करून घ्यावा, असे नम्र आवाहन संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी केले. विष्णुदास भावे सभामंडपात झालेले खुले अधिवेशन आणि समारोप कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष मोघे, स्वागताध्यक्ष पतंगराव कदम यांच्यासह माजी अध्यक्ष राम जाधव, नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले,आदी उपस्थित होते.

पतंगरावांची चौफेर टोलेबाजी
आचारसंहितेमुळे बोलण्यावर मर्यादा असली, तरी महत्त्वाचे ‘योगदान’ मी दिले आहे, अशा शब्दात हशा पिकवत स्वागताध्यक्ष पतंगराव कदम म्हणाले, की भान ठेवून योजना आखल्या आणि बेभानपणे राबविल्या, त्यामुळे इथवर पोहोचलो आहे. अशीच भूमिका संमेलनाप्रतीही ठेवली. ज्येष्ठ कलाकारांना उतरत्या वयात येणारे प्रश्न मी जाणतो. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा असून, आचारसंहिता संपताच योजना जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

मायभूमीने उपयोग करून घ्यावा : मोघे
भावनावश होत संमेलनाध्यक्ष मोघे म्हणाले, ज्या भूमीत नाट्यप्रकार जन्मास आला त्याच भूमीतील माझा जन्म आणि त्याचठिकाणी संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने मी भरून पावलो आहे. माझा जितका उपयोग करून घेता येईल तेवढा या मायभूमीने करून घ्यावा, नाट्यसंमेलनाची शंभरी सांगलीत होवो आणि त्याचा साक्षीदार म्हणून प्रेक्षागृहात बसण्याची संधी मिळावी, असेही ते म्हणाले.

पालेकरांच्या सूचनांची दखल
सांगलीकरांचे उत्कृष्ट नियोजन आणि आदरातिथ्याने भारावून गेल्याची भावना व्यक्त करताना हेमंत टकले म्हणाले, पंचपक्वान्नांच्या ताटाला देखणी रांगोळी काढावी, असे देखणे संयोजन येथे पहावयास मिळाले. संमेलनाध्यक्षांचा मान महिलांनाही मिळावा, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे टकले यांनी स्पष्ट केले.

संमेलनातील ठराव

  • - बेळगावच्या महापौर मंदाताई बाळेकुंद्री व उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार्‍या कर्नाटक सरकारच्या कृतीचा संमेलनात निषेध करावा.
  • - तालुकास्तरावर नाट्यगृह व गावपातळीवर चौथरे बांधून द्यावेत, तसेच नाट्यगृहात नाटकासाठी दिलेल्या तारखा शासकीय कार्यक्रमासाठी काढून घेऊ नयेत.
  • - सेन्सॉर केलेल्या नाटकांना महाराष्ट्रात अडवणूक करू नये
  • - नाट्य परिषदेला बाल नाट्य संमेलन भरविण्यासाठी शासनाने पंधरा लाख अनुदान द्यावे.
  • - ‘आम्ही रंगकर्मी’साठी शासनाने निवास योजना करावी.
  • - रंगकर्र्मींना एसटी बसच्या भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळावी.