मुख्य विभाग

नाटय़संमेलनाचे आज उद्घाटन पीडीएफ प्रिंट ई-मेल
संदर्भ - दै. लोकमत सांगली। दि. 20
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेते अमोल पालेकर यांच्या उपस्थितीने रंगणार सोहळा बालगंधर्वनगरी,
‘घाशीराम कोतवाल’ने झालेली अभूतपूर्व नांदी आणि सांगलीकरांच्या ‘आरंभ ते प्रारंभ’ महानाटय़ाने दिलेल्या सलामीनंतर आता नाटय़संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा उद्या (शनिवारी) रंगणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह अर्धा डझन मंत्री आणि दिग्गज रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत.
नाटय़पंढरी सांगलीत गुरुवारी 92 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ नाटय़संमेलनाची नांदी झाली. कल्पद्रुम मैदानावर उभारण्यात आलेल्या बालगंधर्वनगरीतील मुख्य सभामंडपात उद्या उद्घाटन सोहळा होणार आहे. मुख्य व्यासपीठासह मंडपातील आसन व्यवस्था, ध्वनिसंयोजन, पाहुण्यांच्या स्वागताचे नियोजन, सुरक्षा, वाहतूक, निवास व भोजन व्यवस्था यांची आज मुख्य संयोजन समितीने पाहणी केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाची मिनीट-टू-मिनीट रूपरेषा तयार करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळा सकाळी दहा ते दुपारी सव्वाबारा या वेळेत होईल. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, उपाध्यक्ष विनय आपटे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दयानंद नाईक, कार्यवाह शफी नायकवडी यांनी उद्घाटन सोहळ्य़ाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडेल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. उद्घाटन समारंभास स्वागताध्यक्ष वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर रसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. दरम्यान, आज दिवसभरात स्थानिक कलाकारांचे विविध कलाविष्कार सादर झाले. सायंकाळी दीडशे स्थानिक कलाकारांच्या ‘आरंभ ते प्रारंभ’ या महानाटय़ाने पाहुणेमंडळी आणि सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
रंगकर्मींची मांदियाळी संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, स्मिता तळवलकर, विनय आपटे यांचे आज आगमन झाले, तर मोहन जोशी, सुधीर मोघे, लालन सारंग, आशालता वाबगावकर, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, वामन केंद्रे, फैय्याज यांच्यासह ‘कलारंग रजनी’चे पन्नासहून अधिक कलाकार उद्या पहाटे नाटय़पंढरीत दाखल होत आहेत.