मुख्य विभाग

सांगलीतील ६९वे नाट्यसंमेलन पीडीएफ प्रिंट ई-मेल
संदर्भ - लोकमत १७-१-२०१२ दिनराज वाघमारे। दि. 17 (सांगली)
रंगभूमीच्या शताब्दीनंतर तब्बल 45 वर्षे नाटय़पंढरीत नाटय़ संमेलन झाले नाही. 1988 ला तो योग जुळून आला. 69 व्या नाटय़ संमेलनाने नाटय़पंढरीला आयोजनाचा तिसरा मान मिळाला. वसंतदादा पाटील, शरद पवार, गंगाधर गाडगीळ, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन नाटय़पंढरीसाठी संस्मरणीय झाले.
1988 चा काळ हा नाटय़भूमीचा सुवर्णकाळ होता. जग आधुनिकतेच्या वाटेवर होते. रूपेरी पडदे व दूरदर्शनचा छोटा पडदा सप्तरंगी झाला होता. प्रसार माध्यमांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित व्हायला लागले होते. अशा सुवर्णकाळात नाटय़पंढरीत 69 वे नाटय़ संमेलन झाले. अभिनेते, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक व आमदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या राजाराम शिंदे यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राजस्थानचे तत्कालीन राज्यपाल वसंतदादा पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
राजवाडा परिसरातील राणी सरस्वती विद्यामंदिरमध्ये हे संमेलन घेण्यात आले. भावे नाटय़मंदिर संस्थेकडे संयोजन होते. ज्येष्ठ नाटय़कर्मी अण्णासाहेब कराळे हे कार्याध्यक्ष होते. सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गंगाधर गाडगीळ यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, सूर्यकांत मांडरे, दाजी भाटवडेकर, अशोक रानडे यांनी संमेलनास हजेरी लावली. मुख्य रंगमंचाला चिंतामणराव पटवर्धन यांचे नाव देण्यात आले होते. मराठी संमेलनात प्रथमच कानडी, गुजराथी नाटके झाली. ‘शब्द’ या एकाच विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र झाले. ‘बालगंधर्वाची गायकी’ हा दीपा कार्लेकर यांचा कार्यक्रम झाला. स्थानिक कलाकारांनी ‘मोगँबो’ व ‘शहाणेवाडा पुणे’ ही नाटके सादर केली. सुप्रसिध्द वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे समारोपातील भाषण संस्मरणीय ठरले.