मुख्य विभाग

आली तिसरी घंटा समीप... पीडीएफ प्रिंट ई-मेल

(सौजन्य - सकाळ वृत्तसेवा सांगली -) 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे. विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरील संमेलनाच्या मुख्य बालगंधर्वनगरीला स्वरूप येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र शिसवे यांनी आज मंडपस्थळी भेट देत सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली. संयोजन समितीने सांगली-मिरज शहरात काल रात्री उभारलेल्या भव्य डिजिटल फलकांमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे.

सुमारे दहा हजार प्रेक्षकसंख्या गृहीत धरून बालगंधर्वनगरीतील मंडपासह सर्व व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. संमेलनस्थळी मुख्य मंडपाशिवाय अन्य तीन मंडप आहेत. या तीनही मंडपात विविध कार्यक्रम सुरू राहतील. शहरात दीनानाथ नाट्यगृह, तर मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महापालिकेने या नाट्यगृहांतील सुविधांबत आज यंत्रणा कार्यान्वित केली. अधीक्षक शिसवे यांनी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंडपस्थळी भेट देऊन चर्चा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांची सुरक्षा जोखमीची असल्याने स्वयंसेवकांनी दक्ष राहावे, असे आवाहन अधीक्षकांनी केले.

संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातून येणाऱ्या नाट्यरसिकांच्या स्वागतासाठीचे डिजिटल फलक काल रात्री शहरभर लावण्यात आले. राजवाडा चौकात संपूर्ण नाट्यसंमेलनाची कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या डिजिटल फलकांवर नेत्यांच्या प्रतिमा टाळतानाच मराठी नाट्यपरंपरेचे अनेक टप्पे उलगडले आहेत.

संमेलनाच्या निमित्ताने सांगली परिसरातील सुमारे दीडशेंवर कलावंताच्या सहभागाने सादर होणाऱ्या महानाट्याची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. सांगलीच्या रंगभूमीचा इतिहास उलगडणारे महानाट्याच्या तालमी एकाच वेळी चार ठिकाणी सुरू आहेत. स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारक म्हणजे संमेलनाचे लगीन घर झाले असून जिल्हाभरातील नाट्य कलावंताची इथे वर्दळ सुरू असते.