मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली शेरी नाला योजना
शेरी नाला योजना पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली शहराजवळील वाहणारा शेरीनाला मुख्यत: पावसाचे पाणी व शेतीसाठी वापरलेले पाणी वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असे. हे पाणी साधारणपणे ४० चौ. कि.मी. एवढ्या परिसरातून येते. या परिसरात आता लोकवस्ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की या परिसरातील ८ ते १० लाख लिटर प्रतिदिन एवढे सांडपाणी या नाल्यामध्येच येते. घरगुती सांडपाण्याव्यतिरिक्त काही कारखान्यांचे सांडपाणी या नाल्यामध्ये पूर्वी येत असे. परंतु सध्या ते थांबले आहे. भविष्यांतसुध्दा कोणत्याही कारखान्याचे सांडपाणी या नाल्यामध्ये येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी घेण्यात येईल असे गृहीत धरूनच शेरीनाला शुध्दीकरण योजना फक्त घरगुती सांडपाण्यासाठी प्रायोजित करण्यात आली आहे.


सांगली शहरातील सर्व सांडपाणी सध्या ज्या पध्दतीने हाताळले जाते ते पाहिल्यास परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत येते. सध्या सांगली शहरात ४ ठिकाणी सांडपाणी गोळा होते.


१. कोल्हापूर रोड पंपिंग स्टेशन - येथील सांडपाणी ऑक्सिडेशन पाँडमध्ये शुध्द करून शेतीला दिले जात असे.परंतु सध्या हे पाँड तांत्रिकदृष्ट्या निकामी झाले आहेत. तसेच येथून शेतीला दिले जाणारे पाणी कमी असून बरेचसे पाणी हरिपूर नाल्यातून नदीला मिळते.
२. वखारभाग पंपिंग स्टेशन - येथील सांडपाणी शेरीनाल्यात जाऊन मिळते. नंतर शेरीनाल्यावर असलेल्या तात्पुरत्या बंधार्‍या त ते अडविले जाते. त्याठिकाणाहून हे सांडपाणी पंप करून सांगलीच्या बंधार्‍यापलिकडे नदीत सोडण्यात येते. पावसाळयात हा बांध फुटून सर्व सांडपाणी नदीत मिसळून गंभीर प्रदूषणाचे प्रसंग अनेक वेळा घडले आहेत.
३. सांगलीवाडी पंपिंग स्टेशन - कृष्णा नदीचे पश्चिमेकडील सांगलीवाडी भागातील सांडपाणी तेथून पंप करून कोल्हापूर रोड पंपिंग स्टेशनमध्ये टाकले जाते व तेथील सांडपाण्याबरोबर याची विल्हेवाट लावण्यात येते.
४. अमरधाम भागातील सांडपाणी सध्या थेट कृष्णा नदीत मिसळते.


शेरीनाला शुध्दीकरणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. शेरीनाला सांडपाणी शुध्दीकरणाची एक योजना मध्यंतरी मांडण्यात आली होती. त्यामध्ये सांगली शहराचे सांडपाणी दोन ठिकाणी शुध्दीकरण संयंत्राद्वारे शुध्द करून कृष्णा नदीत सोडण्याचे योजिले होते. परंतू या योजनेमध्ये दोन त्रुटी होत्या. एक विजेचा अतिरिक्त वापर व शुद्धीकरण पूर्णत: झाले नाही तर नदीच्या पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता. सांडपाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन वापरल्यास पाण्यामध्ये क्लोरोऑरगॅनिक संयुगे तयार होण्याची शक्यता असते. अशी संयुगे कर्करोगाला कारणीभूत असतात. यामुळेच राष्ट्रीय नदी कृति संचालनालयाने या योजनेला मंजुरी दिली नाही. त्यानंतर अन्य पर्यायांचा प्रस्ताव वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केला. यामध्ये सर्व सांडपाणी एकत्र करून सांगलीपासून दूर धुळगांव येथे पंप करून नेणे व तेथे त्यावर कमी खर्चाची, वीज न लागणारी शुध्दीकरण प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरणे अशी तरतूद होती.


या योजनेचा प्राथमिक अहवाल महाविद्यालयाने सादर केल्यानंतर एप्रिल १९९९ मध्ये त्याला तत्वत: मंजुरी मिळाली. या अहवालानुसार सदर योजनेचे सविस्तर व अंतिम अहवाल करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सोपविले. योजनेचा सविस्तर आराखडा, नकाशे, डिझाईन व खर्चाचा तपशील याचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय नदी कृति संचालनालयामध्ये या योजनेच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यांत आला व त्यामध्ये कांही बदल सुचविण्यात आले. त्याप्रमाणे सुधारणा करून योजना पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात आली. आता या योजनेस शासनाची मंजुरी मिळाली असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करावयाची आहे.

पूर्वपीठीका -
राष्ट्रीय नदी कृति योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ४ शहरांमध्ये योजना राबविण्यांत येणार आहे. त्यापैकी कृष्णा नदीकांठचे सांगली शहर आहे. सांगलीची लोकसंख्या १९९१ च्या जनगणनेनुसार १,९३,०३८ एवढी होती. सांगली शहराचे कृष्णा नदीमुळे दोन भाग झाले असून नदीपलिकडील सांगलवाडीचाही सांगलीत समावेश होतो. शेरी नाला व हरीपूर नाला असे दोन नाले या शहरातून जाऊन नदीला मिळतात. शेरीनाला उत्तरपूर्व दिशेकडून वाहत जाऊन नदीला मिळतो तर हरीपूर नाला पूर्वपश्चिम वाहून नदीला मिळतो. या दोन्ही नाल्यांतून शहरातील बरेचसे सांडपाणी नदीत मिसळून प्रदूषण होते.


१. लोकसंख्या - लोकसंख्यावाढीचा दर सांगलीसाठी सरासरी २५ टक्के प्रति दशक असा धरून भविष्यातील लोकसंख्या काढण्यात आली आहे.
२००१ - २,४१,२९४
२००६ - २,७१,४५९
२०११ - ३,०१,६२१
२०२१ - ३,७७,०२९
२०३१ - ४,७१,२८३

२. डिझाईनसाठी योजनेचे टप्पे - योजनेतील बांधकामे २०२१ साठी, पंपिंग मशिनरी २००६ साठी, सांडपाणी वाहून नेणारी पाईप २०३१ साठी आणि शुध्दीकरण यंत्रणा २०११ साठी डिझाईन केली आहे.

३. सांडपाणी निर्माण होण्याची क्षमता - सांगलीमध्ये दररोज दरडोई १३५ लिटर एवढे पाणी पुरविले जाईल असे धरण्यात आले असून त्यामुळे दररोज दरडोई ८७.७५ लिटर सांडपाणी निर्माण होईल असा अंदाज आहे.
भविष्यांत सांगली शहरात सांडपाणी निर्माण होण्याचा दर खालीलप्रमाणे राहील.
२००१ - २१.१९ दशलक्ष लिटर प्रतिदिन
२००६ - २३.८२ ,,
२०११ - २६.४७ ,,
२०१६ - २९.७८ ,,
२०२१ - ३३.०३ ,,
२०३१ - ४१.३६ ,,

वरील माहितीवर आधारित योजनेची तांत्रिक मांडणी खालील प्रमाणे करण्यात आली आहे.

अ) सांडपाणी एकत्रीकरण-
१. शेरीनाल्याजवळ काँक्रीटचा छोटा बंधारा बांधून नाल्यातील सर्व सांडपाणी अडविणे.
२. जे. जे. मारुती मंदिराजवळ नवीन पंपिंग स्टेशन बांधणे. अमरधाम भागातून येणारे सर्व सांडपाणी एकत्रित करून तेथून ते पंपाने शेरीनाला पंपिंग स्टेशनमध्ये घेणे.
३. सांगलवाडी व कोल्हापूररोड पंपिंग स्टेशनमधून सांडपाणी शेरीनाला पंपिंग स्टेशनमध्ये घेणे.
४. वखारभाग पंपिंग स्टेशन बंद करून तेथील सांडपाणी शेरी नाल्यामध्ये एकत्रित करणे.

ब) सांडपाणी पंपिग स्टेशन -
१) सध्या अस्तित्वात असणारी खालील पंपिग स्टेशन दुरुस्त करून वापरण्यात येतील.
१. सांगलवाडी पंपिग स्टेशन
२. कोल्हापूर रोड पंपिग स्टेशन
२) खालील पंपिग स्टेशन नवीन बांधण्यात येतील.
१. जे. जे. मारुती पंपिंग स्टेशन - ३.५ मी. व्यास आर. सी. सी.
२. शेरीनाला पंपिंग स्टेशन - १७ मी. व्यास आर. सी. सी.
३. कवलापूर पंपिंग स्टेशन - १७ मी. व्यास आर. सी. सी.

क) ग्रॅव्हिटी मेन व रायझिंग मेन
ग्रॅव्हिटी मेन
१. अमरधाम ते जे. जे. मारुती पंपिंग स्टेशन - ६०० मि. मी. व्यास आर. सी. सी.
२. `ड` चेंबर ते शेरीनाला पंपिंग स्टेशन - ६०० मि. मी. व्यास आर. सी. सी.
रायझिंग मेन -
१. सांगलवाडी ते `ड` चेंबर - ४८५ मी. लांब, २५० मि.मी. व्यास
२. जे. जे. मारुती ते `ड` चेंबर - १२५ मी. लांब, २५० मि.मी. व्यास
३. कोल्हापूर रोड ते `ड` चेंबर - १९४० मी. लांब, ५५० मि.मी. व्यास
४. शेरीनाला ते कवलापूर पंपिंग स्टेशन - ९२०७ मी. लांब, ९०० मि.मी. व्यास
५. कवलापूर ते धुळगाव शुध्दीकरण यंत्रणा - ९२०७ मी. लांब, ९०० मि.मी. व्यास

पंपिग मशिनरी - डिझाईन वर्ष २००६
१. जे. जे. मारुती पंपिंग स्टेशन - ५ पंप - प्रत्येकी ५ एच्. पी. - सबमर्सिबल पंप
२. सांगलवाडी पंपिग स्टेशन - ५ पंप - प्रत्येकी ५ एच्. पी. - सबमर्सिबल पंप
३. कोल्हापूर रोड पंपिग स्टेशन - ३ पंप - प्रत्येकी ७५ एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप
२ पंप - प्रत्येकी २५ एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप
४. शेरीनाला पंपिंग स्टेशन - ३ पंप - प्रत्येकी ४०० एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप
२ पंप - प्रत्येकी २०० एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप
५. कवलापूर पंपिंग स्टेशन - ३ पंप - प्रत्येकी ३५० एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप
२ पंप - प्रत्येकी २०० एच्. पी. - सेंट्रिफ्युगल, नॉन क्लॉग पंप


क) योजनेच्या खर्चाचा तपशील
१. सांडपाणी एकत्रीकरण व धुळगावला पंप करणे
सिव्हिल कामे - १४७७ लाख
पंप - ३५३ लाख
इलेक्ट्रिकल ट्रान्स्मिशन लाईन्स - १८९ लाख
==========
एकूण २०१९ लाख
+ ८% सेंटेज चार्जेस १६२ लाख
===========
एकूण २१८१ लाख

२. सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा
एकूण खर्च - २९६ लाक
एकूण योजनेचा खर्च - २४७७ लाख
३. दुरुस्ती व देखभालीचा खर्च - वार्षिक रु. १९२ लाख
ड) सांडपाणी शेतीला देऊन मिळणारे उत्पन्न
शुध्द केलेले सांडपाणी धुळगाव आणि त्याच्याजवळील साधारण ६०० हेक्टर शेतजमिनीस पुरवठा करून महापालिकेला वार्षिक उत्पन्न मिळू शकेल.
सदर पाणी शेतकर्‍यांना रु. १०,००० प्रति हेक्टर प्रति हेक्टर प्रति वर्ष या दराने जर विकले तर मिळणारे उत्पन्न रु. ६० लाख / प्रति वर्ष


त्यामुळे महानगरपालिकेला प्रत्यक्ष बोजा रु. १९२ लाख - रु. ६२ लाख = रु. १३२ लाख प्रतिवर्षी एवढा पडणार आहे.
सांडपाणी पंपदेखभालीचा सध्याचा महापालिकेचा खर्च रु. ७७ लाख प्रति वर्ष एवढा आहे. त्यामुळे प्रत्यक्षांत सध्यापेक्षा रु. ५५ लाख प्रति वर्ष एवढाच जादाचा बोजा पडणार आहे.


एकंदरीत सदरहू योजना लवकरात लवकर कार्यान्वित केल्यास सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच धुळगाव भागातील शेतीला मुबलक, सेंद्रीय खतयुक्त पाणी कमी खर्चात मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदतच होईल. या सर्व दृष्टीकोनातून एक बहुउद्देशीय बहुउपयोगी अशी ही आव्हानात्मक योजना वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाने प्रा. ज. म. गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली आहे.