मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली सांगलीतील ज्ञानदीप - कल्पवृक्ष
सांगलीतील ज्ञानदीप - कल्पवृक्ष पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली संस्थानचा तो सुखद काळ

१९४० ते ४२ पर्यंत मी बालशिक्षण मंदिराच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होतो. त्या काळात आमच्या शाळेत एक प्रार्थनागीत होते. ते संस्थानच्या राजकवी साधुदास यांनी लिहिले होते. `हेरंबा अति सदया, सती पार्वती तनया, पटवर्धन वरदसुता` अशी ती रचना होती. त्याची चाल पोलिसी बँडच्या तालावर वाजवता यावी अशी होती. संस्थानाधिपती आप्पासाहेब पटवर्धन यांच्या रसिकतेचे, सर्वगुणसंपन्नतेचे द्योतक ठरेल असे ते एक प्रार्थनागीत होते. ते एक अशा तऱ्हेने रचलेले आणि म्हटले जाणारे किंवा बँडवर वाजविले जाणारे होते की संस्थानचा सारा इतिहास प्रजाजनांच्या डोळयासमोर तरळून जायचा. हे संस्थान कसे निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, या सार्‍या गोष्टींची जाणीवपूर्वक उत्सुकता सर्व प्रजाजनांच्या मनात यामुळे निर्माण होत असे. खर्‍या अर्थाने ते सोपे पण संस्थानाबद्दल उत्सुकता आणि राजघराण्याबद्दल आदर निर्माण करणारे प्रार्थनागीत होते. सांगलीचे संस्थान केंव्हा निर्माण झाले? त्याचे पहिले अधिपती कोण? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. संस्थानचे गुणविशेष सांगणारा सारा इतिहास डोळयापुढे तरळू लागायचा.
पटवर्धन घराण्याची आराध्यदेवता `श्रीगणेश`. त्या श्रीगणेशाचेच हे संस्थान. सार्‍या पटवर्धनांची संस्थानिक म्हणून प्रस्थापना करणार्‍या पेशवे घराण्याची श्रद्धा या सदाशिवपुत्रावर म्हणजेच या मंगलमूर्तीवर होती. पटवर्धन घराण्याचे हरभट हे गणेशाचे महान उपासक होते. ते इकडे आले ते कोकणातूनच. त्यांनी दुर्वांचा रस प्राशन करून श्रीगणेशाची उपासना केली. मोठ्या भक्तिभावाने केलेली त्यांची ही उपासना लवकरच सफल झाली.


हे पटवर्धन घराणे पेशव्यांचे पाईक बनून सैन्यात सामील झाले. आणि लवकरच पेशव्यांचे सरदार बनून या दक्षिण महाराष्ट्राचे संस्थानाधिपती बनले. सरदार पटवर्धनांची ही उज्वल परंपरा महाराष्ट्राच्या सैन्यबळाला जवळजवळ पन्नास वर्षे प्रेरणा देत राहिली. पुण्यात गोपाळराव पटवर्धनांपासून पुढे ही परंपरा परशुरामभाऊ पटवर्धनांच्या काळापर्यंत अधिकच उज्वल होत होती. ही परंपरा इतिहास संशोधकांचा अभिमानविषय ठरली आहे. मिरजेच्या वासुदेवशास्त्री खरे यांच्या इतिहास संशेधनात पटवर्धन घराण्याचा इतिहास हाही एक महत्वाचा विषय ठरलेला आहे.

कालक्रमानुसार मूळ संस्थान तासगाव येथे होते. ते परशुरामभाऊ पटवर्धनांनंतर मिरज, बुधगाव, जमखंडी, कुरुंदवाड अशा ठिकाणी विभागले गेले. ही सारी स्वतंत्र संस्थानेच बनली. सांगली हे संस्थान त्यानंतर निर्माण झाले.
कालौघात ही सारीच संस्थाने रेसिडेंटच्या हुकमतीत गेली. सांगलीचा शैक्षणिक विकास प्रामुख्याने त्यानंतरच झाला. वेदशाळेपासून इंजिनिअर कॉलेजपर्यंत शैक्षणिक विकास झाला तो प्रामुख्याने या काळात झाला. अगदी आश्रमपद्धतीपासून महाविद्यालयांच्या बांधणीपर्यंतची कार्ये याच काळात झाली. त्याचप्रमाणे विलिनीकरण होण्याच्या काळातही संस्थानाधिपतींचे अमोल सहाय्य शैक्षणिक संस्थांना मिळाले आहे. सांगली हायस्कूलच्या बरोबरीने सिटी हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या शाळा तसेच राणी सरस्वती कन्याशाळा यांची संवृद्धीही संस्थानाधिपतींनी केलेल्या अमोल साहाय्यानेच झालेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या सांगलीचा उत्कर्ष याच काळात झालेला आहे.


सांगलीकरांचे ज्या शैक्षणिक संस्थांना सतत सहाय्य मिळाले त्या सर्वच संस्थातून सतत नामवंतांची निर्मिती होत गेली. उत्तम विद्यार्थी निर्माण होत होते त्याला कारण त्या सर्व संस्थातून उत्तम शिक्षकही लाभलेले होते. कै. पाटील गुरूजी, केशवराव दीक्षित, शंभुराव आपटे, कै.दतवाडकर गुरूजी असे नामवंत संस्कृत शिक्षक याच काळात आपापल्या संस्थातून काम करत होते.


याच काळात विलिंग्डन महाविद्यालय हेही सतत प्रगतीपथावर राहिले. त्यानंतर चिंतामणराव पटवर्धन कॉमर्स, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजही याच काळात उभे राहिले. पुढे त्याच तोलामोलाचे शैक्षणिक कार्य कै. नामदार वसंतराव पाटील यांच्या अमोल साहाय्याने आजच्या शैक्षणिक संस्थांतून निर्माण झाले. त्यांच्यामुळेच खुद्द सांगलीत शांतीनिकेतन कॉलेज निर्माण झाले. सांगली हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, आर्टस् सायन्स कॉलेज हे सर्व शैक्षणिक काम त्यांच्याच दिव्य प्रेरणेतून निर्माण झाले आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर शिक्षण योजनेतूनही त्यांनी निर्माण केलेले हे काम अद्वितीय आहे.

याच्याबरोबरीनेच आरवाडे हायस्कूल तसेच सांगलीतील इतर काही शैक्षणिक संस्था या अलौकिक ठरल्या आहेत. विविध क्षेत्रातील प्रगती या सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकाकडूनच झालेली आहे. या सर्व महान शिक्षकांचा त्या त्या क्षेत्रातील अद्वितीय वाटा उल्लेखनीय आहे.


व्यायाम क्षेत्रात रास्ते सर, नातू सर, शंभुराव आपटे, दामुआण्णा केळकर, जोगळेकर सर आरवाडे हायस्कूलचे संस्थापक दत्तोपंत आणि विनायकराव आपटे, सांगली हायस्कूलमधील काटे सर इत्यादि नामवंत शिक्षक अग्रभागी असायचे. त्यांच्यामुळे मल्लखांब, कुस्ती जिवंत होते. क्रीडामंडळे सजीव होती. कृष्णा नदी सजग असायची. पोहणारे अनेकजण पुराच्या काळात तेथेच हात मारत असायचे व पुलावरून उड्या मारून या काठावरून त्या काठावर पोहत असायचे. पोहणार्‍यांची ही प्रगती वरील सार्‍या शिक्षकांमुळेच झाली होती. या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हुतुतू, खोखो, लंगडी, रिंग टेनिस यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे. क्रीडाक्षेत्र सार्‍या महाराष्ट्रभर गाजविले ते या सर्व गुरूवर्यांमुळेच.


इंग्रजीचे नामवंत अध्यापक म्हणून त्या काळातील कै. हणमंतराव गोखले, नानासाहेब फाळके, गोपाळराव करंदीकर, गोपाळराव रानडे हे त्या काळातील उल्लेखनीय शिक्षक होते. गोविंदराव मराठे, ताम्हनकर, के. जी. मराठे, हरिकाका सहस्रबुद्धे हे नामवंत गणित शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते. पण यापैकी सर्वजणच अन्य क्षेत्रेही गाजवीत होते. कोणी नाट्यक्षेत्रात प्रवीण ठरले होते. तर कोणी बुद्धिबळ गाजविले होते. काहींनी संगीतक्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. अध्यात्मक्षेत्रात अधिकार मिळविलेल सुद्धा काही शिक्षक होते. अशा तऱ्हेने शैक्षणिक क्षेत्रात केवळ शालेय पुस्तकी शिक्षण असे न राहता सर्वच संस्थांकडून विद्यार्थ्यांची जीवन विकासाची प्रगती होत होती. जुन्या काळापुरते बोलायचे झाले तर या सार्‍या शिक्षण क्षेत्रात केवळ तत्वज्ञानात्मक किंवा पुस्तकापुरत्या मर्यादित शिक्षणविचारचर्चा फारशा होत नसत पण सारे शिक्षणक्षेत्र जिवंत, रसरसलेले आणि कृतिशील असायचे. प्राथमिक शाळा यासुद्धा जिवंत असायच्या. तिरमारे गुरूजींसारखा महान शिक्षक हरिजनांसाठी शाळा चालवत असायचा. प्रगतीच्या चारी वाटांवरून शैक्षणिक प्रगती या जुन्या काळात होत होती. सर्वांच्यावर सारखे प्रेम ही नामवंत मंडळी करत असत. तसेच शिक्षकांबद्दल सारखाच आदरभाव विद्यार्थ्यांत असायचा. कारण `सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्यसंपदा हे त्या काळात सर्वच शिक्षणसंस्थांचे ब्रीदवाक्य असायचे.