मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली माळराणी-(सांगली मिरज रेल्वे)
माळराणी-(सांगली मिरज रेल्वे) पीडीएफ प्रिंट ई-मेल
प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख.

मिरजेहून निघालेल्या आमच्या गाडीचा वेग अधिकच मंदावल्यासारखा वाटला म्हणून मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं, तेव्हा कंदिलाच्या अंधुक प्रकाशामध्ये मला स्टेशनच्या नावाची पाटी दिसली, ‘विश्रामबाग’.

गाडी थांबताच मी खाली उतरले आणि सामानही उतरविले. एखादा हमाल कोठे दिसतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागले तर सगळा शुकशुकाटच! ‘कोणाकडे चौकशी करायची बाई आता?’, मी मनाशीच म्हटले. तेवढ्यात डाव्या हाताला उभा असलेला एक मालगाडीचा डबा दिसला. त्यातून काळसर रंगाचे एक मध्यम वयाचे गृहस्थ बाहेर आले. त्यांनी सदरा आणि लुंगी असा पोशाख घातला होता. माझ्याकडे वळून ते म्हणाले, "तिकिट कूऽरि" क्षणभर मला काहीच कळेना. त्यावर ते पुन्हा म्हणाले, " तिकिट प्लीज." तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे इथले स्टेशनमास्तर आहेत. आणि हा मालगाडीचा डबा हेच त्यांचे ऑफिस आहे.

मग इंग्रजी वाक्यांची मनाशी कशीबशी जुळणी करीत मी त्यांना सांगितलं, "मला विलिंग्डन कॉलेजातल्या मुलींच्या वसतिगृहात जायचे आहे. त्यांनी बर्‍याच हाका मारल्यानंतर एक म्हातारा पोर्टर विडीचा झुरका घेत माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझे सामान डोक्यावर घेऊन मास्तरांनी सांगितलेल्या दिशेने चालू लागला. ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातले दिवस असल्याने पावसाची रिपरिप चालू होती. त्यामुळे रस्त्यावर वर्दळही बेताचीच दिसत होती. चालता चालता मी सहज मागे वळून पाहिले, तर सांगलीच्या दिशेने कूच केलेल्या गाडीचा अस्पष्ट आवाजच तेवढा माझ्या कानी पडला.

मिरज-सांगली हा सात मैलांचा रेल्वेचा छोटासा फाटा. मिरज, वानलेसवाडी, विश्रामबाग, सांगली अशी त्याच्यावरची चार स्टेशनं. आणि झुकुझुकु करीत चालणारी त्यावरून चालणारी सात-आठ डब्यांची ही गाडी. या सार्‍याचीच मला अपूर्वाई वाटली. दिवाळीच्या किल्ल्याभोवती आपण सजावट करतो ना, तशी दिसली मला ही! आणि प्रथमदर्शनीच मी तिच्या प्रेमात पडले. विचारांच्या तंद्रीत स्टेशनापासून सात-आठ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या विलिंग्डन कॉलेजच्या प्रशस्त आवारात मी केव्हा पोचले ते मला कळलेच नाही. ही १९४२ सालातली गोष्ट.

उद्याच्या पंधरा एप्रिल (१९७२) पासून पुणे-मिरज ब्रॉडगेज गाडी सुरू होणार. आणि त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्राच्या माळावरून धावणारी आमची ही चिमुकली ‘माळराणी’ दिसेनाशी होणार या विचाराने उदास झाले आणि गेल्या दीड-दोन तपांच्या तिच्या माझ्या सहवासातील अनेक आठवणींनी माझे मन भरून आले.

मी इथे शिकत असताना आम्ही सारे विद्यार्थी मिळून असू तीनशे-साडेतीनशेच्या आतबाहेर. आजच्याप्रमणे त्यावेळीही बहुतेक मुले-मुली सांगली-मिरजेहून आगगाडीनेच येत जात. कॉलेजचे तास संपवून ही सर्व मंडळी आपापल्या घरी गेली की आम्हा वसतिगृहात राहणार्‍यांना आपले एकटेपण फारच जाणवायचे. रविवारी तर आवारात ‘सारं कसं शांत शांत’ व्हायचं. मग घराच्या आठवणींनी जीव रडवेला व्हायचा आणि वाटायचं काही नको हा अभ्यास-बिभ्यास. जाऊ या घरी दादाकडे पळून या गाडीत बसून! कारण त्या एकाकी क्षणी ही गाडीच आमची मैत्रीण आणि एकमेव विसावा असायची!

विश्रामबागचा परिसर म्हणजे त्यावेळी एक आटपाट नगरच होतं म्हणा ना! तिथं राहणार्‍या सार्‍यांचं जीवन घड्याळापेक्षाही हिच्यावरच अधिक अवलंबून. अगदी आजतागायतसुद्धा. स्नेहसंमेलनाचं नाटक सुरू करायचं असू दे, की कुठ हळदीकुंकवाला जायचं असू दे. आम्हा शिक्षकांना एखादा जादा तास घ्यायचा असू दे की विद्यार्थ्यांना तो बुडवायचा असू दे. सर्वांच्या बोलण्याचे पालुपद तेव्हा आणि आत्ताही एकच. ‘दहा-पंचावन्नची गाडी आली का हो?’ ‘तीनची गाडी गेली का हो?’

कॉलेजातल्या समारंभांना येणार्‍या पाहुण्यांना पुष्कळदा आम्हाला खाजगी आवाजात सांगावं लागतं, ‘माफ करा हं, पण आपला कार्यक्रम पाचच्या गाडीच्या आधी संपवता आला तर फार चांगलं होईल. नाही म्हणजे आमचे विद्यार्थी -" पुढचं सारं आम्ही न संगताच चतुर वक्ते जाणतात त्यामुळं सभास्थानी निर्माण होणार्‍या कितीतरी संकटातून आम्ही संयोजक बचावतो!

इथं सकाळी जाग येते ती पहाटेच्या गाडीच्या शंटिंगमुळं आणि रात्री पेंग येते ती दहाच्या गाडीच्या शिट्टीमुळं! चांदण्या रात्री वसतिगृहातल्या आम्ही मुली कधी बाईंना विचारून तर कधी चक्क त्यांच्या हातावर तुरी देऊन घोळक्यानं फिरायला बाहेर पडत असू. स्टेशनवरचा वाळूच ढीग हे आमचं आवडतं ठिकाण. एखादं झाडझुडूपही भोवती नसल्यानं एरवी ओकबोकं वाटणारं आमचं स्टेशन चंदेरी प्रकाशात त्यावेळी नुसतं चमचमत असायचं. मग तिथं गप्पा-गाण्यांची मैफल रंगायला उशीर कशाला होतोय आणि दुसरे दिवशी सकाळी जाग तरी वेळेवर कशाला येतेय? पण जेव्हा ती येई तेव्हा आवारातला पारिजातकाचा किंवा बकुळीचा सडा वेचायला आम्ही अहमहमिकेनं धावत असू.

त्या धावपळीत एक दृश्य नेहमीच पाहायला मिळायचं. आपल्या घराच्या फाटकात दीड-दोन वर्षाच्या छोकर्‍याला कडेवर घेऊन आमचे अत्यंत आवडते प्रिन्सिपल गोकाक उभे असायचे. साडेसहा, पावणेसातचा सुमार झाला म्हणजे मिरजेकडून झुकझुक करीत गाडी येताना दिसायची. ती दिसू लागली की ते म्हणायचे, "अनिल गाडी बन्तु, गाडी नोडु."

अन्‌ मग तिच्याकडे पाहत तो हसू, खिदळू लागला की तेही मनापासून हसायचे. असामान्य विद्वत्ता आणि विलक्षण भाषाप्रभुत्व यामुळं ज्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली त्या आमच्या या गुरुदेवांपुढे वावरताना एरवी आमची मने आदरानं आणि संकोचानं कशी दबून जायची! पण त्यांच्या वात्सल्याचे हे हृदयंगम दृश्य पाहताना मात्र ती एकदम फुलून, उमलून यायची.

कॉलेजचा शेवटचा तास संपल्याची घंटा द्यायला गड्याकडून केव्हा केव्हा उशीर व्हायचा किंवा शिकवण्यात रंगून गेल्यमुळं प्राध्यापकांचं क्वचित्‌ घंटेकडे दुर्लक्ष व्हायचं. तसं झालं म्हणजे गाडी गाठणार्‍या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडून जायची. कारण सांगलीकडची गाडी स्टेशनात यायला आणि मुलांना कॉलेजातून बाहेर पडायला एकच गाठ पडायची. कॉलेज ते स्टेशन हे अंतर अशावेळी फार लांब वाटायचं. ते कमी व्हावं म्हणून मुलांनी आपली कल्पक डोकी चालवून आवारातून, शेजारच्या शेतातून असे कितीतरी शॉर्टकटस्‌ काढलेले असायचे. मुलामुलींची ही पळापळ गाडी आमच्या स्टेशनापासून दूर अंतरावर असायची तेव्हापासूनच उतारूंना पाहायला मिळयची आणि त्यामुळं त्यांची करमणूकही व्हायची.

संध्याकाळच्या या गाडीवर त्यावेळी एक ख्रिश्चन गार्ड होता. तो मुलांची ही धांदल पाहून खूप हसायचा आणि दोन्ही हातांनी चुटक्या वाजवीत, अभिनय करीत पळा-पळा असा इशारा द्यायचा. गाडीचा वेग मंद होऊन ती स्टेशनात येऊन उभी राहिल्यावर मुलामुलींची टोळकी काही डब्यात शिरत तर काही कुणाच्याच दटावणीला न भिता फुटबोर्डावरच उभी रहात. डब्यात भरपूर जागा असतानाही बाहेरच्या लोखंडी दांड्याला लोंबकाळण्याची त्यांना कोण हौस! हे सारे पाहताना तो वृद्ध गार्ड त्यांच्यावर रुष्ट झाल्याचा आव आणून मुलांच्या अवखळपणाचा आनंद डोळे भरून पाहायचा आणि मनाशीच काहीतरी पुटपुटत आपल्या डब्यात चढता चढता हिरव्या निशाणानं ‘अलबेल’चा संदेश ड्रायव्हरकडं धाडायचा. हळुहळू गाडीने वेग घेतला म्हणजे समोरच्या समांतर जाणार्‍या डांबरी रस्त्यावरून दुचाकीने जाणार्‍या विद्यार्थ्यांची गाडीशी शर्यत सुरू होई. त्यावेळी ते करीत असलेले सर्कशीचे विविध प्रयोग अणि रस्त्यावरून गाडीतील दोस्तांशी आव्हान-प्रति-आव्हानांची त्यांची चाललेली देवघेव यातले अधिक मनोरंजक काय ते ठरविणे कठीण होई. लेव्हल क्रॉसिंगवर मात्र या स्वारांना पराभूत होऊन धावावेच लागे अणि मग विजयी सम्राज्ञीच्या दिमाखात ही आगगाडी पुढे जाई. तेव्हा वाटेत ‘गजानन मिल्स’ची इमारत लागे. तिथल्या भिंतीवर ‘मला बाई गजानन मिल्सचीच पातळे आवडतात’ अशी सचित्र जाहिरात असे. तिचा मोह या माळराणीलाही बहुधा पडत असावा. तसे नसते तर काही ना काही निमित्ताने ती येथे कशाला थांबावी? मग विद्यार्थी आपापसात म्हणायचे ‘मलाबाई स्टेशन आलं रे!’ आणि खुशाल उड्या टाकून आपापल्या घराचा रस्ता सुधारायचे. गाडीही गावाच्या भर वस्तीतून जात सांगली स्टेशन गाठायची. आज वर्षानुवर्षे हे चित्र पाहूनही त्यापासून मला होणारा आनंद तितकाच ताजा राहिला आहे. सार्‍याच शहरातून आगगाड्यांची धावपळ सुरू असतेच की! पण तिथे राहणार्‍या माणसांच्या जीवनात हिच्यासारखे जिव्हाळ्याच्या कुटुंबीयाचे स्थान त्यांच्यापैकी कितीजणींना लाभत असेल?

खरेदी असो की नाटक-सिनेमा असो, अशा नैमित्तिक गोष्टींसाठीही आम्हाला सांगलीलाच धावावे लागे. संध्याकाळचा सिनेमा संपल्यावर एकदा मी आणि सुलोचनाने रात्री दहाची शेवटची गाडी कशीबशी गाठली आणि समोर आलेल्या डब्यातच घाईघाईने बैठक मारली. जवळजवळ रिकाम्या असलेल्या डब्याकडे पाहात ती म्हणाली, " मालती, आज शनिवारचा बाजार तरीदेखील किती छान जागा मिळली नाही आपल्याला?" माझ्याच मनातला विचार तिने बोलून दाखविला असल्याने तिच्या हातावर टाळी देत मी संमतिदर्शक मान डोलावली. ‘येईलच आता विश्रामबाग, तोवर होऊ या की जरा आडव्या." असे म्हणून आम्ही जरा लवंडलो. तेवढ्यात गाडीने वेग घेतला आणि डब्याचा दरवाजा खाडकन्‌ उघडला. तो लावावा म्हणून मी जरा उठले, तो दिव्याच्या प्रकाशात डब्यावरच्या पाटीवरील अक्षरे दिसली. तेथे लिहिले होते, "For lepers only" आम्हाला मिळालेल्या ऎसपैस जागेचे रहस्य असे अनपेक्षितरीत्या उलगडले खरे, पण त्यामुळे आमच्या जिवाचे अगदी पाणी पाणी झाले. मुक्कामाला पोहोचताच तशा अवेळी बंब पेटवून आम्ही सचैल स्नाने केली तेव्हा कुठे आमचा जीव जरा भांड्यात पडला. या गाडीने केलेली ही फजिती मी कशी विसरेन?

मिरजेहून येणारे एक प्रोफेसरसाहेब म्हणजे होती मोठी वल्ली. कॉलेजचे काम संपले रे संपले की ते न चुकता स्टेशनवर येऊन बसत. मिरजेहून गाडी आली की सांगलीला जात आणि परत फिरणार्‍या गाडीने मिरजेला जात. रात्री या गाडीची जा-ये थांबेपर्यंत त्यांच्या अशा अखंड फेर्‍या चालत. ‘हे हो काय साहेब तुमचे?’ असे कोणी विचारले तर उत्तर मिळे, "कोणाच्या काकाची भीति आहे मला? मी काही फुकट्या नव्हे. मिरज -सांगलीचा पास आहे म्हटलं माझा." प्रश्न विचारणार्‍याचा चेहरा मग कसा होई ते काय सांगायला हवं?

वांगी-तंबाखू याबरोबरच आमचा हा सांगली-कोल्हापूरकडचा प्रदेश कुस्तीसाठीही प्रसिद्ध. आमच्या कॉलेजच्या जवळ स्टेशनच्या पिछाडीला एक मोठं मैदान आहे. तिथं कुस्त्यांचा फड भरला म्हणजे आसमंतातल्या पन्नास-शंभर मैलांवरून शौकीन मंडळी या गाडीने यायची. त्यावेळचा तिचा थाट वेगळाच असायचा. त्यावेळी आमची गाडी अंतर्बाह्यच काय पण आपादमस्तकसुद्धा माणसांनी भरून सांडायची. गाडीच्या टपावर टिच्चून भरलेल्या हौशा-गवशांची रंगीबेरंगी मुंडाश्यांनी, पटक्यांनी आणि इंजिन अणि डबे यांना त्यांनी घातलेल्या हार-तुर्‍यांनी ती गाडी नटून सजून आलेल्या नववधूसारखी वाटायची. ती चालायचीही या नववधूसारखी ठुमकत. कुस्तीप्रमाणेच इकडच्या परिसरात एखाद्या लोकप्रिय पुढार्‍याचे भाषण असले की अशीच गर्दी लोटायची. या धुमश्चक्रीत लहानमोठे, स्त्रीपुरुष (हो स्त्रियासुद्धा) बिनतिकिटाच्या प्रवासाची मौज मनसोक्त लुटायचे. त्या मौजेत आमचे स्टेशनमास्तर कम्‌ तिकिटकलेक्टरही आनंदाने सहभागी व्हायचे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध सुखदुःखांची एकमेव साक्षीदार म्हणजे ही गाडी! स्नेहसंमेलनाच्या नाही तर जिमखान्याच्या निवडणुका आल्या की त्याची वार्ता गाडीवर लिहिलेल्या प्रचारफलकातून थेट सांगली-मिरजेच्या नागरिकांना सुद्धा मिळे. वार्ताहरीच्या हिच्या कामगिरीबरोबर कॉलेजातील अनेक प्रेमी जीवांच्या संकेत स्थलांचेही काम ही विश्वासाने बजावी. कधी कधी मात्र त्यांच्या ताटातुटीचे वा वियोगाचे प्रसंगही हिला दुर्दैवाने पाहावे लागत.

पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यावेळी पुणे-कोल्हापूर अशा गावी जावे लागे. मार्च महिना आला की विद्यार्थ्यांची हळुहळू पांगापांग सुरु होई. परगावी जाणार्‍या या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे मित्रमंडळ जमे. सार्‍यांच्याच मनात त्या प्रसंगाला उद्देशून गुरुजनांनी दिलेला भावपूर्ण निरोप सरत्या सायंप्रकाशाप्रमाणे रेंगाळत असायचा. पुन्हा आपल्या गाठीभेटी कधी होतील या विचाराने त्यांच्या मनात कालवाकालव व्हायची. पण वरवर हसतमुखाने साधारण असा संवाद चालायचा. ‘बराय, येतो आम्ही!’, ‘आठवण ठेवा, बरं का आमची!’, ‘बोलल्या-चालल्याचा राग न धरणे’. हे शब्द बोलत असताना निरोप घेणार्‍या विद्यार्थ्यांचे डोळे, विद्युद्दीपाने नटल्यामुळे शोभिवंत बनलेल्या समुद्रातील एखाद्या बोटीप्रमाणे दिसणार्‍या, आपल्या वसतिगृहाकडे वळत आणि स्वर ओला होई. फलाटावरील मंडळी उत्तर देत, ‘म्हटलं आठवण तुम्हीच ठेवा’ ‘लाडूबिडूच्या धांदलीत सगळंच विसरून जाल नाही तर!’, ‘रिझल्टनंबर न विसरता कळवा हं!’, ‘बेस्ट लक!’ निरोप घेणार्‍यांच्या ओठावर उमटते न उमटते तोपर्यंत गाडीने स्टेशन सोडलेले असे.

सांगलीतच जन्मलेला आणि वाढलेला माझा मित्र गोपाळ. त्याच्या भेटीची एक आठवण मला कधीच विसरता येत नाही. बुद्धीने बेताचा पण मनाने लाख मोलाचा असा हा माझा हा खेळाडू मित्र, किरकोळ कामासाठी मी सांगलीत गेले असता, माझ्याबरोबर हिंडला-फिरला. उसाचा रस पिऊन ताजेतवाने झाल्यावर आम्ही स्टेशनवर आलो. डब्यात बसलेल्या मला उद्देशून गाडी सुटताना तो म्हणाला, "परवाच्या दिवशी मी परिक्षेला पुण्याला जाणार. मग महिनाभर तुझी भेट नाही व्हायची, खरं ना? प्रकृतीला जप. तुझीच काळजी मला अधिक वाटते." त्याच्या मृदु स्वराने माझे अंतःकरण भरून आले. "तू उगीच काळजी करतोस माझी.", मी म्हटले. तेवढ्यात गाडीचे इंजिन वळून येऊन डब्याल जोडले गेले. आणि मी आणखी काही बोलण्यापूर्वी गाडी सुटलीही. चालत्या गाडीबरोबर तोही चालू लागला. आणि टपोर्‍या मोगर्‍याच्या फुलांची वेणी पटकन्‌ माझ्य़ा हातावर ठेवीत, " या मोगर्‍याच्या फुलासारखीच तू मला-" असे काहीसे म्हणाला. गाडीच्या खडबडाटात बुडून गेलेले त्याचे अस्फुट शब्द मला आपोआपच उमगले , आणि त्याच्या सुदृढ हातांचा स्पर्श किती वेळ तरी जाणवत राहिला. आता गोपाळ या जगात नाही. अजूनही विश्वास बसत नाही माझा, पण दुसर्‍याच दिवशी शिवरात्रीच्या रात्री मेंदूतील रक्तस्रावाने तो अकस्मात कालवश झाला. त्याची माझी योगायोगाने अखेरचीच ठरलेली भेट याच गाडीने एकटीने पाहिली.

अशा हिच्या किती आठवणी सांगाव्या? अनेक प्रकारच्या शिक्षणसंस्था आणि उद्योगधंदे यामुळे विश्रामबाग आणि भोवतीचा परिसर या पंचवीस वर्षात आता कितीतरी बदलला आहे. शहरी संस्कृतीची उबग आणणारी वर्दळवावटळ-माणसांची व वाहनांचीही आता येथेही जाणवू लागली आहे. त्या सार्‍यात मुळीच बदलली नाही ती आमची ही गाडी. तिचा वेग तिचे रंगरूप सारे होते तसेच आहे. अनेक विद्वानांचा, कलवंतांचा, विविध क्षेत्रातील गुणी जनांचा अस्त आणि उदय विपत्ति आणि वैभव हा अर्धशतकापेक्षा अधिक काळ स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने हिने पाहिले.

स्वप्नवेडे आणि आदर्शावर प्रेम करणारे माझे विद्यार्थिजीवन आणि प्रौढ वयातले आत्ताचे चाकोरीबद्ध व्यावसायिक जीवन ही दोन्ही स्थित्यंतरे हिने जवळून पाहिली. अन्‌ वेळोवेळी माझ्य़ा एकाकी जीवनात मला साथ-सोबत केली. जीवनाच्या गतिमानतेची ओळख हिनेच मला करून दिली. अश्रद्ध आणि यांत्रिक झालेल्या आजच्या जमान्यात श्रद्धा आणि प्रसन्नता कशी जपावी हे हिनेच मला शिकविले. आगगाडी आणि बालपण यांचे अवीट आणि अतूट असलेले गोड नाते हिनेच आजवर सहजपणे जपले. हिच्या बरोबरच एकपरी ते निरागस बाल्यही आता हरपणार ही कल्पनाही मला सहन होत नाही. भकास, रिकाम्या फलाटाकडे एकटक पाहात मी सुन्नपणे उभी राहते.