मुख्य विभाग

1000 कलाकारांना मिळणार संधी पीडीएफ प्रिंट ई-मेल
( संदर्भ -दै. लोकमत ८ जाने. १२)
92 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात नाटय़पंढरीतील सुमारे एक हजार कलाकारांना संधी देण्यात आली आहे. नाटय़कर्मी, साहित्यिक, तमाशा कलावंत, लोककलावंत, नकलाकार, शाहीर, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा त्यात समावेश आहे.
नाटय़ संमेलन हे केवळ रंगभूमीपुरते मर्यादित न राहता, त्याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सांगली ही जशी नाटय़पंढरी आहे, तशी तमाशा पंढरी आहे. अनेक लोककलावंत, साहित्यिक या मातीत जन्मास आले आहेत. त्या सर्वाचा संमेलनातून गौरव करण्यात येणार आहे.
नाटय़पंढरीत होत असलेल्या नाटय़ संमेलनात सांगलीकरांच्या वाटय़ाल भरभरून कार्यक्रम आले आहेत. त्यात एक महानाटय़, तीन नाटके, 25 पथनाटय़े, 1 एकांकिका, 1 मूकनाटय़, 1 एकपात्री प्रयोग, तमाशातील गण, गणगवळण, वग, बालनाटय़े, लोकगीतांवरील नृत्यांचा कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम सांगलीकरांच्या वाटय़ाला आले आहेत. जिल्ह्यातील विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. अविनाश सप्रे हे परिसंवाद व चर्चासत्रात सहभागी होत आहेत. एकपात्री प्रयोगातून वेगळा ठसा उमटविणार्‍या प्रा. डॉ. नंदा पाटील ‘जिजाऊ’ हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत.
‘आरंभ ते प्रारंभ’ या महानाटय़ातून 150 कलाकारांना संधी मिळणार आहे. नाटककार राजेंद्र पोळ व प्रा. अरुण मिरजकरांनी त्याची संहिता लिहिली आहे, तर प्रकाश गडदे व चेतना वैद्य यांनी दिग्दर्शन केले आहे.
पथनाटय़ातून महाविद्यालयातील तीनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींना संधी मिळणार आहे. विविध गुणदर्शन, ‘पाऊल मराठी’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार रंगमंचावर येत आहेत. ‘धन्य ते गायनी कळा’ हे देवल स्मारक मंदिरचे संगीत नाटक, नवरंगचे ‘व्हाईटलायर्स’, वेश्या मुक्ती परिषदेचे ‘हम और तुम सब’ ही नाटके सादर होणार आहेत. याशिवाय बालनाटय़ातून अनेक बालकलाकारांना नाटय़ संमेलनात कलाविष्कार सादरीकरणाची संधी मिळणार आहे.