मुख्य विभाग

नाट्यसंमेलन कार्यक्रम रूपरेषा पीडीएफ प्रिंट ई-मेल

( संदर्भ -दै. लोकमत ८ जाने. १२)
सांगलीत येत्या १९ जानेवारीला ९२व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नांदी होणार आहे. चार दिवस चालणार्‍या रंगकर्र्मींच्या महामेळय़ाचे उद्घाटन २१ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी दिली.

१९ जानेवारी रोजी सायंकाळी सातला येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने नाट्य संमेलनाची सुरुवात होईल, तर २२ जानेवारीस पु. ल. देशपांडे लिखित व संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे दिग्दर्शित ‘वार्‍यावरची वरात’ने सांगता होणार आहे. सात नाटके, एक महानाट्य, पाच एकांकिका, २५ पथनाट्ये, गणगवळण, बतावणी, वगनाट्य, बालनाट्ये, नाट्यसंगीत, परिसंवाद, चर्चासत्रे, कलारंग रजनी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे. कल्पद्रुम मैदानावरील संमेलननगरी आणि भावे, दीनानाथ, बालगंधर्व नाट्यगृहांत सर्व कार्यक्रम होतील.

आ. टकले म्हणाले, ‘‘अनेक रंगकर्र्मींना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र टी. व्ही. मालिका व चित्रिकरणात व्यस्त असल्याने अनेकांच्या निश्‍चित तारखा मिळाल्या नाहीत. तरीही बहुसंख्य रंगकर्र्मींची उपस्थिती निश्‍चित आहे. बड्या कलाकारांनी व्यस्त कार्यक्रमातून एक दिवस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. २१ तारखेला नाट्य निर्माता मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याने त्या दिवशी बहुतांश कलाकार उपस्थित राहतील.’’

दिंडीऐवजी पथनाट्ये... नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी दिंडीचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी त्याऐवजी पथनाट्ये होणार आहेत. उद्घाटनापूर्वी सकाळी आठला शहरातील प्रमुख चौकात एकाचवेळी पथनाट्यांना सुरुवात होईल. त्यानंतर मिरवणुकीने सर्व कलाकार संमेलनस्थळी येतील.