मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय वैद्यकीय क्षेत्र सांगलीतील वैद्यकीय परंपरा जपणारे डॉ. पी. जी. आपटे
सांगलीतील वैद्यकीय परंपरा जपणारे डॉ. पी. जी. आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल

"तुम्हाला औषधाची गरज नाही त्यामुळे मी काहीही औषध देणार नाही." गोंधळून जाऊन मी विचारलॆ. आपली फी किती द्यायची? डॉक्टर म्हणाले, "औषध नाही तर फी कसली? मी काहीही फी घेणार नाही".आम्ही हतबुद्धच झालो.मी त्यांना म्हटले, "तुमच्यासारखे डॉक्टर आता विरळाच आहेत." ते म्हणाले "माझा असा सल्ला मानणारे पेशंटही विरळाच आहेत."

मी सौ. शुभांगीच्या खोकल्य़ावर सल्ला मागण्यासाठी  डॉ. पी. जी. आपटे यांच्याकडे गेलो होतो. डॉ. पी. जी आपटे हे जुन्या पिढीतील प्रख्यात सर्जन, आपली मते स्पष्ट व निर्भीडपणे मांडणारे  व सांगलीतील वैद्यकीय परंपरा जपणारे डॉक्टर. म्हणून ओळखले जातात. गेली कित्येक वर्षे आम्ही त्यांचा सल्ला घेत आहोत. त्यांचे अचूक निदान व औषधाचा वा अन्य उपायाचा सल्ला आम्हाला नेहमीच उपयुक्त ठरला आहे.

सुमारे ३० वर्षांपूर्वी माझा मुलगा चार वर्षांचा लहान असताना बी.सी.जी लस देण्याची राहिल्याने त्याला गालाजवळ गळू झाले होते. इतर डॉक्टरांनी आम्हाला अगदी घाबरवून टाकले होते. पण त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी दहा मिनि‍टात ऑपरेशन करून ते काढून टाकले. तेव्हापासून आमचा त्यांच्यावर विश्वास बसला. नियमित व्यायाम, सुयोग्य आहार व साधी स्वस्त आयुर्वेदीक औषधे यांचा ते पुरस्कार करीत असल्याने सांगलीतील वयोवृद्ध माणसांना त्यांचा सल्ला मानवत असे. नातेवाईकांच्या आग्रहाखातर तपासण्या व आधुनिक डॉक्टरी उपचार करून घेतले तरी डॉ. आपट्यांचा सल्ला आवर्जून घेणारी अनेक कुटुंबे सांगलीत आहेत.

सौ. शुभांगीला पोटदुखीचा फार त्रास होत असे. पोटात अल्सर असून ऑपरेशन करावे लागेल असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले. डॉ. आपटे यांनी सागितलेला तिखट वर्ज्य करण्याचा सल्ला शुभांगीने कसोशीने पाळला व तिची पोटदुखी ऑपरेशन न करताच कायमची थांबली.

१९९०च्या सुमारास मला अचानक मूर्च्छा आली व मेंदूमध्ये टीबीचा ट्यूमर झाल्याचे सिद्ध झाले. टीबीवरील इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करूनही, टॆग्रेटॉलसारख्या गुंगी आणणार्‍या गोळ्या व वारंवार हेडस्कॅनिंगचा व्याप माझ्या मागे सात आठ वर्षे लागला होता.

डॉ. आपटे यांना मी माझी तब्बेत दाखविली. त्यांनी मी घेतेलेली औषधे व स्कॅनिंग रिपोर्ट पाहिले. माझी तब्बेत तपासल्यावर त्यांनी मला माझ्या दररोज घेत असलेल्या सर्व गुंगी आणणार्‍या गोळ्या बंद करायला सांगितल्या. डॉक्टरांनी असा त्रास पुन: उदभवू शकतॊ अशी भीती काही डॉक्टरांनी घातलेली असल्याने माझे मन यास तयार होईना. त्यांनी मला धीर दिला व टीबीवरील उपचार पूर्ण झाले असल्याने असा त्रास पुन: उद्‌भवणे शक्य नाही असे ठासून सांगितले. थोडे बिचकतच मी गोळ्या बंद केल्या आणि सुदैवाने कोणताही दुष्परिणाम न होता माझी तब्येत व कार्यक्षमतेत सुधारणा झाली.
माझा मित्र डॉ. भालचंद्र करंदीकर याने आपला दवाखाना डॉ. आपट्यांच्या दवाखान्यात काही काळ चालविला होता. त्यावेळी डॉक्टर आपट्यांशी माझी ओळख आणखी दृढ झाली. एकेदिवशी त्यांनी मला सांगलीतील वैद्यकीय परंपरेविषयी लिहिलेले लिखाण दाखविले. मला ते फार आवडलॆ. त्यांच्या अनुमतीने मी ते आमच्या मायसांगली डॉट कॉम या वेबसाईटवर प्रसिद्ध केले. ते वाचून अनेकांनी मला ते आवडल्याचे कळविले.

स्वत: वयाच्या ऎंशीच्या घरात असूनही त्यांना तब्बेतीची कोणतीही तक्रार नाही. मी ६८ वयाचा तर सौ. शुभांगी ६४ वर्षांची अशी वये असली तरी डॉक्टरांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्या आजारीपणाची लाज वाटते. अजूनही ते नियमितपणॆ पोहण्याचा व्यायाम करतात. साधेपणाने राहतात. अजूनही पूर्वीच्याच उत्साहाने व कुशलतेने ऑपरेशन करतात.

सौ. शुभांगीला गेल्या तीन वर्षांपासून खोकला सुरू झाला आहे. तपासण्या व आधुनिक औषधोपचार केल्यानंतरही तो कमी होत नव्हता. डॉ. आपटे यांनी तिला काही आयुर्वेदीक औषधे दिली त्यामुळॆ खोकल्य़ाची वारंवारता व तीव्रता बरीच कमी झाली. डॉ. आपटे यांनी तिला यात फार सुधारणा होणार नाही मात्र श्वसनाच्या व्यायामाने तो सुसह्य होऊ शकेल असे सांगितले.
माझ्या ब्लडप्रेशरच्या तक्रारीबद्दल मी त्यांना विचारले तर त्यांनी मला माझ्या उंची व वजनातील तफावतीची जाणीव करून दिली. त्यांनी मला वजन कमी करण्यास व चालण्याचा व्यायाम नियमित करण्यास सांगितले आहे. ब्लड प्रेशरवरील गोळ्यांची गरज कमी करण्याचा हा उपाय निश्चितच आदर्श आहे.

औषधांचा अतिरेक न करता  प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे त्यांच्या उपचाराचे प्रमुख सूत्र आहे. हृदयरोग, गुडघेदुखी यासारख्या म्हातारपणाच्या आजारात त्यांचा सल्ला अधिक मोलाचा व प्रभावी ठरतो असा अनेकांना अनुभव आहे. वयाच्या पंचाहत्तरीनंतर कॅन्सर, हृदयरोग यावरील खर्चिक उपचारांचा निर्णय न घेता आपल्या कुवतीनुसार व झेपेल तेवढ्याच प्रकारचे कष्ट करून रोगास आटोक्यात ठेवावे असे त्याचे मत असते.  त्यांची ही मते कदाचित सध्याच्या वैद्यकीय व्यावसायिकांना पटणार नाहीत तरी पेशंट्ने विचारात घ्यावीत अशीच असतात. गुटखा, दारू यासारखी व्यसने करून उपचाराला य़ेणार्‍या पेशंटला ते परखडपणॆ औषध देणे नाकारतात व आधी व्यसन बंद करण्यास बजावतात.

उठसूट महागड्या औषधांचा व इंजेक्शन्सचा वापर करणार्‍या सध्याच्या डॉक्टरांनी त्यांचे पासून काही धडा घेतला पाहिजे असे मला वाटते.

डॉ. आपटे यांनी आपले अनुभव लिहावेत असे मला वाटते. पुढील पिढ्यांतील वैद्यकीय व्यावसायिकांना व रोगग्रस्त व्यक्तींनाही ते कायम मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास आहे.
डॉ. आपटे यांचे हे अलौकिक ऋषितुल्य़ वैद्यकीय कार्य असेच चालत राहो व व्याधीग्रस्त निराश व गरीब रोग्यांना त्यांच्याकडून निरामय जीवन जगण्याचे सामर्थ्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना.


डॉ. पी. जी. आपटे यांचा सांगलीतील वैद्यक शास्त्राची परंपरा हा लेख वाचा
डॉ. पी. जी. आपटे - अल्प परिचय

पूर्ण नाव - प्रभाकर गोपाळ आपटे
जन्म - १६ मे १९३२ सांगली येथे
त्यांचे वडील कै. गोपाळ विष्णु आपटे हे सांगलीतील सावरकर व लोकमान्य टिळक यांचे निस्सीम भक्त.
प्राथमिक शिक्षण ३८-४२ मराठी शाळा नं. १
माध्यमिक सांगली हायस्कूल सांगली
कॉलेज - ४९-५०, एफ. वाय. विलिंग्डन कॉलेज
५०-५१, इंटर सायन्स एस. पी. कॉलेज, पुणे
५१-५६, एम.बी. बी. एस. बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे
शाळाकॉलेजमध्ये असताना सतत पहिल्या नंबरने पास. सर्व खेळांत प्राविण्य, इंटरकॉलेज स्पर्धात पारितोषिके सायकलिंग करीत गिरीभ्रमणाचा छंद
५७ ते ६२ इंग्लंड येथे सर्जरी, बालरोग व औषधविज्ञान या विषयातील ज्ञान व अनुभव संपादन
१९६१मध्ये एफ.आर. सी. एस. पदवी मिळाल्यानंतर पुढे दीड वर्षे इंग्लंड मध्ये नोकरी
६२ ऒक्टोबरपासून सांगली येथे वैद्यकीय व्यवसायास सुरुवात. त्यावेळी आनंद टॉकिजसमोर त्यांचे घर व तेथेच दवाखाना होता.
पाच वर्षे तेथे दवाखाना चालविल्यानंतर १ जाने. १९६८ पासून सध्याच्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत.
खेळाची लहानपणापासून आवड असल्याने सर्व खेळांच्या स्पर्धांना आवर्जून उपस्थित राहतात व टीव्हीवरील स्पोर्ट्स चॅनेल पाहतात. वैद्यकीय क्षेत्रातील नव्या घडामोडींचे ज्ञान घेण्यासाठी दर आठवड्याचा "हॅलो डॉक्टर’ हा कार्यक्रम न चुकता पाहतात. नाटके पाहणे आवडते. स्वयंपाकाची आवड. अजूनही १००० माणसाचा स्वयंपाक करण्याची तयारी.
गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ अनेक ऑपरेशन्स व वैद्यकीय सल्ला. अजूनही तेच कार्य सेवा भावनेने चालू.

घर पत्ता - डॉ. प्र. गो. आपटे
सावरकर प्रतिष्ठान नजिक, विश्रामबाग, सांगली
फोन- दवाखाना - २३३१३३१९
घर - २३०००५३
२३००५९०
मो. ९४२५५५५७६७