मुख्य विभाग

मंडप उभारणीची मुहूर्तमेढ पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली (सकाळ वृत्तसेवा) - येथील 92 व्या नियोजित अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली. विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर 20 ते 22 जानेवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे. नव्या वर्षाची सुरवात नाट्यसंमेलनाच्या धामधुमीनेच होत असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वारे आहे. मंडपासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या असून त्या 31 डिसेंबरला खुल्या होतील.

जिल्हाधिकारी श्‍याम वर्धने, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके, उद्योजक राजाभाऊ शिरगावकर, माजी महापौर सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीपूर्वक मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी स्थानिक संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दयानंद नाईक यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार झाला. पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे मंडपाचे भूमिपूजन झाले. यासाठीच्या खास टोप्यांनी प्रमुख पाहुणे सुशोभित झाले होते.

कार्याध्यक्ष शफी नायकवडी यांनी स्वागत केले. ते म्हणाले,""सुमारे सहा हजार रसिक प्रेक्षकांची सोय होईल, अशी मंडप व्यवस्था असेल. मुख्य व्यासपीठ 80 बाय 60 फुटाचे असेल. कल्पद्रुम क्रीडांगण परिसरात अन्य दोन व्यासपीठाची व्यवस्था असेल. तेथे परिसंवाद व अन्य कार्यक्रम समांतरपणे सुरू राहतील. याशिवाय संमेलन काळात "भावे, "दीनानाथ' आणि मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहातही कार्यक्रम होतील.''

दरम्यान, सांगलीच्या नाट्यक्षेत्राच्या वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या महानाट्य "आरंभ ते प्रारंभ'ची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक कलाकारांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.