मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता नाट्य संमेलनाध्यक्षपदी श्रीकांत मोघे
नाट्य संमेलनाध्यक्षपदी श्रीकांत मोघे पीडीएफ प्रिंट ई-मेल

सौजन्य संदर्भ -सकाळ वृत्तसेवा - २८ नोव्हेंबर, २०११

सांगली - येथील नियोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची निवड झाली. मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय झाला. संमेलन अध्यक्षपदासाठी श्री. मोघे यांच्यासह कोल्हापूर येथील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी इच्छुक होते. निवडणुकीऐवजी सर्वानुमते झालेल्या सदस्यांच्या निर्णयाला श्री. कुलकर्णी यांनी सहमती दर्शवली.

सांगलीत 22 व 23 जानेवारीला संमेलन होणार आहे. पालकमंत्री पतंगराव कदम यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. नागपूरच्या गिरीश गांधी यांचा संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज त्यांच्या संमतीविना दाखल झाला होता. त्यामुळे अंतिम रिंगणात श्री. मोघे व श्री. कुलकर्णी यांच्यातच लढत होती. निवडणूक होणार का, याबाबत नाट्य क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले होते. आज दुपारी एकच्या सुमारास नाट्य संकुलात नियामक सदस्यांच्या बैठकीस प्रारंभ झाला. परिषदेचे अध्यक्ष आमदार हेमंत टकले, उपाध्यक्ष विनय आपटे, कार्यवाह स्मिता तळवलकर, सहकार्यवाह जयंत जातेगावकर, कोषाध्यक्ष वंदना गुप्ते, सदस्य मोहन जोशी यांच्यासह 40 सदस्य उपस्थित होते.

नियामक मंडळाचे दोन सदस्य अनुपस्थित होते. सुमारे अर्धा तासाच्या बैठकीनंतर श्री. मोघे यांची निवड झाल्याचे परिषदेचे अध्यक्ष टकले यांनी जाहीर केले. ते म्हणाले, ""अपवादात्मक प्रसंगीच निवडणूक झाली आहे. श्री. मोघे यांच्या अध्यक्षपदाचा निर्णय सर्वानुमते झाला.'' अध्यक्ष निवडीनंतर सायंकाळी नियोजनासाठी स्वतंत्र बैठक झाली. नियोजनासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली. सांगलीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष दयानंद नाईक व कार्यवाह शफी इनामदार यांनी अध्यक्ष टकले यांच्याकडे नियोजनाबाबत काही अपेक्षा मांडल्या. त्याबाबत दोन दिवसांत कळवण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

'सासूरवाशिनीला माहेरी आल्यानंतर होणाऱ्या आनंदाची अनुभूती मी घेत आहे. नाट्यपंढरी सांगलीशी माझी नाळ लहानपणापासूनची आहे. विलिंग्डनला शिकायला येण्याआधी त्या महाविद्यालयाशी माझा स्नेह होता. उमलण्याच्या वयात मी सांगलीत होतो. आता पुन्हा त्या गावात होणाऱ्या संमेलनाध्यक्षपदाची संधी मला मिळाली याचा आनंद मोठा आहे. सांगलीतील मंडळींसमवेत एखादे चांगले नाटक बसवायची माझी इच्छा आहे.''
- श्रीकांत मोघे, संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष

'संमेलनाध्यक्ष आपल्या भागातील असावा, अशी स्वाभाविक भावना नाट्यप्रेमींमधून उमटली. तथापि, नाट्य परिषदेच्या घटनेत तशी कोणतीही तरतूद नाही. नियमांबाबत आम्ही परिषदेकडे पत्रव्यवहारही केला होता; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. असो, नियामक मंडळाच्या सदस्यांनी दिलेला निर्णय आम्ही आदरपूर्वक मान्य केला आहे.''
- भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते