मुख्य विभाग

आमचे शंकरभाऊ पीडीएफ प्रिंट ई-मेल
प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख.

आठ ऑक्टोबर हा शंकरभाऊंचा जन्मदिवस! यंदाचे वर्ष हे त्यांच्या शताब्दीचे! त्याप्रीत्यर्थ जन्मशताब्दीसमितीने समाजप्रबोधनाचे अनेक अभिनव उपक्रम करुन, त्यांचे काम पुढे चालू ठेवण्यात मोठे औचित्य प्रकट केले आहे. व्यंगचित्रप्रदर्शन, चित्रकारांचे संमेलन हे त्या उपक्रमातीलच कांही होत. समितीचे काम पाहून मुकुंद व मी या भावंडांना आपली कृतज्ञता कशी प्रगट करावी तेच  कळत नाही. कार्यक्रम पाहताना, ऐकताना शंकरभाऊंच्या असंख्य आठवणींनी मन गलबलून जाते.

शंकरभाऊंचे व्यक्तिमत्व अनेक लोलकांच्या एखाद्या रंगीत सुंदर झुंबरासारखे होते असे मला वाटते. झुंबरावर कुठूनही प्रकाशकिरण पडले म्हणजे ते कसे नवीनच सौंदर्याने झगमगते, नाही का? आणि मग  त्यावरच आपले मन खिळून राह्ते. शंकरभाऊंच्या प्रमुख, संपन्न आणि सदाप्रसन्न व्यक्तिमत्वाचे तसेच होई.

शंकरभाऊ नात्याने भावंडांचे वडील, पण वडील घरात राहणारा एक वाघोबा असे मात्र आम्हाल कधीच वाटले नाही. कसे वाटणार? कारण आयुष्यभर आमच्याशी वागले एकाद्या जिवलग, जिव्हाळ्याच्या मित्राप्रमाणे, विश्वासू सवंगड्याप्रमाणे!

माझ्या बालपणातले दोन प्रसंग मला चांगले आठवतात. मी किर्लोस्करवाडीच्या शाळेत शिकत होते तेव्हांची हो गोष्ट. दुसरे दिवशी दसरा होता. शाळेत पाटीपूजनाचा कार्यक्रम होता. पाटीवर सरस्वती काढायला हवी होती. पण माझे आणि चित्रकलेचे विळ्या-भोपळ्याचे सख्य!  बाकीच्या मैत्रिणींनी कुणी स्वत: तर कुणी दुसर्‍याकडून सरस्वती काढून आणली होती. चाराच्या आकड्याची.  आपल्याला मात्र ती काढता येत नाही म्हणून माझे तोंड चिमणीएवढे झालेले. एवढ्यात शंकरभाऊ आले आणि म्हणाले "मालढोक,( हे एक पक्षाचे नाव. पण शंकरभाऊ त्याच नांवाने मला लहानपणी हाक मारीत) काय झालं तुला?" मी कारण सांगताच ते म्हणाले," हात्तीच्या!! जा तुझी पाटी घेऊन ये पाहू" ती स्वत: त्यांनी कोळशाने घासली, स्वच्छ केली आणि पांच मिनिटात मोरावर बसलेली, वीणा वाजविणारी सुरेख सरस्वती काढून दिली. रंगवून दिली. मग अस्मादिकांची ऐट काय विचारता? माझी ही बघा खरी सरस्वती, खरी सरस्वती" असे म्हणून मैत्रिणींपासून शिक्षाकांपर्यत सर्वाना पाटी दाखवून मिरविण्यात, उड्या मारण्यात दिवस कधी  संपला तेही कळले नाहीं.

            वयाच्या सहाव्या वर्षीच मी अण्णासाहेब कर्वे यांच्या हिंगण्या’च्या शाळेत शिकायला गेले. घरापासून दूर, विशेषत: शंकरभाऊंना सोडून राहण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. तिथे आपल्याला बोर्डिंगात राहावयाचे आहे याचीही मला कल्पना नव्हती. आमच्या एका आत्याबाईचे लग्न  आटोपून आम्ही हिंगण्याला गेलो. सगळे आवार हिंडलो "इथे तू राहायचे हं.  खूप मैत्रिणी आहेत तुला इथे खेळायला. आनंदात राहशील ना इथे? असे म्हणून शंकरभाऊ मोटारीत बसले मात्र! मी रडून आकांत केला. शंकरभाऊ जात्याच मायाळू! त्यांचाही पाय चटकन्‌ निघेना. शेवटी मला जवळ घेऊन आमचे त्तात्या (श्री. वा.म.जोशी प्रसिध्द लेखक)  शंकरभाऊंना म्हणाले, "हं शंकरराव बसा आता मोटारीत. आणि पुण्याला पोहचेपर्यंत मागे वळून बघू नका. माझे वडील आणि आई दोन्ही झालेल्या शंकरभाऊंचे ते चित्र माझ्या अंत:करणावर कोरुन राहिले आहे.

केवळ आम्हा भावंडावर नव्हे तर वाडीच्या सगळ्या बाळगोपाळांवर ते अशीच माया करत. संध्याकाळी कारखान्यातून परत येताना वाटेत भेटणार्‍या या ‘दोस्तांशी’ ‘विटीदांडू’, ‘गोट्या’, ‘क्रिकेट’ असा जो खेळ तिथे चालला असेल तो खेळूनच शंकरभाऊ घरी येत. शंकरभाऊंची जेव्हां क्रिकेटची मॅच ल.का.कि. ग्राऊंडवर सुरु असायची तेव्हा ही सगळी बालसेना, ‘बकप्‌, बकप्‌ शंकरअण्णा’ म्हणून  हुंदडायला तिथे हजर असायची. शंकरभाऊ आजोबाच नाही पणजोबा झाले तरी दिवाळीत फटाके उडविण्यात सर्वात पुढे असायचे.  आपल्या मनाचे हे निरागस, ताजेपण त्यांनी कघीच कोमेजू दिले नाही.

ते आमचे जसे मित्र होते तसेच पालकही होतेच! पण नाव ‘शंकर’ असूनही त्यांनी तिसराच काय पण आपले नेहमीचे दोन डोळेही आमच्यावर कधी वटारले नाहीत. मग धम्मकलाडू - चापटपोळ्या यांची गोष्ट तर काढायचे कारणच नाही. शिस्तीच्या नावाखाली नाही कधी घातली त्यांनी आमच्यावर भलतीसलती बंधने. की नाही पाजले आम्हाल उपदेशामृताचे डोस! त्यांचे सगळे बोलणे-चालणे हेच आम्हाला शिकविणारे नमुनेदार पुस्तक होते.

एक उन्हाळ्यात माझे आजोबा दरवर्षीप्रमाणे किर्लोस्करवाडीला आले. ते तिथे महिना दीड महिना राहात. त्यावर्षी माझी चुलतभावंडे त्यांच्या बरोबर आली होती.. मग आमच्या धांगडधिंग्याला ऊत आला असला तर त्यात नवल काय? जेवायच्या वेळी एकजण वेळेवर पानावर हजर असेल तर शपथ!  नन्नीने बिचारीने सांगायचे तरी किती वेळा? शेवटी  शंकरभाऊंनी एक गंमतच केली. आपल्या टपोर्‍या वळणदार अक्षरात त्यांनी एक पत्रक लिहिले आणि दिले ते घराच्या मुख्य हॉलमध्ये, जेवणघराशी चिकटवून. आम्ही सकाळी दूध घ्यायला, माडीवरुन खाली येतो तर समोर ते पत्रक. त्यांत ‘आज्ञा’ कशाचीच केली नव्हती. फक्त लिहिले होते- "मुलांनो, आपल्या आईला, काकीला जेवणासाठी ताटकळत ठेवणे, वाट बघायला लावणे तुम्हाला आवडते का? नाही ना?  मला माहिती आहे आजपासून तुम्ही वेळेवर येणारच. म्हणून तुमची पाठ थोपटतो. तुमचा शंकरआण्णा!" मग मात्र झाला एकदम ट्रान्स्फरसीन! सगळे वेळेवर पानांवर बसलेले!.

मॅट्रिक होऊन मी ‘विलिंग्डन’ कॉलेजात नाव घातले. तेव्हा शंकरभाऊंनी मला हाक मारून म्हटले, "बेटा, माळढोक आता तू कॉलेजात जाणार तेव्हा दरमहा तुला किती पैसे लागतील त्याचा हिशोब तूच कर. तुमची फी,  पुस्तके वह्या, प्रवास, कपडे, कुणाला मदत, औषध इत्यादी जे जे काय लागेल ते आठवून सांग. तेवढे मी पाठवीन. कधीमधी जास्त लागलेच तर मला नि:संकोच कळवायचे. काऽऽय! समजले?" त्याप्रमाणे मी त्यांना मला गरज असणार्‍या रकमेचा आकडा सांगितला. त्यांच्याकडून शाबासकी मिळविण्यासाठी आपण होऊनच दैनंदिन हिशोबही लिहून ठेवू लागले. पण शंकरभाऊंनी तो हिशोब कधीच पहायला मागितला नाही. मुलांनी पैशाची जबाबदारी ओळखावी, त्याचा विनियोग त्यांना व्यवस्थित करता यावा आणि तो करतांना त्यांच्या  मनावर कसले दडपण असू नये एवढाच त्यांचा उद्देश होता. तसाच एक अनुभव मला १९४२ च्या ‘छोडो भारत’ (क्विट इंडिया) चळवळीच्या वेळीही आला. या चळवळीत आपण भाग घ्यावा, देशासाठी काहीतरी काम करावे अशी सौ. शांताची व माझी खरोखरीच मनापासून इच्छा होती. चळवळीमुळे कॉलेज बंदच होते. शंकरभाऊंना आम्ही आमचा विचार मोकळेपणाने सांगितला. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. देशाच्या प्रेमाबद्दल शाबासकीही दिली. नंतर ते म्हणाले, "तुमचे सगळे बोलणे मी ऐकले. पण समजा, तुम्हाला सत्याग्रहामुळे तुरुंगात जावे लागले, तर त्यालाही तुमची तयारी आहे ना? कोणत्याही परिस्थितीत माफी मागून नाही सुटून यायचे."  प्रश्न कोणताही असो शिक्षणाचा असो, विवाह करण्या न करण्याचा असो शंकरभाऊंनी आमचे निर्णय आमचे आम्हालाच घेऊ दिले. तेही अगदी खुल्या मनाने. मुलांना आपला सल्लामसलत, मार्गदर्शन याची गरज वाटेल तेव्हा ती आपल्याला तसे सांगतील हा त्याना विश्वास होता. तसे प्रसंग आले तेव्हां एखाद्या पहाडासारखे ते आमच्या पाठीशी उभे राहिलेही. मुलांवर इतका विश्वास टाकणारे, त्यांचे आचारविचार स्वातंत्र्य जपणारे सुजाण पालक किती मुलांना लाभत असतील?

आमचा विचारविकासाकडे त्यांचे बारीक लक्ष असे, एकदा जेवताना गप्पांच्या ओघात एका व्यक्तीचा उल्लेख मी, "ते लंगडे आहे ठाऊक मला" असा शेरा मारून केला. शंकरभाऊंचा घास तोंडातच राहिला. आपली अस्वस्थता बाहेर न दिसू देता त्यांनी विचारले. "मालूताई, एखादे शारीरिक व्यंग असणे हा माणसाचा अपराध आहे का? आपल्या टेबलावर जेवणारी सगळी माणसे सुसंस्कृत आहेत असे मी मानतो. तुझे हे बोलणे त्यात बसेल असे तुला वाटते?" त्यांच्या सौम्य स्वराने आणि सौजन्यानेच मी अगदी वरमून गेले. माझी चूक मला लगेच कळली. त्यानंतर ती चूक मी आयुष्यात पुन्हा केली नाही.

शंकरभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विलोभनीय विशेष होता. तो म्हणजे वडीलधार्‍या मंडळीविषयी त्यांना वाटणारी कृतज्ञता आणि भक्ती! त्यांचे आईवडील, काका-काकी, नन्नीचे वडील डॉ. पुरोहित, औंधचे राजे बाळासाहेब पंत ही त्यांतील काही विशेष मंडळी. त्यांच्याशी आणि त्यांच्याविषयी बोलताना शंकरभाऊ अगदी मन भरभरुन आणि अतीव आदराने बोलत. ती. पप्पा (लक्ष्णराव किर्लोस्कर)  यांच्या अंत्यसंस्कार किर्लोस्करवाडीत झाले. ती पप्पांची कर्मभूमी होती ना? संस्कार पूर्ण होई तो शंकरभाऊंनी आपल्या दु:खाला विवेकाने आवरले होते. कारखान्याचे ते मुख्य संचालक होते.  तेव्हा तसे वागणे अटळ होते. पण सगळे आवरुन ते घरी आले आणि त्यांना शोक अनावर झाला. "मला आता अरेऽऽ शंकर म्हणून कोण हाक मारणार?" असे म्हणून ते व्याकूळ होऊन स्फुंदू लागले. काय करावे ते आम्हाला कुणाला सुचेचना! आम्ही चुप्प बसून त्यांच्याकडे फक्त बघत बसलो. या काकांनी त्यांच्यावर अपत्यवत्‌ माया केली होती. तिचे विस्मरण शंकरभाऊंना कधीही झाले नाही.

श्रीमंत बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात एका प्रमुख कार्यकर्त्याने जाहीरपणे सांगितले, "राजेसाहेबांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा आमचा मनोदय आहे. एवढी बातमी वर्तमानपत्रात आम्ही दिली मात्र, पहिला चेक कुणाचा आला असेल तर तो शंकरराव किर्लोस्करांचा!" हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा असा कडकडाट केला की त्याच्या आवाजाने सारे सभागृह दणाणून गेले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास ही त्यांची बालपणापासून त्यांना स्फूर्ती देणारी दैवते होती. समर्थाच्या कितीतरी ओव्या त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात नित्य येत. बालवयात शिवाजी महाराजांची भूमिका करुन त्यांनी मोठीच वाहवा मिळविली होती. अभिनयाचे त्यांना उपजतच अंग होते. मला आत्ता नीट आठवत  नाही पण बहुधा वाडीच्या गणेशोत्सवात तात्यासाहेब केळकरांचे "तोतयाचे बंड" एकदा वाडीकर मंडळींनी बसविले होते. त्यांत शंकरभाऊंनी "नाना फडणवीसां’ची भूमिका अशी बहारीची केली की प्रत्यक्ष नाटककाराने त्याना शाबासकी दिली, उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा गच्चीवर बसून शंकरभाऊंनी आणि श्रीकृष्णकाकांनी सगळे "सौभद्र" नाटक त्यातल्या साक्या-दिंड्यांसह म्हटलेले मी स्वत: ऐकलेले आहे.

शंकरभाऊंच्या स्वभावांतली गुणग्राहकता अपूर्वच होती. माणूस लहान असो की मोठा. त्याच्या गुणांना शंकरभाऊ मनापासून दाद देत. आमची नन्नी फार सुगरण होती. शंकरभाऊंना साधे पण रुचकर जेवण जास्त आवडे. नन्नीने पुरणपोळीच काय पण साधे डाळमेथ्यांचे वरण केले तरी ते मोठे चविष्ट असायचे!  मग शंकरभाऊ तिला हाक मारुन म्हणत, "सांबारे ( आमटीला प्रतिशब्द) सुपरग्रॅंड झाले आहे हं"  ती दोघेही आतिथ्यशीलतेसाठी विशेष प्रसिध्द होती. या सगळ्याचा ज्यांनी अनुभव घेतला होता अशा (शंकरभाऊ आणि नन्नी या दोघांच्याही स्नेही असलेल्या) प्रसिध्द लेखिका मालतीबाई बेडेकर आमच्या मासिकाच्या एका समारंभात  म्हणाल्या, "शंकरभाऊंनी किर्लोस्कर-स्त्री=मनोहर" चा प्रपंच अतिशय कौशल्याने चालवला, सांभाळला. शंकरभाऊंच्या या यशाची गुरुकिल्ली त्यांच्याजवळच्या दोन शब्दांत आहे. ते शब्द म्हणजे "या,,या,या! आणि वा! वा! वा!" हे वर्णन अगदी सार्थ आहे. आपल्या स्वभावातल्या य गोडव्याने शंकरभाऊंनी कुटुंबात आणि बाहेरही अनेकांना प्रोत्साहन देऊन उभे केले. आपल्या वाडीच्या चर्मकार हरिबा जाधव यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. शंकरराव जाधव हे त्यांचे एक नमुनेदार उदाहरण आहेत. आपल्या जीवनातल्या यशाचे सर्वात मोठे श्रेय ते शंकरभाऊंना देतात. "हरिबा हे माझे जन्मदाते वडील तर शंकरभाऊ मला घडविणारे दुसरे वडीलच!" असे ते सद्‌गदित स्वरात नेहमी म्हणतात.

वाडीच्याच एका कुटुंबातील बहिणभावंडांना शंकरभाऊंनी त्यांच्या पडत्या काळात सहाय्य केले. त्या सर्वांची विद्या पुरी झाली. आपल्या कर्तृत्त्वाने ती भावंडे आता बंगला-मोटारवाली झाली आहेत. शंकरभाऊंच्या मदतीचे स्मरण म्हणून त्यांनी शंकरभाऊंना, त्याच्या निधनापूर्वी काही दिवस, आधी एक चार आकडी चेक पाठवला. दुपारच्याच डाकेने शंकरभाऊंनी तो परत धाडला आणि सोबतच्या पत्रात त्यांना लिहिले, "तुम्ही आमच्या वाडीची मुले! तुम्ही माली-मुकुंदासारखीच आहांत. तुमचे पैसे मी कसे घेईन? तशाच एखाद्या गरजूला ते पैसे द्या, म्हणजे मला मिळाल्यासारखेच आहेत. “ घटप्रभेच्या ‘आरोग्यधामा’ च्या आवारात शंकरभाऊंनी बंगला बांधला व तिथे ते राहायला गेले तेव्हाची एक आठवण सांगते. संस्थेच्या आवारात एखादी फेरी ते अधूनमधून घालत. रुग्णही त्यांची आतुरतेने वाट पहात. त्यांना धीर, आधार देऊन परत येताना शंकरभाऊंचा चेहरा एका वेगळ्याच समाधानाने उजळलेला असे. तिथे एका मधुमेही स्टेशन मास्तरांचा पाय कापून काढलेला होता. ते स्वाभाविकच त्यामुळे खिन्न, उदास असत. शंकरभाऊंनी त्यांना बोलते के, व्यवसातल्या आठवणी त्यांना सांगायल्या लावल्या. स्टेशन मास्तरांच्या एका नातवाला त्या लिहून घ्यायला प्रवृत्त केले आणि त्याचे एक छानदार पुस्तक करवून घेऊन शंकरभाऊंनीच त्या पुस्तकाचे बारसे केले. नाव ठेवले "लाईन क्लिअर".

अशी किती उदाहरणे सांगू? आपल्या या मायाळू वृत्तीने माणसांचा जणू एक प्रचंड समुद्रच शंकरभाऊंनी आपल्याभोवती जमविला होता. ते कालवश झाल्यावर देश-विदेशांतून आम्हांला सांत्वनाची हजारो पत्रे आली. ती पाहून मी पुन: पुन्हा मनाशी म्हटले, "मुकुंदाने शंकरभाऊंवर लिहिलेल्या लेखाला "एक माणूस- वेडा माणूस" असे शीर्षक दिले होते ते किती यथार्थ होते.”

शंकरभाऊ जिथे जातील तिथे समरस होऊन जात. घटप्रभेला असताना एक दरिद्री पठाण त्यांना महिन्या - दोन महिन्यांनी आवर्जून भेटायला तेई. शंकरभाऊ मजेत त्याच्याशी पुश्तु भाषेत गप्पा मारायचे.  त्यांचे भाषेचे भांडवल किती? तर पाच-पन्नास शब्द! तेही विद्यार्थिदशेत आपल्या एका पठाण मित्राच्या घरी चार दिवस अबेटाबादला ते राहायला गेले होते तेव्हा ऐकलेले. पण तेवढ्यानेच त्या पठाणाला आपला गाववालाच भेटल्याचा आनंद होई. घटप्रभा गाव कानडी भाषिकांचे! तिथे तंबू घेऊन एक कानडी नाटक कंपनी कधी कधी येई. तिच्या नाटकाला शंकरभाऊ आवर्जून हजर रहात. व्यवस्थाकला काही उपयुक्त सूचनाही करीत. त्यामुळे या ‘साहेबा’ वर सगळे खूष असायचे. शंकरभाऊंचे आजोळ कर्नाटकात होते. त्यामुळे त्यांना थोडे बहुत कानडी बोलायला येई. बरेचसे समजेही!  पण घटप्रभेला गेल्यावर मास्तरांची शिकवणी ठेवून ते कानडी लिहायला वाचायला लागले. एवढेच नव्हे, तर सभांतून छोटी छोटी भाषणेही करु लागले. विद्यार्थी वयाने मोठा नि कानडीचे गुरुजी वयाने लहान अशी ही जोडी पाहून आम्हांला गंमत वाटायची पण ते दोघे आपापले काम इमाने इतबारे करीत

 “कि-स्त्री-म" या तीनही मासिकांनी सुदीर्घ काळ समाज जागृतीचे, शिक्षणाचे, रंजनाचे काम केले. पण सार्‍याच वाचकांना त्यातून प्रकट होणारा पुरोगामी नवमतवाद, विज्ञाननिष्ठा, बुध्दिवाद ही सारी कशी पटायची? कशी पचायची? तेव्हा ती न पटणार्‍या डॉ. रा.चिं श्रीखंडे या प्रख्यात डॉकटर असून कवीही असलेल्या सद्‌गृहस्थांनी ‘केसरीत’ ‘नवमतवाद्यांस इशारा"’म्हणून एक तिखट कविता प्रसिध्द केली. त्यातले काही चरण हे होते - " व्यभिचारांते शिकविती, झुकविती कवणांस स्व-लेखांनी? ! ते " हाय हाय! म्हणतील करतां त्यांच्याच लेकिलेकांनी !!" शंकरभाऊंमधल्या चतुर संपादकाने हे कवितेचे अस्त्र कवीने कुणावर फेकले आहे ते लगेच ओळखले आणि पुढच्याच ‘किर्लोस्कर’ च्या अंकांत एक मजेशीर व्यंगचित्र काढले. त्यांत एक आसन्नमरण रोगी काढून त्याला नाव ठेवले ‘महाराष्ट्र पुरुष!’ त्याच्या जवळच डॉ. श्रीखंडे त्यांच्यासारखाच दिसणारा एक धोतर कोट टोपीवाला अंगाने जाडगेलासा असलेला असा वैद्य काढला. हा वैद्य वाटीतून कसलेसे चाटण त्या रोग्याला देतो आहे असे दाखविले. त्या वैद्याशेजारीच स्वत:सारखाच दिसणरा उंच, कृश अंगकाठीचा, सूटबूट घालून स्टेथोस्कोप घेतलेला डॉक्टर त्या रोग्याला पिचकारीने इंजेक्शन देतो आहे असे दाखविले. सगळ्या चित्राचा ध्वन्यर्थ इतकाच की पाश्र्चात्त्य नवनीतीनेच रोगी बरा होईल त्याला ‘श्रीखंडाचे चाटण’ मुळीच उपयोगी नाही. हे चित्र पाहिल्यावर शंकरभाऊंच्या प्रत्युत्तरातली मार्मिकता डॉक्टर साहेबांना जजाणवली. ते स्वत:ही त्यावर मनसोक्त हसले. पुढे जेव्हा जेव्हा शंकरभाऊंची आणि डॉक्टरसाहेबांची भेट होई तेव्हा तेव्हा शंकरभाऊ त्यांचे मोठ्या आपुलकीने  व  हसून स्वागत करीत. म्हणूनच डॉक्टरसाहेबांनी "हा शंकररावांचा उमदा स्वभाव अतुलनीय आहे" असे सर्टिफिकेट त्यांना दिले. विरोध विचारांना करायचा असतो- व्यक्तीला नव्हे. हे शंकरभाऊंच्या वागण्यापाठीमागचे तत्त्व आम्हा मुलांच्या मनावर सहजपणेच बिंबले ते हे असे!.

 ‘किर्लोस्कर’ मासिकने आपल्या देशातल्या बुवाबाजीवर घणाघाती हल्ले केले. त्यापायी खटले उभे राहिले, अनेक बुवा-भक्तांची धमकीची पतेए आली, कुणीकुणी लिहित  आम्ही विशिष्ट देवाचा जप करतो आहोत. तो एक लक्ष झाला की तुम्ही मरणार हे निश्चित समजून चाला. " शंकरभाऊंची अशा पत्रांनी खूप करमणूक होई. ते म्हणत, “ बघा, न बोलावता, न दक्षिणा देता ज्योतिषीबुवा चालून यायला लागलेत घरी" आपल्याला पूर्ण विचारान्ती समाजहिताचे जे विचार घडतात ते सांगायला शंकरभाऊ कधिच डरले नाहीत. सामान्य माणसांनीच काय पण प्रसंगी म. गांधीनीही नापसंतीचा सूर काढला तरी ते अविचलच राहिले. ती पप्पांबरोबर, गणपतराव काळे यांनी कारखान्यात तयार केलेला चरखा गांधींना दाखवायला शंकरभाऊही गेले होते, तेव्हा गांधी म्हणाले, "ते संततिनियमनावरचे लेख छापणारे तेच किर्लोस्कर तुम्ही ना? तुम्ही हे चांगले नाही करीत." शंकरभाऊंनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकले. आपल्या देशावर गेली चाळीस वर्षे गांधीचे नाव उठताबसता घेणार्‍या पक्षाचेच राज्य होते आणि त्याच पक्षाला संततिनियमनाचा त्रिकोण नि प्रचारपत्रे खेड्यातल्या प्राथमिक शाळांच्याह भिंतीवर लावावी लागली! कालाय तस्मै नम: हेच खरे! पन्नास वर्षापूर्वी शंकरभाऊंनी दाखविलेल्या या द्रष्टेपणाचा मला अभिमान वाटतो. परिस्थिती कशीही येवो शंकरभाऊंच्या मनांतला विवेक सदैव जागा असे. त्यामुळे ते आपला तोल जाऊ देत नसत. ते पाहिले म्हणजे माझ्या ध्यानात येई की, शंकरभाऊ केवळ, टेनिस, क्रिकेट असले खेळच उत्तम रीतीने खेळतात असे नाही तर जीवनचा खेळही ते तेवढ्याच कौशल्याने खेळतात. जीवनाकडे एकदा खेळ म्हणून पहायचे ठरविले की त्यात कधी हार तर कधी जीत असे होणे अपरिहार्यच असायचे हे त्यांनी चांगले ओळखले होते. या वृत्तीमुळेच त्यांच्या जीवनात आलेली लहान-मोठी दु:खे त्यांनी समंजसपणे आणि मूकपणाने सोसली. कंटाळा, तक्रारखोरपणा, निराशा असल्या अप-प्रवृतीना त्यांनी आपल्याजवळ कधीच फिरकू दिले नाही. उद्योग – उत्साह – आत्मोन्नतीचा त्यांनी समाजाला दिलेला मंत्र त्यांच्या अनुभवातून त्यांना स्फुरलेला होता.

शंकरभाऊंच्या स्वभावात एक सुखद मिस्किलपणा, खेळकरपणा होता. सगळ्या गोष्टी त्याच त्याच पध्दतीने वर्षानुवर्षे करीत राहणे त्यांच्या स्वभावात बसायचे नाही. जे करायचे ते मन ओतून करायचे आणि त्यात काही ना काही नाविन्य दाखवायचे अशी त्यांच्या मनाची ठेवण होती. आमच्या घरच्या एका मंगल कार्यात कुटुंबातील सर्वात वडिल पिढीच्या स्त्री-पुरुषानीही उखाणे  घ्यायचे असा बूट ती. शंतनुकाकांनी काढला. शंकरभाऊंवर उखाणा घ्यायची वेळ आल्यावर ते म्हणाले, “ रामदासांच्या हातात असते कुबडी आणि पार्वतीबाईचे नाव घेताना माझी वळते बोबडी.” त्यावर हशा-टाळ्यांचा जो पाऊस पडला तो कसा वर्णन करु? आमची नन्नीही खेळाडूपणे त्यात सामील झाली. त्याचे रेडिओवर  भाषण अस्ले म्हणजे एका कार्डावर रेडिओ, ते स्वत: त्यांच्याजवळ ‘विठ्या’ मांजर बसले आहे असे एक चित्र काढून त्याखाली ते त्यांच्या भाषणाची वेळ व दिवस कळवीत. असे ते मोठे कल्पक होते!  विठ्या मांजरावरुन आठवले म्हणून सांगते. कुत्र्या-मांजरांचा शंकरभाऊंना फार लळा असे. घटप्रभेला झाडावरच्या एका कावळ्याशीही त्यांनी दोस्ती जमविली होती. त्याला ते न चुकता भाकरीचे तुकडे आणि पाणी देत असत. हाच कावळा तुमचा म्हणून तुम्ही असे ओळखता हो? असे त्यांना मी खट्याळपणे विचारले तेव्हां ते म्हणाले, " ते माझे आणि त्या कावळ्याचे ‘सीक्रेट’ आहे."

शंकरभाऊंचा घटप्रभेचा दिनक्रम मोठा रेखीव आणि सुरेख असायचा. सकाळ-संध्याकाळ ते फिरुन येत. सकाळचे आन्हिक उरकले स्नानाचे वगैरे की थोडा वेळ लेखन वाचन करित. भोजनोत्तर थोडी विश्रांती, मग इंग्रजी-मराठी वृत्तपत्राचे वाचन, जेव्हा जेव्हा पाहुणे असत-येत तेव्हा तेव्हा त्याच्याशी काव्यशास्त्रविनोद, रुग्णांकडे एखादी फेरी!! कधी ते दिलरुबा वाजवीत, कधी चित्रे काढीत, अनेक कलांची देणगी नियतीने त्यंना दिल्यामुळे वेळ कसा घलवावा हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. रात्री हलके फुलके भोजन-दूध आणि मग रेडिओ ऐकून झोपणे! विविध कलांच आनंद लुटून त्यांनी आपले व इतरांचेही जीवन आनंदाने फुलविले. शंकरभाऊंच्या जीवनाची बैठक अशी होती की एक दिवस टिकणारे फूल जगाला आनंद देते तर जगाने तुमच्याकडून किती अपेक्षा करावी? दुसर्‍याला आनंद दिला की आपला शतपटीने वाढतो असे त्याना मनापासून वाटे. आपल्या घराला म्हणूनच त्यांनी " मधुघट"  असे अतिशय अर्थपूर्ण नाव दिले होते. जीवनांतले दैन्य, दारिद्र्य, कठोर वास्तव जीवनाची नश्वरता त्यांना माहित नव्हती थोडीच? ती चांगलीच माहित होती म्हणूनच आपल्या घरात त्यांनी एक सुदंर इंग्रजी वचन लावून ठेवले होते ते असे होते, “ I shall pass this way but once . Any good, therefore that I can do, let me do it now, for I may not pass this way again.”  प्रत्येक माणसाच्या अंगच्या सुप्त शक्तीवर त्यांचा विश्वास होता कारण नियती रिकाम्या हाताने कोणालाच पृथ्वीवर इथे पाठवीत नाही, म्हणून आपल्या सहवासात येणार्‍या जवळची ही शक्ती ओळखून त्याला "बकप्‌" म्हणण्यात त्यांना परम सुख होई.

माणसाच्या जीवनातली सर्वात अवघड परीक्षा म्हणजे तो मृत्युला कसा सामोरा जातो ही! या परीक्षेत शंकरभाऊ पहिल्या वर्गात डिस्टिंक्शनने" उत्तीर्ण झाले. संध्याछायांनी त्यांना भिववले नाही. ‘रमविले’, ते म्हणायचे, "मी तयार आहे. आता गाडीने हिरवे निशाण दाखवून शिट्टी वाजवली की लगेच डब्यात बसायचे!"  आणि खरोखरीच ते तशी शिट्टी वाजताच अज्ञाताच्या प्रवासगाडीत बसले. एक जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली, दुपारी दीड-दोनच्या सुमारास अचानक त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव सुरु झाला, ते बेशुध्द झाले आणि रात्री दहाच्या सुमाराला, कुणाला सेवेची कसलीही संधी न देता त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. कधीही न चुकता एक तारखेला प्रसिध्द होणार्‍या ‘किर्लोस्कर’  मासिकाचा गुणी आणि कर्तबगार संपादकही नेमका एक तारखेलाच  काळाच्या पडद्याआड गेला!!

दोन तारखेस सकाळी आम्ही घटप्रभेला पोहचलो. त्यावेळी  नव्या वर्षाचे स्वच्छ परीटघडीचे कपडे घातलेली, रोजच्या प्रमाणेच व्यवस्थित भांग पाडून चष्मा लावलेली, शंकरभाऊंची  पार्थिव मूर्ती बिछान्यावर चिरनिद्रा घेत असलेली आम्हाला दिसली. तिच्याकडे पुन्हा पुन्हा डबडबलेल्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे ती पळभरात दिसेनाशी होई. शंकरभाऊंच्या वागण्यात बोलण्यांत जी सहजसुंदरता असे तीच या जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या चेहर्‍यावर होती! त्यांच्या जाण्याने एका अथांग पोरकेपणाच्या भावनेने माझे मन अंघारुन गेले. माझे मन म्हणाले, "आपल्या घरातले सुंदर इंद्रधनुष्य आता कायमचे क्षितिजाआड गेले!" बालपणापासूनचा आपला प्रिय सवंगडी गेला! केवळ आपल्यावरच नव्हे तर अनेक दु:खी-दुर्दैवी मुलांमुलींवर पितृत्वाचे छत्र घरणारा पिता गेला. जीवनावर भरभरुन प्रेम करायला शिकविणारा एक सुसंस्कृत शिक्षक गेला!! भारताच्या इतिहासांतल्या, लाला लजपतराय, गांधी-नेहरु, पंडित सातवळेकर यांच्यासारख्या थोर विभूतीपासून डॉ. हर्डीकर, आचार्य भागवत अशा द्र्ष्ट्या विचारवंतापर्यंत सर्वांना पाहण्याचे, त्यांच्याशी बोलण्याचे भाग्य लाभलेला एक ध्येयवादी नागरिक गेला. किर्लोस्करवाडीचा कारखाना  भस्मसात करायला आलेल्या शेकडो पलितेधारी मंडळींना एकाकीपणे सामोरे जाऊन "या करखान्याचा मी प्रमुख अधिकारी आहे म्हणून कारखाना जाळण्यापूर्वी पहिली गोळी मला घाला. हे सांगणारा निर्भय कारखानदार गेला! फुले-आगरकर-आंबेडकर-कर्वे या समाजसुधाराकांच्या मालिकेतला एक नम्र पाईक गेला!! माणूस म्हणून माणसांची उंची जास्त हवी यावर श्रध्दा असलेला एक निरभिमानी कलावंत गेला!! त्यांच्या चिरवियोगाच्या जाणीवेने माझे अंत:करण आतल्या आत आक्रोश करु लागले. आभाळासारखे असलेले आपल्या माथ्यावरचे छत्र आता कायमचे गेले या भावनेने मला अश्रू आवरेनात.!!

रोज आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकताना, शास्त्रीय संगीताची एखादी सुरेख मैफल ऐकताना मला वाटते, बातम्या सांगणारा, गाणे म्हणणारा, ही कधीच माणसे मला आत्ता दिसत नाहीयेत पण त्यांचे शब्द, स्वर मात्र ऐकू येताहेत. असेच अज्ञाताच्या आकाशवाणीवरुन शंकरभाऊंचे शब्द मला कधीतरी ऐकू येतील कां, “ माळढोक, कशी आहेस तू?" हे.