मुख्य विभाग

डॉ. द. कृ. गोसावी पीडीएफ प्रिंट ई-मेल

डॉ. द. कृ. गोसावी - रुग्णांना भेटलेला एक देवदूत!

प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख.


माणसांप्रमाणे एकेक गावही नशिबवान असते. मिरज तसे आहे. प्रतिभावंत साहित्यिक, व्यासंगी इतिहास-संशोधक, अलौकिक स्वरांचे वरदान लाभलेले गायक, पट्टीचे खेळाडू अशा कितीतरी जणांची मिरज ही जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. इथले हवापाणी आरोग्यवर्धक! म्हणूनच अमेरिकन मिशनने आपल्या प्रशस्त हॉस्पिटलसाठी हिचीच निवड केली. या हॉस्पिटलने आपला आणि या नगरीचाही लौकिक देशोदेशी पोहोचविला. ‘श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल’ ही संस्था नुकतीच मिरजेत सुरू झाली आहे. या संस्थेने मिरजेच्या वैद्यकीय जगात अत्यंत मोलाची अशी अभूतपूर्व भर घातली. जणू एक नवा इतिहासच तिने घडविला. कारण मुंबईशिवाय महाराष्ट्रात अन्यत्र कुठेच कॅन्सरचे हॉस्पिटल नव्हते. मिरजेचे लोकप्रिय आणि कान-नाक-घसा यांचे निष्णात डॉ. द. कृ. गोसावी यांनी आपल्या अचूक दूरदृष्टीने रुग्णांची ही गरज ओळखली. त्यांच्या अडचणीही जाणल्या. गेली दहा वर्षे यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी तहानभूक विसरून अविश्रांत परिश्रम केले. आणि त्या हॉस्पिटलचा गोवर्धन पर्वत उचलला. त्यांच्या मृदु स्वभावाने, व्यावसायिक कौशल्याने त्यांनी केलेला मोठा लोकसंग्रह त्यांच्या पाठीशी होताच. त्यातून त्यांना बुद्धिमान, कष्टाळू सहकारी मिळाले. अनेक दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी आर्थिक मदतीसाठी सहकार्याचा हात पुढे केला. या सर्वांच्या मदतीने काम करताना आलेल्या असंख्य लहानमोठ्या अडचणींवर, संकटांवर डॉक्टरांनी मोठ्या निर्धाराने आणि धीराने मात केली. या हॉस्पिटलच्या संकल्पनेपासून आज तिथे चालू असलेल्या कामापर्यंत सर्वात निर्विवादपणे डॉक्टर गोसावींचा सिंहाचा वाटा आहे. पण डॉक्टरांची त्याबद्दलची भावना मात्र ‘हे तो देणे ईश्वराचे’ अशी नम्रतेची होती.

अत्यंत आधुनिक उपकरणांनी, कुशल धन्वंतर्‍यांनी श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल आज सज्ज आहे. शेकडो रुग्णांना तिथे आज उत्तम उपचार मिळत आहेत. म्हणून डॉ. गोसावींचे नाव ते रुग्ण जन्मभर कृतज्ञतापूर्वक स्मरत राहतील. यात काय शंका? त्याच्या या सत्कृत्याचे पोवाडे भावी पिढ्याही तशाच भक्तिभावाने गातील आणि म्हणतील, "डॉ. गोसावींच्या रूपाने कॅन्सरच्या रुग्णांना खरोखरी एक देवदूतच भेटला म्हणायचा!" अशा आमच्या या आदरणीय डॉक्टरांनी कालच्या ऑगस्टच्या पाच तारखेला इहलोकाचा निरोप घेतला. तोही कॅन्सरच्याच व्याधीने! त्यांचा देहान्त त्यांनी उभ्या केलेल्या श्री सिद्धिविनायक या
हॉस्पिटलमध्येच झाला! या दैवदुर्विलासाने हजारो मने सुन्न झाली. केवळ सांगली-मिरज आणि भंवतीचा परिसर यांनाच नव्हे तर देशोदेशी असलेल्या त्यांच्या स्नेहसोबत्यांना डॉक्टरांच्या मृत्यूचे अतीव दुःख झाले. पोरकेपणाच्या भावनेने सर्वांची मने दाटून आली.

सुमारे पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट! त्यावेळी पुण्याहून नुकतीच माझी ‘विलिंग्डन’ महाविद्यालयात बदली झाली होती. मी जूनमध्ये कामावर रुजू झाले. आणि थोड्याच दिवसांत कानाच्या दुखण्याने मला गाठले! डॉ. रणभिसे यांनी माझ्याकडे चिठ्ठी देऊन मला डॉ. गोसावींकडून तपासून घ्यायला सांगितले. त्यांचा या डॉक्टरांवर फार फार लोभ होता. त्याच्या रोगनिदानावर दृढ विश्वास होता. दुसर्‍या दिवशी मी मिरज-पंढरपूर रस्त्यावरच्या डॉ. गोसावींच्या दवाखान्यात गेले. अर्धा पाऊणतास तिथे बसले. डॉक्टर केव्हा भेटतील ते आता कुणाला तरी विचारावे म्हणून मी जरा इकडे तिकडे बघायला लागले तेवढ्यात समोरून एक गोरटेला, बेताच्या उंचीचा, सडपातळ अंगलटीचा तरूण येताना मला दिसला. त्याने अर्ध्या बाह्यांचा शर्ट व स्वच्छ पांढरी पॅंट घातली होती. त्याच्या डोळ्यांवर चष्मा होतासे मला वाटते पण नक्की आता स्मरत नाही. त्याला मी नमस्कार केला आणि विचारले, "डॉ. गोसावी केव्हा भेटतील? आपल्याला काही माहिती आहे का?" त्यावर दोन पावले चालून तो दवाखान्याच्या हॉलमध्ये गेला. पाचच मिनिटात पांढरा कोट अंगावर चढवून तो बाहेर आला आणि मला म्हणाला, "मीच डॉक्टर गोसावी!" ते ऎकून माझे डोळे विस्फारले गेले आणि त्याच स्थितीत मी त्यांना म्हटले, "अगबाई, खरंच का आपण डॉक्टर गोसावी? मी तर आपल्याला कॉलेजमधला विद्यार्थीच समजले. माफ करा हं." त्यावर त्यांच्या शांऽऽत चेहर्‍यावर एक मंद स्मित उमटले. नंतर अतिशय काळजीपूर्वक त्यांनी मला तपासले. औषधे दिली. आश्वासक स्वरात मग ते म्हणाले, " औषधांनी लवकर बरे वाटेल. आपण काळजी करू नका. काही त्रास झालाच तर कधीही या. घरी गेल्यावर डॉ. रणभिसे साहेबांना व आपले वडील श्री. शंकररावजी यांना माझे नमस्कार मात्र कृपा करून सांगा. शंकररावजी आपल्या मासिकांच्या द्वारे लोकजागृतीचे, शिक्षणाचे किती मोठे काम करीत आहेत." मी त्यांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेतला. ते दरवाजापर्यंत आवर्जून मला सोडायला आले. परतीच्या वाटेवर माझ्या मनात येत होते, डॉक्टर असावा तर असा! किती ऋजु, किती विनीत, किती सुसंस्कृत! त्यांच्याविषयीचे हेच मत पुढील पन्नास वर्षात गुणाकार होऊन वाढले. त्यानंतर कधीतरी त्यांच्या पत्नी डॉ. प्रभाताई यांच्याशी माझा परिचय झाला. एक हुशार स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती मी त्यापूर्वीच ऎकली होती. आपल्या पतीप्रमाणे त्या देखील मला शांत, सौंम्य वाटल्या. काहीशा मितभाषीही वाटल्या. पण त्यांच्या स्नेहाविषयी एक ओढ तेव्हापासूनच मनात निर्माण झाली.

मी माझ्या कॉलेजच्या व्यापात आणि गोसावी दांपत्य त्यांच्या कामाच्या व्यापात असे. त्यामुळे मुद्दाम एकमेकांच्या घरी जाऊन भेटायला जमत नसे. मी प्राध्यापिका असल्याने घशालाच खूप काम असे. तो अधूनमधून रुष्ट व्हायचा. मग डॉ. गोसावींकडे जावे लागायचे. कामाच्या धबडग्यातून मी गेलेल्या दिवशी त्यांना थोडा निवांतपणा असला तर घसा तपासून झाल्यावर ते उत्सुकतेने विचारत, "काय मालतीबाई, नवे काय वाचलेत?" आणि नंतर आपण वाचलेल्या नव्या पुस्तकांबद्दल संदर्भ देत, माहिती देत बोलत रहात. ती पुस्तके वाचण्याची शिफारसही करीत. त्यांचे वाचन डोळस असे. रसग्रहण मर्मज्ञपणे केलेले असे. म्हणून मी त्यांना म्हणायची, "डॉक्टर, तुम्ही पुष्कळ लिहिले पाहिजे. लेखकाला आवश्यक असे खूपच गुण आहेत तुमच्याजवळ. आमच्या मासिकातल्या लेखकवर्गात डॉक्टर मंडळींची संख्या खूप मोठी आहे. तुमच्या लिहिण्यामुळे त्यात आणखी एक चांगली भर पडेल." त्यावर डॉक्टर फक्त हसत. मला त्यावेळी कशी कल्पना असणार की आजही डॉक्टर चांगले लेखन करताहेत. पण त्यांच्या भिडस्त आणि प्रसिद्धीपराङ्‌मुख वृत्तीमुळे ते आपल्याला त्याचा पत्ता लागू देत नाहीत म्हणून? त्यांचे ‘झुंज कॅन्सरशी’ हे अनुवादित कथांचे पुस्तक विलक्षण हृदयस्पर्शी आहे. भावोत्कट, ओघवती भाषा आणि वर्ण्यविषयाशी झालेली त्यांची समरसता यामुळे ते पुस्तक वाचताना कितीदा तरी माझे डोळे भरून आले. नुकतीच प्रकाशित झालेली, मृत्यूवर बेलिफाचे रूपक करून त्यांनी लिहिलेली कविता काळजाला घरे पाडीत गेली! आपल्याला कॅन्सर झाल्याने मृत्यू साक्षात्‌ समोर उभा आहे हे त्यांनी जाणले होतेच. पण आपल्या असामान्य धैर्याने खरे म्हणजे त्यांनीच मृत्यूला जिंकले होते! आपल्या कथासंग्रहावर अभिप्राय लिहावा असे त्यांनी मला एकदोनदा सुचविले. पण माझ्या हातून ते होऊ शकले नाही. याची बोच आता जन्मभर माझ्या मनाला लागून रहाणार. म्हणून सर्व वाचकांच्या साक्षीने डॉक्टरांचे मी मनोमन स्मरण करते आणि त्यांना विनविते, "डॉक्टरसाहेब क्षमस्व!"

एखादा माणूस ‘माणूस’ म्हणून काय उंचीचा, योग्यतेचा आहे हे ओळखायला त्याची पैशाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे ही एक कसोटी असते. महत्त्वाची कसोटी असते. दुसर्‍यांकडून पैसे घेताना, "आमचा वरपक्ष आहे म्हणून मानपान, थाटमाट करा आणि दुसर्‍याला पैसे देताना आमचा बोलूनचालून वधुपक्ष तेव्हा हुंडाबिंडा कुठून द्यायचा हो आम्ही?" अशीच अनेकांची भूमिका असते. डॉक्टरांची त्याबाबतची एक आठवण सांगते म्हणजे त्यांचे मोठेपण केवढ्या उंचीचे होते ते आपल्याला कळेल. मन अंतर्मुख होईल. अश्विनी-प्रसाद हॉस्पिटलमधली ही गोष्ट! डॉक्टरांना भेटायला मी गेले. बाहेर व्हरांड्यात थांबले. केसपेपर काढून देणारा माणूस कोणीतरी नवा असावा. त्याने सांगितलेली फीही मी भरली. डॉक्टर आत रुग्णांना तपासत होते. त्यांना हे काहीच माहिती नव्हते. चारपाच दिवसांनी मी प्रकृतीचा रिपोर्ट द्यायला गेल्यावर ते मला म्हणाले, "मालतीबाई, परवा तुम्ही पैसे दिलेत हे मात्र बरोबर झाले नाही हं. आम्ही तुम्हाला आमच्या कुटुंबातलेच एक माणूस मानले आहे, कळले ना? पुन्हा कृपा करून फी भरू नका. आणि व्हरांड्यातही बाहेर थांबत जाऊ नका. आलात की लगेच सिस्टरकडे निरोप देत जा. ती तुमच्या बसण्याची व्यवस्था करील." आणि अखेरपर्यंत त्यांनी याच जिव्हाळ्याने मला वागवले. माझ्या एकसष्टीच्या कार्यक्रमाला आणि वास्तुशांतीला डॉक्टर आणि प्रभाताई आवर्जून उपस्थित राहिले. मी ‘नको, नको’ म्हणत असताना त्यांनी माझ्या हातात आहेराचे पाकिट दिले आणि परत जाताना ते म्हणाले, "तुमची बंगली छान टुमदार झाली आहे हं. तिचे ‘पसायदान’ नाव आम्हाला खूप आवडले." ही आपुलकी मी कशी विसरेन?

त्या उभयतांनी उदंड कीर्ति आणि पैसाही मिळवला - पण त्याचा विनियोग कसा केला त्याची ही दुसरी आठवण! त्यांचा मुलगा हेमंत फार मनमिळावू आणि हुशार होता. अमेरिकेत त्याने एम. एस. केले. पुढे पीएचडी. ही झाला. सर्व परीक्षांमध्ये त्याने उत्तम यश मिळवले. हेमंत-वीणा हे अमेरिकेत आनंदात कालक्रमणा करीत होते. त्यांच्या सहजीवनाचे सुरेल संगीत ऎकून सर्वांना मोठा संतोष होई. पण हेमंतच्या अकाली आणि अकस्मात मृत्यूने ते संगीत एकदमच थांबले! मृत्यूच्या काठीचा आवाज नसतो म्हणतात त्याची अशा प्रसंगाने खात्री पटते. ईश्वराने मृत्यूकडे काम दिले आहे ते विश्वातील वाळलेली पानेफुले तोडण्याचे. पण तो दुष्ट कधीकधी सुकुमार कळ्या-फुलेच तोडून नेतो याला काय म्हणावे? हेमंतच्या मृत्यूचा दारुण आघात त्याच्या मातापित्यांनी असामान्य विवेकाने संयमाने सोसला. त्या दुःखातून थोडे सावरल्यावर त्यांनी मुलाच्या नावाने पंचवीस लाखांचा एक ट्रस्ट केला. त्यामधून ‘वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज’मधल्या चार विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी पंचवीस हजार दरवर्षी मिळतील अशी व्यवस्था केली! आपल्या दिवंगत गुणी पुत्राचे प्रतिबिंब जणू ते या विद्यार्थ्यांमध्ये पाहत होते. तसाच आणखी एक ट्रस्ट करून गरीब आणि गरजू कर्क-रुग्णांना एक लाख रुपये मिळावेत अशी योजना केली. दोन लाखांच्या कायम निधीमधून मतिमंद मुलांच्या शिक्षकांना मदत मिळेल असे त्यांनी केले! अशांनाच तुकाराम महाराजांनी ‘संत’ ही पदवी दिली आहे. तिची यथार्थता अशा उदाहरणांनी आपल्या ध्यानात येते. आपल्याला खूप काही शिकवूनही जाते.

डॉक्टरांच्या घराचे-हॉस्पिटलचे ‘अश्विनी-प्रसाद’ हे नाव मला फार आवडते. कारण ते अर्थपूर्ण आहे. डॉक्टरांच्या जीवनदृष्टीचा प्रत्यय त्यातून आपल्याला येतो. ‘अश्विनीकुमार’ हे देवांचे डॉक्टर होते. डॉक्टर गोसावी दांपत्य हे माणसांचे डॉक्टर! पण आपल्या डॉक्टरांना त्यांचे रुग्ण देवासमानच मानत असतात. याची जाणीव डॉक्टराच्या मनात सदैव जागी असायची. आपले आचरण रुग्णांच्या आपल्याविषयी असलेल्या अपेक्षांशी सुसंगतच असले पाहिजे अशा उदात्त भावना घराला नाव देताना त्यांच्या मनात असणार असे मला वाटते. पैशालाच देव मानणार्‍या माणसांची आज जगात गर्दी वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे जीवन एक आदर्श अपवाद म्हणून आपल्याला अधिकच पवित्र वाटते. त्यांच्या गुरुभक्तीची एक आठवण आता सांगते. आमची प्रा. नलू इनामदार अणि तिचे सर्व घर यांचे गोसावी कुटुंबाशी ऋणानुबंध खूप वर्षापासूनचे! उभयतांचे वडील मित्र होते. तेव्हापासूनचे! काही वर्षापूर्वी डॉ. दिलीपराव यांचे टॉन्सिल्सचे ऑपरेशन डॉक्टरांनी केले. डॉ. दिलीपरावांचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आमचे गुरुवर्य आर. एन. जोशी सर ‘अश्विनी-प्रसाद’मध्ये गेले. आमची नलू आणि सरांची कन्या प्रा. उत्तराबेबी याची जिवाभावाची मैत्री! त्यामुळे परकेपणाचा काही भाग नव्हताच. सर तिथे गेले त्यावेळी डॉ. गोसावी काही कामासाठी मोटारीत बसून बाहेर निघाले होते. सरांना पाहताच ते झट्‌दिशी खाली उतरले, सरांना त्यांनी खाली वाकून नमस्कार केला. आणि त्यांना म्हणाले, "सर, मी आपला जुना विद्यार्थी! आज इनामदार मंडळींमुळे आपले पाय माझ्या वास्तूला लागले हे मी माझे भाग्य समजतो." लगेच त्यांनी प्रभाताईंना हाक मारली. त्यांची सरांशी ओळख करून दिली आणि सांगितले, "प्रभा, हे आमचे ऋषितुल्य गुरुजी प्रा. आर. एन. जोशी सर." प्रभाताईंनीही नम्रतेने सरांना वाकून नमस्कार केला. मला अगदी मनापासून वाटते की अशी सुसंस्कृत माणसे हीच समाजाची खरी श्रीमंती असते. समाज अशा माणसांमुळेच मोठा होतो, उन्नत होतो.

डॉक्टरसाहेब कान-नाक-घसा यांचे उत्तम सर्जन तर होतेच पण त्याशिवाय इतर कितीतरी विषयातही त्यांना रस होता. संगीतापासून-शेतापर्यंत अनेक विषयांवर ते कसे अभ्यासपूर्वक बोलू शकतात याचा अनुभव मी प्रथम घेतला तो प्रा. डॉ. वि. रा. करंदीकरांबरोबर त्यांच्या घरी मी एकदा जेवायला गेले होते तेव्हा! प्रा. करंदीकर माझे मराठी विभागप्रमुख आणि स्नेही होते. डॉ. गोसावींची आणि त्यांची मैत्री लहानपणापासूनची! पुढे काही वर्षांनी डॉक्टरांची शेती पाहण्याचा योग मला आला. तिथले हिरवेगार प्रसन्न वातावरण, सर्वत्र असलेली टापटीप पाहून मी अगदी खूष झाले. घडीव दगडांची तिथली विहीर पाहून तीत पोहण्याचा मनला मोह झाला. डॉक्टरांचे फार्म हाऊसही छान होते. कै. हेमंतची स्मृति म्हणून त्या शेतातच डॉक्टरांनी सरस्वतीची शोभिवंत मूर्ति बसविली आहे म्हणे! गोसावी दांपत्याने आपला व्यवसाय नेकीने आणि सचोटीने केलाच, पण तो करीत असताना माणसाने जीवनावर प्रेम करीत रसिकतेने कसे जगावे हेही त्यांनी दाखवून दिले.

डॉक्टर व प्रभाताई याचा संसार असा सुखासमाधानात, आनंदात चालला होता. तो परस्परांवर गाढ प्रेम, आदर यावर उभा होता. आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे मोठे नाव मिळवूनही एकमेकांच्या कर्तृत्वाला, विकासाला उत्तेजन देण्यामुळे त्यांचा आनंद शतगुणित होत होता. दोन्ही मुलांचे संसार मजेत चालले होते. सुना सालस, हुशार होत्या. मिरज आणि परिसरातल्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतही डॉ. दांपत्य आवडीने सहभागी होत होते. उदंडयश-पैसा-मानसन्मान लाभूनही त्यांनी अहंकाराचा वारा आपल्या चित्ताला लागू दिला नव्हता. दुःखितांच्या दुःखनिवारणासाठी पूर्वीच्याच तळमळीने आणि तत्परतेने ते धावून जात होते. त्यांच्या कृतार्थ जीवनाचे चित्र असे मोठे मनोहारी आणि हृदयंगम होते. ते पाहणार्‍यालाही मोठा संतोष वाटे. त्यांच्या संसाराचा गंध उग्र हिरव्या चाफ्याचा नव्हता, तो होता जुई-निशिगंध यांच्या सुगंधासारखा मुलायम, सुकुमार, हळुवार पण ...!

नियति नावाच्या लहरी स्त्रीला त्यांचे हे सुख पाहवले नाही! एखाद्या सुंदर देवळातल्या शोभिवंत, रंगीबेरंगी, मोहक काचेच्या झुंबरावर रस्त्यावरच्या वेड्या माणसाने दगड मारून त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या कराव्या तसे नियतीने त्यांच्या संसारचित्राचे केले. तिने पहिला बळी घेतला तो तो त्यांच्या हेमंतच्या जीवनाचा! हा, आयुष्याच्या सांजवेळी, त्यांच्यावर झालेला दारूण आघात त्यांनी कसा सोसला असेल त्याची कल्पनाही करवत नाही. डॉक्टर आणि प्रभाताई स्वभावतःच विवेकी! संयमी! एकमेकांचे हात अधिक दृढपणे हतात घेऊन एकमेकांना धीर देत ते आयुष्याची वाटचाल करीत राहिले. पण नियतीला जणू तेही मंजूर नसावे. तिने कॅन्सर या दुर्धर, जीवघेण्या व्याधीचे रूप घेऊन आपला मोर्चा आता डॉक्टरांकडे वळविला. प्रथम तिने आपले खरे रूप प्रकट केले नाही. सर्वांना चकविले आणि मग मात्र तिने चाल केली ती आपल्या घातक सर्व शस्त्रांसह! मग मुंबई-शस्त्रक्रिया-असह्य वेदना देणारे उपचार हे सर्व आलेच की! अशा बिकट परिस्थितीतही ‘श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल’ साठी, रक्तपेढीसठी डॉक्टरांनी दीड कोटी रुपये जमविले!! आपल्या दुखण्याने चिंतातुर झालेल्या कुटुंबियांना, स्नेहीसोबत्यांना अविचल मनाने धीर दिला. ते म्हणत, "मृत्यू हे तर एक अटळ सत्यच आहे. पण त्याने मला माझ्या कामांची आवराआवर करायला, व्यवस्था लावायला, जवळजवळ वर्षाचा अवधि दिला आहे हे काय थोडे झाले? तसा किती जणांना मिळतो? हृदयविकाराच्या झटक्याने माणसं क्षणार्धात जातात. त्यांच्या कुटुंबियांची स्थिती काय होत असेल?" कोणी डॉक्टरांना भेटायला गेले तर ते आपल्या प्रकृतीबद्दल फारसे बोलतच नसत. उलट येणार्‍याचीच चौकशी करीत. कुशल विचारीत. हे त्यांचे सारे आचरणच आपल्याला थक्क करून टाकते. सुमारे अडीच महिन्यापूर्वी त्यांनी मला एक पत्र धाडले होते, त्यात रणभिसे कुटुंबियांच्या प्रकृतीची आस्थेने, विस्ताराने चौकशी केली होती. आणि स्वतःच्या प्रकृतीबद्दल मात्र ‘सध्या मला थोडे बरे नाही’ इतकाच पाच शब्दांचा मजकूर लिहिला होता. सारेच अतर्क्य आहे!

दिवसेंदिवस डॉक्टरांची प्रकृती खालावत चालली होती. पण अशा स्थितीतही त्यांनी ‘मनाचे श्लोक’ या आकाराने लहान पण आशयाने संपन्न असलेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. हे सारे पाहिले-ऎकले म्हणजे माझे मन म्हणते, "कुठून मिळवली असेल ही अद्‌भुत-अपूर्व शक्ति डॉक्टरांनी? हा विवेक, ही मृत्युंजय वृत्ति?" डॉक्टरांनी अखेरचे म्हणून जे पत्र लिहून ठेवले आहे त्यात सांगितले आहे, "माझ्या मृत्यूनंतर शोकसभा, भाषणे असे काही करू नये. सुट्टीही नको. सर्वांनी शांतपणे आपापले काम करावे. माझ्या कुटुंबियांना भेटायला घरी जाऊ नये. पत्राने आपल्या भावना प्रभाला कळवाव्यात." जगाचा निरोप घेतानाही डॉक्टर इतरांच्याच दुःखाचाच विचार करीत होते. त्यांच्या जीवनात विचार-उच्चार-आचार यांची जी सुसंगती दिसते ती केवळ मौल्यवानच नव्हे तर कमालीची दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच मला ती वंद्य वाटते.

डॉक्टरांच्या जीवनाचा जेव्हा मी साकल्याने विचार करते तेव्हा मला वाटते की, त्यांनी माणसाने कसे जगावे, कशासाठी जगावे एवढ्याचाच नव्हे तर कसे मरावे याचाहि एक आदर्श वस्तुपाठ आपल्या आचरणाने समाजापुढे ठेवला आहे. ते आचरण एका स्थितप्रज्ञाचेच आहे. त्यांनी ‘मनाचे श्लोक’ हेच पुस्तक इंग्रजी भाषांतरासाठी का निवडले असावे, याबाबत माझे मत असे आहे की, त्या श्लोकातून सांगितलेले तत्त्वज्ञान, अध्यात्म हे डॉक्टरांना नवे नव्हतेच! आयुष्यभर त्याच तत्त्वज्ञानानुसार ते वागत होते. कसे ते पहा. ते चंदनापरी झिजले! त्यांनी सज्जनांना निवविले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरले एवढेच नव्हे तर मनाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे मरावे परी कीर्तिरूपे ते उरलेही आहेत!

डॉक्टरांनी देह ठेवला आणि नियतीने पुन्हा एकवार दाहक दुःखाच्या अनुभवाचा वणवा प्रभाताईंच्या जीवनात पेटवला. जो कधीच विझणार नाही! त्यांचे सांत्वन कसे करायचे? कोणत्या शब्दांत करायचे? काही समजत उमजत नाही. मनाची विलक्षण घालमेल होत राहते. म्हणूनच देवाकडे माझी प्रार्थना- त्यानेच डॉक्टरांच्या मृत्यूने झालेले दुःख सोसण्याची शक्ति आमच्या प्रभाताईंना द्यावी.

आमचे डॉक्टर आता पुन्हा कधीही दिसणार नाहीत, त्यांचा मृदु शब्द पुन्हा कधी ऎकू येणार नाही हे अजूनही खरे वाटत नाही. ते गेल्याचे वृत्त ऎकताच मला एका इंग्रज रुग्णाच्या शब्दांची तीव्रतेने आठवण झाली. तो रुग्ण शेवटच्या घटका मोजत होता. तेव्हा त्याच्या मित्राने त्याला विचारले, "मित्रा, तुला खरंच वाटतं आहे का की तू आता मरणार?" त्या रुग्णाने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. तसेच त्याच्या ईश्वरावरील अढळ श्रद्धेचे द्योतकही आहे. तो म्हणाला,
"Raeally friend, I care not whether I am or not,
for if I die I shall be with God, if I live he will be with me."
मला तर हे उत्तर डॉक्टरांचेच आहे असे वाटते.
डॉक्टरांच्या पावन स्मृतीस माझे नम्र अभिवादन!