मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन लेख मराठीतले पहिले स्वतंत्र नाटक
मराठीतले पहिले स्वतंत्र नाटक पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन श्री. अरविंद यादव   
मराठीतले पहिले स्वतंत्र नाटक - थोरले माधवराव पेशवे नाटककार-विनायक जनार्दन कीर्तने
लेखिका - शोभा वर्‍हाडपांडे ( संदर्भ - अमृत मासिक १९७३)

सूत्रधार:- ऐक तर सांगतो. हे श्रोतेहो, तुम्हीही ऐका. विदुषका, आज मी या लोकांना मराठी दरबारात नेऊन तेथील हालहवाल दाखविणार. ते कोणते मराठी दरबार जर म्हणशील तर बाबा, आताचे नव्हे ज्या दरबारात परद्वीपस्थ लोकांच्या आज्ञा चालतात व राजे केवळ पिंजर्‍यातील पोपटाप्रमाणे असून स्वसत्तेच्या छायेसदेखील ओळखीत नाहीत, अशासाठी मी यांस कशासाठी नेऊ ? तर थोरले श्रीमंत माधवराव पेशवे, की ज्यांनी प्रजेचे पोटच्या पुत्राप्रमाणे प्रतिपालन केले, ज्यांचे नाव ऐकिले असता मुसलमानानी थरथरा कापावे व ज्यांच्या वियोगे करुन सर्व महाराष्ट्रदेश उदासीन होऊन निस्तेज झाला आहे, त्या सत्पुरुषाच्या दरबारी यांस नेतो आणि तेथील चमत्कार दाखवितो.

हृदयात उचंबळून आलेली सध्यस्थितीबद्दलची तीव्र खंत, पूर्वेतिहासाचा ज्वलंत अभिमान जणू एक तरुण मराठी नाटककार सूत्रधाराच्या मुखाने व्यक्त करीत होता. नवी प्रेरणा मिळविण्यासाठी त्याच्या प्रतिभाविहंगमाने इतिहासाच्या क्षितिजाकडे झेप घेतली होती. त्या तरुण नाटककाराचे नाव होते विनायक जनार्दन कीर्तने. आणि ही आहे सुमारे एका शतकापूर्वी लिहिलेल्या त्यांच्या शोकांत ऐतिहासिक नाट्यकृतीची सुरुवात इ.स. १८६१ मध्ये लिहिलेल्या व पुढील वर्षीच सुप्रसिध्द ’ इचलकरंजीकर नाटक मंडळी ’ ने रंगभूमीवर आणलेल्या या नाट्यकृतीचे महत्व मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक दृष्टींनी अनन्यसाधारण आहे.

हे जसे मराठीतील पुस्तकरुपाने प्रसिध्द झालेले पहिले स्वतंत्र नाटक तसेच मराठी रंगभूमीवर येणारे पहिले वाङ्‍मयात्मक स्वतंत्र नाटक’ होते. या नाटकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ’ मराठी भाषेत नाटके लिहिण्याचा हा प्रारंभच होय,’ असे जे विधान प्रा. बाळाजी बापूजी साने यांनी केले आहे ते एका अर्थाने खरे आहे.
मराठी रंगभूमीची स्थापना १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केली असे मानले जाते. पण विष्णुदासांची ही पौराणिक रंगभूमी वस्तुत: परंपरागत दशावतार नाटकांची सुधारलेली आवृत्तीच होती. ’ सूत्रधारचे लांबच लांब कंटाळवाणे गायन, विध्नहर गणेशाचे आगमन, वाग्देवी सरस्वतीचे नृत्य, विदूषकांचे अनेक प्रसंगी अप्रासंगिक, बीभत्स आणि रसभंगकारक असे वाणीचे व कृतीचे विलक्षण विलास, राक्षसांचे राळेतून सनृत्य अवतरण .... इंग्रजी व संस्कृत नाटकांच्या अध्ययनाने अभिरुची प्रगल्भ झालेल्या नवशिक्षितांना ह्याविषयी अरुची वाटणे स्वाभाविक होते.

१८५१ पासून संस्कृत व नंतर इंग्रजी नाटकांची भाषांतरे व्हायला सुरुवात झाली होती. परंतु कीर्तन्यांनी नव्या धर्तीचे, स्वतंत्र – ’ स्वकपोलकल्पित ’ – नाटक लिहिण्याचा प्रयत्न करुन स्वतंत्र ऐतिहासिक नाटकांची नवी परंपरा मराठी नाट्यक्षेत्रात सुरु केली. या नाट्यकृतीच्या तत्कालीन संदर्भातील आधुनिकतेमुळेच ’ इंग्रजी नाटकांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याने त्या नाटकांचा नमूना समोर ठेवून लिहिलेले ऐतिहासिक नाटक ’ असा अभिप्राय वि.सी. सरवट्यांनी दिला आहे. या अर्थाने आधुनिक मराठी रंगभूमीचा प्रारंभ झाला. तो कीर्तन्यांच्या ’ थोरले माधवराव पेशवे यांजवर नाटक’ या नाट्यकृतीने. इतकेच नव्हे तर ’ शालापत्रका ’- च्या, मे १८६५ च्या अंकात, प्रसिध्द झालेल्या लेखात, विष्णुशात्री चिपळूणकर यांनी मराठीतील सर्वप्रथम दु:ख पर्यवसायी नाटक, ’ट्रॅजेडी’, लिहिण्याचे श्रेयही श्री. कीर्तने यांनाच दिले आहे. संस्कृत नाट्यशास्त्राच्या नियमाविरुध्द माधवरावांचा मृत्यू प्रत्यक्ष रंगभूमीवर दाखविला असल्याने ’ अनेकास ही गोष्ट साहसाची वाटली व तिने या काळच्या नाट्यरसिक मंडळीत बरीच खळबळही माजवून दिली होती.’

१८६१ साली विनायकराव कीर्तन्यानी आपले नाटक मुंबईच्या ’ मराठी ज्ञानप्रसारक सभे ’ पुढे वाचले त्या वेळी त्यांचे वय २१ वर्षाचे असून ते कॉलेजात शिकत होते. १८५९ मध्ये पहिली मॅट्रीक मंडळी बाहेर पडली. १२० विद्याथ्यांत २० विद्यार्थी पास झाले, त्यात विनायकराव होते. गं. दे. खानोलकर लिहितात, ’ तेव्हाचा हुरुपच कांही निराळा होता. रानडे, कीर्तने ही तरुण मंडळी नुकतीच कोल्हापुराहून विद्येसाठी मुंबईस आलेली.. नवीन वारे ते १८५७ सालचे दिवस – यांच्या ठिकाणी खेळू लागले होते. यांचे गुरु वेस्ट-स्मिथ इत्यादी मंडळी ५७ सालच्या.... नाजूक प्रकरणावरही आपले निर्भिड आणि न्यायपरिपूर्ण उद्‌गार आपल्या वर्गात शिष्यांसमोर काढीत. स्वदेशाभिमान, परराज्य, पारतंत्र्य, परदास्य इत्यादी विषयांवर त्यांचे विचार फार उदार असत. ’(देवकृत ’ कीर्तने चरित्र,’ १५/१६). या परिस्थितीच्या उत्तेजनामुळे विनायकरावांनी प्रसन्न व उल्हसित मनोवृत्तीने ’ माधवराव’ लिहिले असावे. त्याचे प्रतिबिंब नाटकाच्या पहिल्याच अंकातील अगदी पहिल्या प्रवेशाताच पडलेले आपण पाहिले आहेच.

कीर्तन्यांचे हे नाटक बर्‍याच आधुनिक तंत्राचे असले तरी या संक्रमणकालीन नाट्यकृतीत पौराणिक रंगभूमीच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसून येतात. या नाटकाची सुरुवात परंपरागत सूत्रधार-विदूषक संवादाने झाली आहे. वाग्ड्‌मयेतिहासकार वि.सी. सरवटे, डॉ. अ.ना. देशांपांडे म्हणतात की, या नाटकात फक्त पहिल्याच प्रवेशात सूत्रधार-विदूषक ही दुक्कल दृष्टीस पडते. पुढे नाटकाच्या अखेरपर्यंत ती पुन्हा प्रगट होत नाही. श्री. श्री. ना. बनहट्टी यांनीही त्यांचाच री ओढून एवढेच एक पौराणिक नाटकाचे अंग या नाटकास चिकटले आहे.’ असे विधान केले आहे. परंतु हे पूर्णत: खरे नाही. पहिल्या अंकाच्याच चवथ्या प्रवेशात ही दुक्कल पुन्हा प्रकट होते, तर एकटा विदूषक चवथ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात मात्र पौराणिक नाटकाइतके त्यांना कथानकातच नाट्यप्रयोगात केंद्रवर्ती व सर्वगामी स्थान मिळालेले नाही. विनोद निर्मितीसाठी विदूषकाखेरीज किंवा ऐवजी स्वतंत्र विनोदी पात्र निर्माण करावयाची प्रथा पडली ती श्रीपाद कृष्णांच्या काळापासून. विदूषक-सूत्र-चार प्रवेशालाही त्यानीच फाटा दिला. पौराणिक नाटकांचे आणखीही काही अवशेष कीर्तन्यांच्या नाट्यकृतीत सापडतात.

सुमारे ५६ पृष्टांच्या या छोटेखानी नाटकात अंक एकूण चार असून प्रवेशांची संख्या २२ आहे. हे प्रवेश विलक्षण त्रोटक असून कधीकधी तर त्यांची लांबी एका पूर्ण पानाइतकीसुध्दा नाही. छोट्याछोट्या प्रसंगघटनांच्या गुंफणीतून माधवरावांच्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न कीर्तन्यांनी केला आहे. माधरावांचे चातुर्य, त्यांची राजनीती त्यांचे कौटूंबिक जीवन दर्शविणार्‍या अनेक घटना त्यांनी संविधानकात गुंफलेल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराज माधवरावाना पेशवाईची वस्त्रे देतात, येथून कथानक सुरु होते व माधरावांच्या मृत्यूने व रमाबाईंच्या सहगमनाने ते संपते. शेवटचे हे प्रवेश करुणरस्पूर्ण आहेत. माधवराव, रमाबाई, रामशास्त्री, राघोबादादा व आनंदीबाई ही या नाटकातील प्रमुख पात्रे. रुढ अर्थाने राघोबांना या नाट्कातील खलनायक म्हणता येईल. कीर्तन्यांच्या व्यक्तिरेखांविषयी लिहिताना बा.ना. देव म्हणतात, ’त्यांच्या कृतीत खरी मनुष्यस्थितीचा बाह्यरंगच चांगला उमटला आहे आणि अंतरंग जितका रेखला आहे तितका यर्थार्थ, मनोरंजक व पूर्ण सन्मार्गवर्तीय असा आहे. परंतु मानवस्वभावोदधीत शेक्सपिअर किंवा कालिदास यांच्यासारख्या खोल बुड्या मारल्याचा प्रत्यय मला फारसा आला नाही.’ मनोविश्लेषणाच्या तंत्राचा मराठी ऐतिहासिक नाट्यवाग्डंमयाच्या क्षेत्रात यथार्तपणे अवलंब होऊ लागला तो वसंत कानेटकरांपासून. परंतु या आद्य मराठी ऐतिहासिक नाटककाराने त्याची सुरुवात केल्याच्या खुणा या नाटकात जागोजागी दिसून येतात.

नाटकाची भाषा साधीच पण ओजस्वी व गंभीर आहे. मराठी सरदारांच्या संभाषणासाठी प्रादेशिक बोलींचा, ’कुणबाऊ ’ बोलीचा, अवलंब त्यांनी केला आहे. ’ या गोष्टीस उपाय नाही. कारण मराठी दरबारात शिपाया पासून सरदारापर्यंत सर्व हीच भाषा बोलतात.’ असा खुलासा प्रस्तावनाकार प्रा. साने यांनी केला आहे. विनोद निर्मितीचे एकदोन प्रयत्न कीर्तन्यानी केले परंतु ते फारसे यशस्वी झाले नाहीत. त्यांच्या विनोदाचे स्वरुप कांहीसे खालील प्रमाणे आहे.

चवथ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात हैदरअल्लीवर स्वारी होणार असल्याची वार्ता कांही ब्राम्हण करीत असतात. त्यावेळी विदूषक उपटतो. तो म्हणतो लढाईमुळे भटाभिक्षुकांची चंगळ होणार.

विदुषक: तुमचे आता फार उत्तम झाले. कोणाचे बाप मारतील, कोणाचे लेक मरतील, तितकी तुमची श्राध्दे वाढली.
रामभट्ट : मूर्ख बेटा, काय बोलतो पहा
विदूषक : बोलतो बरोबरच, मग काय, रामभट्ट लागले सांगायला, बापाय नरपंते, मुलाय रतपंते, दक्षिणाय टाकंते.
रामभट्ट : ही व्यक्ती कोठून आली हो येथे.
विदूषक : रामभट्ट महाराजा, आम्ही एक ब्राम्हण आहे. मोठे विद्‌वान आपणापाशी आले आहे. गावी आमचा बायको मेले, मूल मुसलमान झाले, घर जळून गेले, तेथून देशत्याग करुन येथे आले.
रामभट्ट : तुमचे नाव, गाव, गोत्र, सांगा.
विदूषक : माझे नाव शामबक्ष, माझे गाव महंमपूरी, माझे गोत्र रामभट्ट.

या नाट्कातील माधव-रमा संवादातील ’ एक साखरेचा..’ आणि शेवटच्या अंकातील ’सती’ प्रसंगाचा गवगवा झालेला दिसतो. ह्या नाटकाचा प्रयोग पाहिलेले श्री. कृ. आ. गुरुजी लिहितात: ’ थोरले माधवराव नंतर .. मशारनिल्हे कीर्तन्यांचेच जयपाळ नाटक रंगभूमी वर आले, परंतु त्यात ’ एक साखरेचा” नाही आणि ’सती’ ही पण नाही. म्हणून त्याचा बडेजाव जितका व्हावा तितका नाही. पण ..

’माधव: बरे तर जातो आता, पण एक साखरेचा..!
रमा : काय हे वेड लागले ! बोलायला तरी कांही वाटते.
माधव : वाटायचे काय, येतो( मुका घेऊन माधावराव जातो)

येवढाच काय तो या नाटकास शृंगाराचा स्पर्श. परंतु यांतील ’ सती ’ प्रसंग एक हे एक जबरदस्त प्रकरण होते. या नाटकाच्या शेवटी रमाबाई सती जाते असा प्रसंग आहे. ’ इचलकरंजीकर कंपनी’ चे चाणाक्ष चालक राघोपंत इचलकरंजीकर यांनी सातारा येथे नाटकी रमाबाईंच्या सती प्रसंगी गावातील काही सभ्य स्त्रियांच्या करवी रंगभूमीवर तिची ओटी भरवली. मग काय विचारता ! दुसरे खेळापासून गावातील स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी नाटकास येऊन रमाबाईची ओटी भरु लागल्या. हे प्रकरण इतके वाढले की रमाबाईचे सती जाणे हेच या नाटकाचे प्रमुख अंग होऊन बसले व तास दोन तास ओट्या भरण्याकडे; खण, नारळ, गहू व तांदूळ साठ्विण्याकडे जाऊ लागले. नाटक कंपनीची अर्थातच चंगळ झाली.’ यावरुन शंभर वर्षापूर्वीच्या मराठी प्रेक्षकांची मनोवृत्ती दिसून येते.( हा प्रकार उत्तर भारतात अजूनही सुरु आहे. रामलीलेच्या प्रसंगी विलक्षण भक्तिभावाने नटकी रामसीतेची चरणवंदना दिल्लीसारख्या शहरातही केली जाते.) या प्रसंगावर टिप्पणी करताना कृ. आ. गुरुजी मिस्किलपणे लिहितात, ’ हा इतका तपशील माझ्या लक्षात रहाण्यास दोन कारणे झाली. पैकी एक हे की, सती जाण्याच्या कुंडा भोवती पडलेली फुले, हळद, कुंकू आणि गव्हा-तांदुळांचा कचरा सतीचा प्रसाद म्हणून जो त्यावेळी अनेक स्त्रियांनी गोळा केला होता त्याप्रमाणे आमच्या घरीही आणला असोन तो दहाबारा वर्षापर्यंत मोठ्या बंदोबस्ताने पवित्र स्थळी ठेवला होता..

श्रीमंत छत्रपती सगुणाबाईसाहेबांनी सातार्‍याला राजवाड्यात या नाटकाचा प्रयोग केला तेव्हा तर या प्रकाराचा कळस झाला. गुरुजी लिहितात-

..सतीची ओटी भरण्याचा समारंभ फारच मोठा झाला.. सती जाण्याचे कुंड मातीचे असोन आत कापूर, तुळशीची काष्ठे आणि चंदनाच्या ढलप्या पेटवून ज्वाला सारख्या निघत असत.. ओट्यात गव्हाबरोबर मोतीही घातले होते.. ओट्या भरुन झाल्यानंतर रामकृष्ण दीक्षित आठले यांनी अग्नि पुजा वगैरे विधि यथासांग करवून अग्नीस तीन प्रदक्षिणा करविल्या.. आत प्रवेश करण्याचे वेळी रमाबाईनी ” माय बहिणींनो, ही रमा यापुढे आपणास दिसणार नाही, तर लोभ असू द्यावा बरं ” इतके बोलून अग्निप्रवेश केला. त्याबरोबर सर्व श्रोतृमंडळात ’ धन्य धन्य धन्य तुझी! ” अशा अर्थाचा ध्वनी निघाला.’
मध्ययुगातील सहगमनाच्या एखाद्या हृदयद्रावक प्रसंगाचे हे वर्णन नसून एकोणिसाव्या शतकातील शोकांत मराठी नाटकातील प्रभावी नाट्यप्रसंगाचे हे शब्दचित्र आहे. हे मुद्दाम सांगावे लागते. येथे पौराणिक रंगभूमीच्या पाऊलखुणा उमटलेल्या स्पष्ट दिसून येतात.

परंतु मराठीच्या या पहिल्या ऐतिहासिक नाटकातील अद्‌भुतरम्यता येथेच संपत नाही. पौराणिक रंगभूमी प्रमाणे येथेही देव-गंधर्वांचे अवतरण झाल्याचे दृश्य पहावयास मिळते. चवथ्या अंकाच्या सहाव्या प्रवेशात मृत्यूशय्येवर पडलेल्या माधवरावांना ग्लानीत असताना एक स्वप्न पडते ते असे:

प्रथम तीन विमाने स्वर्गांहून खाली उतरतात. एकातून लक्ष्मीनारायण, दुसर्‍यातून ईश्वरपार्वती आणि तिसर्‍यातून ब्रह्मासावित्री असे येतात, त्यामागून गंधर्व गायन करीत येतात..’

ही गंधर्व मंडळी नंतरच्या प्रवेशात देखील डोकावून जातात. अशा परिस्थितीत या नाटकाला झालेला पौराणिकतेचा स्पर्श फक्त सूत्रधार-विदूषक प्रवेशाइतकाच मर्यादित आहे. असे कसे म्हणता येईल ?

हा अद्‌भूतरम्य नाट्यप्रसंग म्हणजे सरळसरळ पौराणिक रंगभूमीची अनुकृती होय. संक्रमणकाळातील मराठीतील हा पहिला स्वतंत्र ऐतिहासिक नाटककार एका बाजूने आंग्ल नाटकांच्या अनुकरणाने नाट्यरचना व तंत्र यांचे नवीन प्रयोग करताना दिसतो, तर दुसर्या् बाजूने त्यांच्या मनावरील पौराणिकतेचा संस्कारदेखील त्यांच्या नाट्यकृतीत व्यक्त झाल्याचे अनुभवास येते. हा पहिला स्वतंत्र ऐतिहासिक नाटककार एका बाजूने आंग्ल नाटकांच्या अनुकरणाने नाट्यरचना व तंत्र यांचे नवीन प्रयोग करताना दिसतो, तर दुसर्‍या बाजूने त्यांच्या मनावरील पौराणिकतेचा संस्कारदेखील त्यांच्या नाट्यकृतीत व्यक्त झाल्याचे अनुभवास येते. परंतु नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे नाटकातील खास ऐतिहासिक घटना, प्रसंगांना किंवा संविधानकाला या पुराण अद्‌भुततेचा स्पर्शही झालेला नाही. त्यांतील पृथकत्व त्यांनी कटाक्षाने राखलेले आहे.

प्रयोगदृष्ट्याही हे नाटक सफल ठरले.या नाटकाचे दिग्दर्शक चिपळोणकर शास्त्रीबोआंनी केले होते असे म्हणतात. रमेचे काम करणार्‍या विष्णु वाटवे या स्वरुपसुंदर नटास स्वत: लुगडे नेसून शास्त्रीबुवा तालीम देत अशी आख्यायिका आहे. वाटवेंच्या अभिनयकौशल्याची तुलना सुप्रसिध्द नट भाऊराव कोल्हट्करांशी कित्येकांनी केलेली आहे.

त्यांची वेषभूषा, नटणे-मुरडणे इतके सहज सुंदर होते की, प्रत्यक्ष स्त्रीचा नखरा त्यापुढे रद्द ठरावा.’ असे एका नाट्यरसिकाने नमूद करुन ठेवले आहे.
कीर्तन्यांच्या या नाट्यकृतीने मराठी रंगभूमीवर एक नवचैतन्य निर्माण केले, स्वतंत्र वाग्डंमयीन नाटकाचे एक युग येथून सुरु झाले. कीर्तन्यांच्य अनुकरणाने ऐतिहासिक नाट्यवाग्डंमयाला बहर आला. अण्णासाहेब किर्लोस्करांसारखे प्रतिभावंतही या नाट्यकृतीने प्रभावित झाले. डॉ. मु. श्री. कानडे लिहितात, ’ १८६१ मध्ये श्री. वि.ज. कीर्तने यांचे ’ थोरले माधवराव पेशवे’ हे मराठी भाषेतील पहिले स्वतंत्र नाटक प्रसिध्द झाले व इचलकरंजीकर नाटक मंडळीनी ते रंगभूमीवरही आणले. त्याच्याच अनुकरणाने आण्णासाहेबांनीही ” अल्लाउद्दिनाची चितुरगडावर स्वारी” हे गद्य ऐतिहासिक नाटक तयार केले. १८६७ ते १८७० या काळात केव्हा तरी हे नाटक लिहून झाले आणि सांगलीकर नाटक मंडळी मुख्य नाटक संपल्यावर जोडनाटक म्हणून या नाटकाचा प्रयोग करीत असे !’

’डॉक्टर भाऊ दाजी, महादेव गोविंद शास्त्री यांसारख्या थोर गृहस्थांच्या स्तुतीस पात्र झालेल्या’ या नाट्काच्या तीन आवृत्त्या निघाव्या, यातच त्याच्या लोकप्रियतेचे व वाग्ड्मयीन गुणवत्तेचे रहस्य दडलेले आहे.