मुख्य विभाग

रंगभूमी दिन पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन श्री. अरविंद यादव   

आज दि. ५ नोव्हेंबर, २०११ रंगभूमी दिन. सांगली शहरामध्ये प्रत्येक वर्षी ५ नोव्हेबरला ही दुसरी दिवाळीच जणू सांगलीकर साजरी करीत असतात. सांगलीकराना या रंगभूमी दिनाचे आजही फार कोड-कौतुक आहे. का असू नये? अगदी तरुण मुला-मुलींपासून ते ८० वर्षांपुढील नाट्य रसिकांचीसुध्दा या कार्यक्रमाला उत्साहाने पारंपारिक वेषात उपस्थिती असते.

मराठी रंगभूमीची स्थापना १८४३ साली आद्य नाटककार श्री. विष्णूदास भावे यांनी सांगली येथे केली. यानंतर आद्य नाटककारांची परंपराच सांगली येथे सुरु झाली. आद्य नाटककार श्री. देवल, श्री. खाडीलकर यांची कांही नाटके अख्ख्या महाराष्ट्रात अतिशय गाजली. अजूनही ही नाटके कांही तरुण नाटक प्रेमी मंडळी प्रायोगिक तत्वावर सादर करीत असतात.

विष्णूदास भावे यांनी १८४३ साली रंगभूमी स्थापन केल्या पासून सांगलीकर अजून ही नाटक वेडेच आहेत. मुंबई, पुणे, याच बरोबर सांगली येथे नवीन नाटकाचा प्रयोग हा होणारच. सन १९४३ साली एक जेष्ठ नाटक कलाकार श्री. केशवराव दाते यांनी सांगली ही नाट्य पंढरी आहे असे संबोधले. तेव्हा पासून सांगली ही नाट्य पंढरी झाली. मुंबई, पुणे येथील नाटक कंपन्य़ा आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे करण्यात धन्यता मानीत होते. सांगली येथे पहिला प्रयोग केल्या नंतर ते नाटक नक्की यशस्वी होते असा एक श्रद्धेचा भागही निर्माण झाला होता.

सन १९४३ साला पासून रंगभूमी दिना दिवशी एका जेष्ठ व नामवंत नाट्य कलाकाराचा विष्णूदास भावे गौरव पदक देवून सन्मान करण्याची प्रथा निर्माण झाली. हा गौरव, हा सन्मान मिळणे म्हणजे नाट्यकलेसाठीची आपली कारकिर्द धन्य झाली असे मानणारे दिग्गज नाट्य कलाकार आहेत. आता पर्यत ५० एक नाट्यक्षेत्रातील दिग्गजांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. यामध्ये बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, नानासाहेब फाटक, मामा पेंडसे, दुर्गा खोटे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, विठाबाई नारायणगांवकर, प्रभाकर पणशीकर, हिराबाई बडोदेकर अशा अनेक जेष्ठ, श्रेष्ठ कलाकाराना हा सन्मान मिळाला आहे.

यंदाचा सन २०११ चा हा सन्मान सुप्रसिध्द नाटककार, निर्माता व दिग्दर्शक श्री. रत्नाकर मतकरी यांना प्रदान करण्यात आला. दि. ५ नोव्हेंबर २०११ रोजी याना हा सन्मान श्री. राम जाधव, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री. मुकुंद कुळे प्रमुख वक्ते म्हणून बोलले श्री. रत्नाकर मतकरी हे एक श्रेष्ठ नाटककार आहेत असे सांगत असतानाच ते एक व्यक्ति म्हणूनही कसे श्रेष्ठ आहेत हे त्यानी आपल्या अभ्यास पूर्वक भाषणातून व्यक्त केले.

या शिवाय या कार्यक्रमातील एक उल्लेखनिय उपक्रम म्हणून नमूद करताना मला खूप आनंद होत आहे. पडद्याच्या मागे काम करणार्याहचा तसा नाम परिचय सुध्दा कधि होत नाही. खरतर यांच्या मुळेच नाटकातील कांही प्रसंग उल्लेखनिय असे होवून जात असतात. असेच सांगलीतील ध्वनिमुद्रक व प्रकाश संयोजक श्री. श्रीकांत दातार बोलणे कमी पण काम चोख, असाच त्यांचा स्वभाव. यांचा व त्यांचे सहकारी श्री. सुरेश आठवले यांचाही अतिशय उचीत असा गौरव करण्यात आला, या बद्द्ल मी संयोजकाना धन्यवाद देतो

अरविंद यादव
सांगली