मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन नाट्यक्षेत्रातील व्यक्तीपरिचय ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत डेग्वेकर
ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत डेग्वेकर पीडीएफ प्रिंट ई-मेल
ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत डेग्वेकर यांना गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार
संदर्भ - दै. लोकसत्ता ४ नोव्हेंबर २०११
मराठी रंगभूमीवर ‘पंडितराव जगन्नाथ’ या संगीत नाटकातील ‘कलंदर’ची भूमिका अजरामर करणारे व आपल्या अभिनय कौशल्याने मराठी संगीत नाटय़ रंगभूमी गाजवलेले मुंबई येथील ज्येष्ठ नाटय़ अभिनेते चंद्रकांत तथा चंदू डेग्वेकर यांना यंदाच्या नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती देवल स्मारक समितीचे कार्यवाह चंद्रकांत धामणीकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
देवल स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे दि. १३ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या पुरस्कारासाठी चंद्रकांत डेग्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील ज्येष्ठ सिने व नाटय़ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली महापालिका स्थायी समिती सभापती मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत डेग्वेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, पदक, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सन १९९७ पासून देवल स्मारक समितीच्यावतीने हा पुरस्कार दिला जात असून यापूर्वी भालचंद्र पेंढारकर, श्रीमती जयमाला शिलेदार, प्रसाद सावकार, शरद गोखले, रामदास कामत, पंडित तुलसीदास बोरकर, कान्होपात्रा किणीकर, शांताराम सुर्वे व शिवराम राडय़े, मास्टर अविनाश, विनायक थोरात व अरविंद पिळगांवकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सत्तरी ओलांडलेल्या चंद्रकांत डेग्वेकर यांनी मराठी नाटय़ संगीत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. रायगड जिल्ह्य़ातील श्रीवर्धन येथे १६ जानेवारी १९३४ रोजी जन्मलेल्या चंद्रकांत डेग्वेकर यांनी मॅट्रिकनंतरचे शिक्षण घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रात्री नोकरी व दिवसा महाविद्यालयीन शिक्षण अशा पध्दतीने घेतले. मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या ‘मुंबईची माणसे’ या बाळ कोल्हटकर यांच्या नाटकात ‘वसंत’ भूमिका साकारताना राज्य नाटय़ स्पर्धा व चिंतामणराव कोल्हटकर स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकांमुळे चंद्रकांत डेग्वेकर उभ्या महाराष्ट्राला परिचित झाले. चंद्रकांत डेग्वेकर यांच्या या भूमिकेने प्रभावित झालेल्या नाटय़संपदेच्या तीन मालकांपैकी मोहन वाघ व विद्याधर गोखले यांनी त्यांच्या संस्थेच्या ‘मदनाची मंजिरी’ या नवीन नाटकात ‘चक्रदेव’ ही भूमिका दिली. तेथूनच चंद्रकांत डेग्वेकर यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली व एक गाणारा नट व्यावसायिक रंगभूमीवर विनोदी अभिनेता म्हणून वावरू लागला. सन १९६७ ला आण्णा पेंढारकर यांनी ललित कलादर्श या संस्थेत चंद्रकांत डेग्वेकर यांना बोलावले व आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध भूमिका चंद्रकांत डेग्वेकर यांनी साकारल्या.
चंद्रकांत डेग्वेकर यांनी आनंद संगीत मंडळी, मराठा मंदिर कला केंद्र, नाटय़संपदा, ललित कलादर्श, साहित्य संघ व भरत नाटय़ संशोधन मंदिर अशा अनेकविध नामवंत संस्थांच्या नाटकांत भूमिका साकारल्या. या अनेक नाटकांसाठी गुरू म्हणून भालचंद्र पेंढारकर व मास्टर दत्ताराम, तर नाना संझगिरी, आत्माराम भेंडे, नंदकुमार रावते, मो. ग. रांगणेकर व दामू केंकरे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांचे चंद्रकांत डेग्वेकर यांना मार्गदर्शन लाभले. ‘दुरितांचे तिमीर जावे ’ या नाटकातील ‘बापू’, ‘पुण्यप्रभाव’मधील ‘नुपूर’, ‘मानापमान’मधील ‘लक्ष्मीधर’, ‘मत्स्यगंधा’मधील ‘भीष्म’, ‘एकच प्याला’मधील ‘शरद’ व ‘देव दीनाघरी धावला’मधील ‘नारद’ यासह अनेकविध नाटकांतील चंद्रकांत डेग्वेकर यांच्या विविध भूमिका अजरामर आहेत. याशिवाय ‘गोरा कुंभार’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ‘नकटीच्या लग्नाला’ व ‘वल्लभपूरची दंतकथा’ अशा अनेक नाटकांतून विविध भूमिका साकारताना ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ व ‘प्रणयचतुर बायका’ अशा काही संगितीकाही चंद्रकांत डेग्वेकर यांनी केल्या आहेत. चंद्रकांत डेग्वेकर यांना यापूर्वी अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.