मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने रत्नागिरीचे ९१वे नाट्यसंमेलन
रत्नागिरीचे ९१वे नाट्यसंमेलन पीडीएफ प्रिंट ई-मेल

91व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन आज शानदार सोहळ्यात अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'विदर्भ, कोकण, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील कलाकार ठिकठिकाणी प्रयोगासाठी जात असतात. त्यांना त्या ठिकाणी चांगले नाट्यगृह उपलब्ध व्हावे यासाठी अधिक चांगली तरतूद आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे हौशी रंगभूमीसाठीसुद्धा काही गोष्टी करणे आवश्यक आहे. कारण विकासाच्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राची सांस्कृतिक उंची काय आहे, ती कशी भरीव करता येईल याचा विचार करायला हवा. ज्यांची दोन-तीन घरे आहेत त्या कलाकारांचे घरासाठी अर्ज येत आहेत. पण यापुढे एका कलाकाराला एकच घर मिळेल. गरजूंचा विचार करूनच कलाकारांना घरे दिली जातील.' राज्य सरकारने नाट्य परिषदेला काही रक्कम द्यावी या मोहन जोशींच्या मागणीला दुजोरा देताना अजित पवार यांनी पाच कोटी रुपये वित्त विभागाकडून जाहीर केले. हे पाच कोटी सांस्कृतिक विभागाकडे येतील आणि नाट्य परिषद आणि सांस्कृतिक विभागाच्या समन्वयाने त्याचा विनियोग करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे नाट्यकर्मींच्या ज्या काही मागण्या आहेत, समस्या आहेत त्यावर फेब्रुवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धांना सहकार्य करण्याचे त्यांनी जाहीर केले.

मराठी नाटक, चित्रपटात पाऊल ठेवायचे आहे - आशुतोष गोवारीकर
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या मनोगतात नाटक हे अभिनयातले सर्वोच्च स्थान आहे. कारण चित्रपटाप्रमाणेच तेथे रिटेक किंवा तंत्रज्ञानाची मदत मिळत नाही. सर्व काही रंगभूमीवर कलाकारांनाच करावे लागते. आपणही रंगभूमीवनच चित्रपटसृष्टीत गेल्याची कबुली देताना महाविद्यालयीन जीवनातील आपले नाट्यक्षेत्रातील अनुभव त्यांनी सांगितले. आज मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टी आपला वेगळा ठसा उमटवत आहे. मराठी चित्रपट आणि नाटकात पाऊल ठेवायचे असल्याचे त्यांनी जाहीर केले.

निर्मात्यांना अनुदान मिळत नाही -मोहन जोशी
अ. भा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाट्यनिर्मात्यांना अनुदान आणि राज्य नाट्यस्पर्धेतील बक्षिसांची रक्कम वाढवली, मात्र गेल्या काही दिवसांत नाट्यनिर्मात्यांना अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे नाटक कंपनीच्या बसेसना पार्किंगसाठी अनेक वेळा पोलीस आणि नगरसेवकांना तोंड द्यावे लागते. त्यकरिता शासनाने विचार करावा. आज नागपूर आणि औरंगाबाद विद्यापीठांना शासन अनुदान देते, मात्र शासनाच्या नजरेतून एवढे मोठे मुंबई विद्यापीठ कसे सुटले? आज मुंबई विद्यापीठात ललित कला केंद्र आहे, मात्र शासन मुंबई विद्यापीठाला अनुदान देत नाही. अशावेळी फी भरून त्या ठिकाणी नाट्यशिक्षण घेणे आणि पुढे रंगभूमीवर जाणे कलाकारांना अवघड ठरत आहे. शासनाने त्यात लक्ष घालावे. मध्यवर्ती शाखा आदर्श कला अकादमी उभारणार आहे. तसेच बालनाट्यविषयक चळवळ राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, पणनमंत्री लक्ष्मण ढोबळे, पालकमंत्री भास्कर जाधव, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, नाट्यसंमेलनाध्यक्ष राम जाधव, माजी अध्यक्ष रामदास कामत, कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, दत्तात्रय म्हैसकर, स्वागताध्यक्ष उदय सामंत, स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते, हेमंत टकले व इतर मान्यवर उपस्थित होते.