मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन लेख सांगलीची नाट्यपरंपरा
सांगलीची नाट्यपरंपरा पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन कै. मधुसूदन करमरकर   

विष्णुदास भावे - 'सीता स्वयंवर' पहिले नाटक

सन १८१८ साली मराठ्यांचे राज्य लयाला गेले, शस्त्रे गंजली सर्व समाजात एक प्रकारची मरगळ आली. कला क्षेत्रांतही फारसा उत्साह नव्हता. कीर्तने, ललीत, तमाशा हे करमणुकीचे प्रकार होते. सांगलीला त्यावेळी म्हणजे पेशवाईचे अस्तानंतर थोरले श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे संस्थानाधिपती होते. इंग्रजांशी शेवटपर्यंत स्वाभिमानाने लढणारा पेशव्यांचा सरदार म्हणून त्यांची ख्याती होती. हा राजा गुणांचा चाहता होता. त्यांच्याच पदरी असणार्‍या सुभेदार अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुद्धिवान् पण उनाड अशा मुलातील गुण या राजांनी हेरले होते आणि या १९-२० वर्षाच्या मुलाला श्रीमंतांनी आपल्या नोकरीत घेतले होते. सन १८४२ साली कर्नाटकातील 'भागवत नाटक मंडळी' कीर्तनी संप्रदयातील प्रयोग करीत सांगलीला आले होते. तागडथोम पध्दतीची ती नाटके या राजाला रुचली नाहीत आणि त्यांनी आपल्या पदरच्या विष्णू भाव्याला 'कर्नाटकी नाटक करी अशी ईश-आज्ञा वाटे मम मना गजानना' असा हुकूम केला.


राजाची आज्ञा म्हणून अतिशय कल्पक बुद्धिवान् व हरहुन्नरी अशा विष्णू भावेने वयाच्या २० व्या वर्षी एक अलौकिक चमत्कार घडवून दाखविला. संस्थानच्या नोकरांना नाटकात कामे करण्याचे हुकूम दिले. जमिनी इनाम देतो म्हणून सांगितले. परंतु काय वाट्टेल ते झाले तरी नाटक हे झालेच पाहिजे अशा जिद्दीने हा कलाप्रेमी संस्थानिक विष्णू भाव्याच्या मागे उभा राहिला, आणि १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉल मध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर' या नाटकाचा जन्म झाला. अभूतपूर्व घटना घडली. नटराजाने प्रेरणा दिली आणि सांगलीच्या गणपतीने सर्व विघ्ने दूर करुन कृष्णामाईच्या पाण्याने पावन झालेल्या या भूमीत मराठी नाटकांचे बीज पेरले. या बीजाचा फळाफुलांनी बहरलेला डेरेदार वृक्ष झाला आहे. धन्य तो सांगलीचा राजा आणि धन्य तो विष्णू भावे, जो आद्यनाटककार विष्णुदास भावे म्हणून ओळखला जाऊ लागला आणि एका रात्रीत मराठी रंगभूमीचा विश्वकर्मा झाला.


पुढे मराठी रंगमूमीचा प्रयोग कोठेही होवो त्या प्रयोगाच्या प्रारंभी सूत्रधार अशी प्रार्थना करीत असे की,

हे शारदे ब्रह्मतनये !
सांगली ग्रामी विष्णुदास कवी आहेत त्यांना तुझा आशीर्वाद असावा.

सांगलीकर नाटक मंडळी

१८५१ साली श्रीमंत चिंतामणराव वारले. त्यावेळी बाळाजीपंत माटे यांना प्रशासक म्हणून नेमले होते. विष्णुदासांनी केलेल्या नाटकांवर श्रीमंतानी केलेल्या खर्चाबद्दल सर्व मंडळींच्या नावे तसलमाती पडलेल्या होत्या. हे सर्व पैसे नाटकासाठीच खर्च झाले होते, परंतु श्रीमंतांचा हुकूम होण्याच्या आधीच श्रीमंत वारल्याने प्रशासकांनी तसलमातीचा उलगडा करण्यास सांगितले आणि कर्जे फेडण्यासाठी चार वर्षाची विष्णुदास वगैरे मंडळींना रजा दिली. या प्रशासकाचा हा तगादा मराठी रंगभूमीच्या पथ्यावर पडला. राजाश्रयाखाली असलेली मराठी रंगभूमी विष्णुदास भावे यांनी लोकाश्रयाकडे वळविली आणि पहिली व्यवसायिक मंडळी `सांगलीकर नाटक मंडळी' या नावाने स्थापिली आणि नाट्य व्यवसायाची मुहूर्तमेढ या थोर कलावंताने रोविली. १८५१ सालापासून १८६२ सालापर्यंत एकूण सात दौरे केले.


मुंबईला पहिला प्रयोग १४-२-१८५३ साली केला. दुपारचा प्रयोग, नाटकांचे सारांश इंग्रजीत छापून प्रेक्षकांना देणे, मुंबई टाईम्स मध्ये जहिरात आणि ग्रँट रोड थिएटर सारख्या भव्य नाट्यगृहात मराठी नाटकाचा प्रयोग अशी अभूतपूर्व कामगिरी या महर्षींनी करुन दाखविली. निव्वळ मराठी नाटकाची सुरुवात विष्णुदास भावे यांनी केली एवढेच नव्हे तर याच काळात १९५४ च्या सुमारास `राजा गोपीचंद' या हिंदी नाटकाचा प्रथम प्रयोग करुन विष्णुदासांनी हिदी रंगभूमीचे जनक म्हणून इतिहासात अलौकिक विक्रम करुन सांगलीचे नांव सर्वदूर पसरविले. त्यांची सर्व नाटके पौराणिक होती.


नाटक मंडळीत पुढे १८६२ च्या सुमारास भांडण झाल्याबरोबर विष्णुदासांनी जवळ जवळ नाट्यसंन्यास घेतला. परंतू तत्पूर्वी सांगली दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा महान पुरुष विसरला नाही. त्या काळामध्ये विष्णूदास भावेंना मदत करण्यास गोपाळ मनोळकर, जिवाजी पंत काकडे आणि गोविंद भट करमरकर हे सांगलीचे सुपुत्र होते. हेच तिघे पुढे सांगलीकर नाटक मंडळीचे मालक झाले. त्यानंतर श्री बळवंतराव मराठे या सांगलीच्या सुपुत्राने नूतन सांगलीकर नाटक मंडळी काढली. पुढे सांगलीकर संगीत हिंदी नाटक मंडळी निघाली. या मराठ्यांनी ३२ हिंदी नाटके केली. विष्णूदास भावे पध्दतीची नाटके १९१० सालापर्यंत या कंपनीने केली. विष्णुदास भावे यांचे निधन सांगली येथे ९ ऑगस्ट १९०१ रोजी झाले.

नाट्याचार्य देवल -

सन १८८० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर मराठी रंगमूमीवर आणखी एक महत्वाची क्रांती झाली. आण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतलाने मराठी संगीत नाटकाचा पाया घातला. त्यांचेच शिष्य गोविंद बल्लाळ देवल या कृष्णाकाठच्या सुपुत्राने मराठी रंगमूमीवर नवीन नवीन लेणी चढविण्यास सुरवात केली. देवलांचे नाट्य संगीत म्हणजे तर सहज सुलभ सोप्या अशा प्रासादिक काव्यांचा नमुनाच होता. त्यांचं `संशय कल्लोळ' हे नाटक आजसुध्दा मराठी मनाला मोहिनी घालीत आहे. देवलांचे `शारदा' नाटक म्हणजे खर्‍या अर्थाने पहिले सामाजिक नाटक. सांगली हरीपूरच्या परिसरात घडलेल्या सत्य कथेचा धागा उचलून देवलांनी मराठी रंगभूमीवर आपली `शारदा' अजरामर केली. `मृच्छकटिक', `शापसंभ्रम', `दुर्गा', `झुंझारराव' या नाटकांनी मराठी रंगभूमीला बाळसे चढविले. सांगलीच्या मातीने मराठी रंगभूमीला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे दिग्दर्शकाचे आद्यपीठ होय. खर्‍या अर्थाने गोविंद बल्लाळ देवल हे मराठी रंगभूमीचे पहिले दिग्दर्शक - तालीम मास्तर होत.


नाट्याचार्य खाडिलकर -

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला सांगलीच्या आणखी एका महान तपस्वी नाटककाराने लोकमान्य टिळकांचा पट्ट शिष्य, प्रखर देशाभिमानी, भारतीय संस्कृतीवर, महाभारतावर आणि विशेषत: भवभूतीवर प्रेम करणारे आणि शेक्सपियर पचविणारे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या सांगलीच्या थोर नाटककाराने मराठी रंगभूमीवर क्रांती केली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या `कीचकवध' नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती. या ज्वलंत प्रतिमेच्या `कीचकवध', `सवाई माधवरावांचा मृत्यू' या सारखी अनेक उत्तमोत्तम गद्य नाटके लिहिली. पांच गद्य नाटकांनी वश करुन घेतलेल्या रंगभूमीला या कवी कृष्णाने संगीत रंगभूमीचे अलौकिक लेणे चढविले. `विद्याहरण', `मानापमान', `द्रौपदी', `सावित्री' आदी संगीत नाटकाचा कोहिनूर असे ज्याचे वर्णन करता येईल असा `स्वयंवर' नाटकाने मराठी रसिक मनाला श्रीकृष्णाच्या मुरलीप्रेमाणे गुंगवून सोडले. म्हणूनच टीकाकार खाडिलकरांच्या काळाला मराठी रंगभूमीचे `सुवर्णयुग' म्हणतात. सांगलीच्या या नाट्याचार्याने मराठी रंगभूमीचा हा वृक्ष सुवर्ण पुष्पाबरोबरच अभिजात संगीताने सुगंधित करुन सोडला. १९४१ सालच्या शताब्दी महोत्सवाच्या वेळी ` आधि मी नाटक्या मग पत्रकार' असा थोर संदेश देऊन मराठी रंगभूमीला ऋणी केले.


असंख्य रत्ने

या थोर नाट्य महर्षीचे बरोबरच गडकर्‍यांचे नरहर गणेश कमतनूरकर हे सांगलीचेच `श्री', `सज्जन', `स्त्री पुरुष' या नाटकांमुळे त्यांनी रंगभूमी गाजविली. नाट्याचार्य खाडिलकरांच्या प्रमाणेच नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषविले होते. याचबरोबर सांगली मध्ये आणखी नावे घेण्याजोगी नाटककार मंडळी म्हणजे पुष्कळ आहेत.


कै. गणपतराव गोडबोले वकील मोठ्या मभिमानाने म्हणत असत की सांगलीतल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एखादे नाटक लिहावे असे वाटत असते. त्याप्रमाणे गोडबोल्यांनी अर्धवट नाटक लिहून सोडलेही होते. छापखाने वकील, भावे इंजिनियर या मागील पिढीतील लोकांनी नाटककार म्हणून नांव मिळविलेच. महाराष्ट्र शासनाने हौशी लोकांच्या नाट्य स्पर्धा सुरु केल्या आणि भावे नाट्यमंदिरातून यशवंत केळकर, मधुसूदन करमरकर, अरुण नाईक आणि दिलीप परदेशी, डॉ. मधु आपटे सारखे नवे नवे नाटककार उदयाला आले.


सन १८८० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर आणखी एक महत्वाची क्रांती झाली. आण्णासाहेब किर्लोस्कराच्या शाकुंतलाने मराठी संगीत नाटकाचा पाया घातला. त्याचेच शिष्य गोविंद बल्लाळ देवल या कृष्णाकाठच्या सुपुत्राने मराठी रंगभूमीवर नवीन नवीन लेणी चढविण्यास सुरवात केली. देवलांचे नाट्य संगीत म्हणजे तर सहज सुलभ सोप्या अशा प्रासादिक काव्यांचा नमूनाच होता. त्याच `संशय कल्लोळ' हे नाटक आजसुध्दा मराठी मनाला मोहिनी घालीत आहे. देवलांचे `शारदा' नाटक म्हणजे खर्‍या अर्थाने पहिले सामाजिक नाटक सांगली हरिपूरच्या परिसरात घडलेल्या सत्य कथेचा धागा उचलून देवलांनी मराठी रंगभूमीवर आपली `शारदा' अजरामर केली. `मृच्छकटीक', `शापसंभ्रण', `दुर्गा', `झुंझारराव' या नाटकांनी मराठी रंगभूमीला बाळसे चढविले. सांगलीच्या मातीने मराठी रंगभूमीला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे दि १/२ दर्शकाचे आद्यपीठ होय खर्‍या अर्थाने गोविंद बल्लाळ देवल हे मराठी रंगभूमीचे पहिले दि १/२ दर्शक - तालीम मास्तर होत.