मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली सांगलीतील आठवडे बाजार
सांगलीतील आठवडे बाजार पीडीएफ प्रिंट ई-मेल
--सौ.सुधा कुलकर्णी, विश्रामबाग,सांगली.

घरातील प्रेत्यक कुटुंबांच - कुटुंबातील प्रत्येक गृहीणीचं या आठवडे बाजाराकडे लक्ष असतं,काय असतं या आठवडे बाजारात? काय असतं आणि काय नसतं ह्याचा विचार पुढे मांडणारच आहे.पण आठवडे बाजार हा इतका सर्वाच्याच अंगवळणी पडला आहे की,असा बाजार कधी आहे ह्याकडे विशेषता गृहिणीचे लक्ष लागून राहते.आणि कारणही तसच असतं,दिवस उगवल्यापासून गृहीणींना प्रश्न पडतो.आज नाष्टा काय करता येईल ? जेवताना आज भाजी कोणती करावी लागेल ?मुलांच्या अथवा पतिराजांच्या आणि नोकरी करणारी स्त्री असली तर स्वत:च्या डब्यात भाजी करणं कोणती अधिक सोयीच होईल ? आजच्या अशा या प्रश्नांना मग स्त्री वळते ती आपल्या घरातील फ़्रिजकडे ! चार आठ दिवसांची भाजी एकदा आठवडे बाजारातून आणली की,तो आठवडा निवांत जातो गृहीणीचा.(At hand Ready)म्हणजे हाताशीच सर्व असल्याने तिच्या अन घरातल्या सगळ्यांसाठी ती मेनू ठरवून टाकते अन तशीच त्या त्या कामाला लागत असते.हे अगदी घरोघरी दिसणारे चित्र आहे.म्हणूनच भगिनीवर्ग आठवडे बाजारावर खूप अवलंबून असतो.

प्रथमत: म्हणजे आपल्या लहानपणी आठवडे बाजार हा लहानसहान खेड्यांतच भरलेला आपण पहात होतो-नाही ? पण आता-आता सुधारीत शहरांत सुध्दा हा आठवडे बाजार भरलेला आपण आज पहातोय,ह्याचं काय कारण ?

तर लहानसहान शहरं जशी वस्तीने वाढत गेली विस्तारीत होऊ लागली,दूरदूरच्या लोकवस्तीतून गृहसंकूलं ऊभी राहू लागली तसतशा तेथे रहाणार्‍या मूळ शहरांपासून दूर रहाणार्‍या लोकांना गरजा वाढू लागल्या. आपल्या बंगल्याजवळ,आपल्या गृहसंकूलाला जवळ कुठे काय मिळल कां ? याच शोधात साहजिकच जनता शोध घेत राहिली.मनुष्य स्वभाव असा आहे की,जवळ कुठे काय मिळेल आपल्याला दैंनदिन जीवनासाठी ? अगदी आपल्या घराजवळ ,फ़ारसा आटापिटा म्हणजे बसने,दुचाकीने,चारचाकीने न जाताही सहज चालण्याच्या टप्प्यात आणि ते ही फ़ारसा वेळ न घालविता आपल्याला कसं मिळेल ह्याचाच जणू शोध घेत असतो.

मग यावर उपाय काय ? तर त्या त्या विस्तारीत क्षेत्रात एकेका दिवशी (आठवडयातील) बाजार भरुं लागला.यांमुळे लोकांची सोय तर होतेच पण जवळपासच शेतकरी ही आपल्याला शेतांतील भाजीपाला घेऊन त्या त्या दिवशी विक्रीसाठी येऊ लागला.ह्यात शेतकर्‍याचा जसा विक्रीमुळे फ़ायदा होऊ लागला तसा सर्व जनतेचाही वेळ व पैसा वाचविणे हा तर मनुष्य स्वभावच बनून गेलाय नं ?

अशाच एका सांगली शहरासंबधी मला सांगायंच आहे.गेल्या १५/२० वर्षात सांगली शहर प्रत्येक दिशेनं वाढू लागलं आहे,प्रत्येक दिशेला उत्तर -दक्षिण, पुर्व-पश्चिम असं मोकळ चाकळ हात पसरुन वाढू लागलयं.प्रत्येक दिशेला निरनिराळी उपनगरं, बंगले ,प्लॅट सिस्टीम,सदनिका,गृहसंकूल, वाढू लागलेली दिसतात.

प्रत्येक विस्तारीत नगरांत भाज्यांचे लहान मोठे स्टॉल्स,मॉल्सही दिसू लागली आहेत .आज सांगली शहरांपुरतं बोलायचं झालं तर येथील लोकसंख्या आज जवळपास अंदाजे ५ ते ६ लाखांपर्यत पोचली आहे.आणि म्हणूनच छोटे छोटे बाजार ,मॉल्स,किराणा बाजारांची गल्लीप्रत,ऎकेक दुकाने सहज दिसून येतात.हे रोजच्या व्यवहारात आपण पाहतोच.विस्तारीत भागात लहान मोठे मॉल्स,दुकानं,दूध डेअरी जशी वाढू लागलीत तसेच आठवडयांचा बाजारही त्या त्या भागात भरू लागला आहे.अगदी सांगली शहरापुरतं बोलायच झालं तर सांगली शहरापासून ३ते४ किलोमीटरवर विश्रामबाग,पुढे वानलेसवाडी ,दक्षिणेकडील गर्व्हमेंट कॉलनी, पूर्वेस वारणाली विजयनगर ,तर उत्तरेकडील कुपवाड,या सर्व दिशांना अनेक वसाहती-अपार्टमॆंटस,(सदनिका),गृहसंकुल आणि लहाममोठे बंगले वाढतच आहेत.म्हणूनच सांगली नगरपरिषदेचं रुपांतर महापालीकेत झालं.

सांगली महापालीका अस्तित्वात आल्यापासून डोंळ्यात भरणारी आणि सदैव स्वागर्ताह असणारी एक मोठी सुधारणा म्हणजे सांगली शहरांतील विस्तारीत भागांत कोणत्या तरी एका दिवसांत त्या त्या भागातील लोंकाच्या सोयीसाठी भरवला जाणारा आठवडे बाजार. महापालीकेचा निर्णय म्हणूनच जनतेला खुप सुखावून जातो आहे.तेही विशेषता स्त्री वर्गाला ,म्हणूनच महापालिकेचं प्रथम अभिनंदन करुनच पुढे जायचं आहे मला.

आता हेच पहानां आठवडयातील सातही वार या आठवडे बाजार भरण्यांत व्यसत असतात.सांगलीतल्या कोणत्याही एका उपनगरांत वा दाट लोकवस्तीच्या भागांत आठवडयातील कोणत्या ना कोणत्या एका वारी हा बाजार भरलेला असतो.महापालीकेनं त्या त्या भागांत एकेक वार ठरवून दिल्याने त्या त्या भागांत त्याच दिवशी लहानमोठया प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो.आता आपण प्रत्येक वाराला कुठे कुठे बाजार भरतो हेच पाहू या ना !

रविवार - विश्रामबाग मधील १०० फ़ुटी रोडवर भरणारा आठवडे बाजार, हा बाजार बर्‍यापैकी मोठया प्रमाणात भरलेला असतो.
सोमवार - पुलाखालील स्टेशन समोरुन जाणार्‍या रस्त्यावरुन पुढे शिंदे मळ्याजवळून जाणार्‍या रस्त्यावर हा बाजार भरलेला असतो.बुधगांव, माधवनगर, या सारख्या विस्तारीत भागांतही असाच बाजार एका ठरविल्या दिवशी हमखास भरतोच.
मंगळवार - विश्रामबाग मधील जिल्हापरिषद अध्यक्षांच्या बंगल्यावरून जाणार्‍या व रेल्वेपुलावरुन सरळ खाली जाणार्‍या रस्त्यावर भरला जाणारा हा आठवडे बाजार, हाही बाजार बर्‍यापैकी मोठा असतो.
बुधवार - विश्रामबागजवळच असणारी वानलेसवाडी, विजयनगर या भागांतील जनतेसाठी जवळच असणार्‍या पुलाजवळ भरतो.
गुरुवार - सांगलीच्या मध्यवस्तीत,दाट असणार्‍या वस्तीसाठी चांदणी चौकात भरणारा आठवडे बाजार,हा बाजारही मोठया प्रमाणात भरलेला आपण पहातोच आहोत.
शुक्रवार - विश्रामबाग मधील वारणाली वसाहत व जवळपास असणार्‍या वसाहतींसाठी भरला जाणारा वारणाली रोडवर हा बाजार थोडया लहान प्रमाणात असतो.पण ह्याचेही पुढे पुढे मोठया प्रमाणात रुपांतर होणार नक्कीच.
शनिवार - ह्यात शनिवारी गर्व्हमेंट कॉलनी येथे ही आठवडे बाजार असतो.सांगलीतील प्रमुख मोठा भरविला जाणारा बाजार, सांगलीतल्या महानगरपालीका, पोलीस चौकी पासून सुरु होणारा हा बाजार कापडपेठ, सराफ़कटा, मारुतीरोडकडे जाणारा रस्ता ते थेट सांगलीवाडीकडे जाण्याचा रस्त्यापर्यंत हा बाजार मोठयाप्रमाणात भरलेला आपण प्रत्येक शनिवारी पहात असतोच. या आठवडे बाजारात काय नसतं तर उत्तर आहे सर्व काही असतं.जरा सावकाश हा बाजार फ़िरुन या ना की, आपल्या नजरेला काय काय दिसतं पहा, म्हणजे माझ्या म्हणण्याची प्रचीती येईल.
आता ह्या,मोठया बाजाराबद्‍दल मी विस्तृतपणे बोलणार आहे.

सर्व प्रथम डोंळयात भरतो तो भाजीबाजार, सर्व प्रकारच्या हिरव्यागार पालेभाज्या,फ़ळफ़ळावळ,ताजी रसरशीत अशी आणि ज्या ज्या हंगामात भाज्यांचीच काय विविध फ़ळफ़ळवांची सुध्दा रेलचेल असतो.त्या त्या हंगामात ह्या सर्व गोष्टी स्वस्त अन, मस्त मिळत असतात.शिवाय काही शेतकरी आपापल्या शेतातील भाजी ,तर बागवान शेतकरी सुध्दा आपल्या शेतातील भाजी तर बागवान शेतकरी सुध्दा आपल्या शेतातील बागेतील फ़ळफ़ळावळ थेट बाजारांत आणत असल्याने त्यांची विक्री व ग्राहकांची खरेदी होत असते असचं म्हणाव लागेल.म्हणूनच शेतकरी विक्री चांगली होत असल्याने खूष तर ग्राहक ताजा टवटवीत माल माफ़क दरात मिळत असल्याने तोही खूषच असतो.याशिवाय कांदे,बटाटे,लसूण घरांत नित्य लागणार्‍या वस्तू म्हणजे असं बघा- प्लास्टिकच्या लहानमोठया बाटल्या,मग,प्लास्टिकचे डबे,पिठाच्या चाळण्या,शाळेतल्या मुलांचे टिफ़ीन बॉक्स,फ़ुलांच्या दुरडया,परडया,सोप केसेस,लहान मोठया पर्सेस,आणि आता तर मोबाईलच्या कव्हर्सची सुध्दा आता विक्री होत असलेली आपण पहात आहोतच.पादत्राणे,स्लिपर,लहान मोठयाचे बूट,तसेच तवे-बिडाचे,लोखंडाच्या कढया अगदी लहानांपासून ते मोठया कढईपर्यंत ,हिडालियमची आणि जर्मनची पांढरी भांडी ही येत असतात.नित्य लागणारे झाडू,झाडण्या,फ़टकण्या,ब्रशेस,लहान लहान रॉकेलचे दिवे,चिमण्या त्यातील वाती,वातीचे स्टोव्ह,रॉकेलच्या स्टोव्हचे पार्टस,म्हणजे वरची जाळी,बर्नर्स,पिना, लहान मुलांच्या रबरी फ़ुग्यापासून दोरीच्या उडया,चेंडू,लाकडी विविध खेळणी,अशी एक ना दोन हरएक वस्तु या आठवडे बाजारात असतेच असते,म्हणूनच अडलेल्या नडलेल्यांना खेडयातील लोकांना हा बाजार आपला बाजारच आहे असं वाटत असतं.

प्रत्येक फ़ळांच्या हंगामात -केळी,चिकू,संत्री मोसंबी,द्राक्षे,आंबा,फ़णस,अंजीर,कलिगंड,खरबूज,अननस,सफ़रचंद,रामफ़ळ,बोरं या सारख्या हंगामी फ़ळांच्या ढीगच्या ढीग दिसत असतात.आणि असं म्हणतात ना प्रत्येक ऋतुतील फ़ळं ,भाज्या ह्यांची चव घ्यायलाच हवी ते प्रकृतीसाठी काही खोट नाही आणि म्हणूनच उसाचा रस, फ़ळांचा जयूस,त्यांचे हातगाडयावरच काय पण कोपर्‍या कोपर्‍यापासून स्टॉल्स दिसू लागले आहेत.जरा मन मोकळा फ़ेरफ़टका मारुन पहा म्हणजे मी काय म्हणते त्याची सत्यता पटेल.

यांशिवाय विविध प्रकारची भेळ,मिसळ,गारेगार,आईस्क्रीम,यासारखे पदार्थ बंद पाकीटातून अथवा डिश,कप मधून देतांना आपण पहातो,तयार भंडग,चिरमुरे,फ़ुटाणे,खारे शेंगदाणे,रेवडया,वडया,फ़रसाण,काय वाटेल ते विकत घेता येते.

त्या नंतर एका विशिष्ट भागांत लोंखडाच्या वस्तु- त्यांत विळे,कोयते,लहान मोठया कढया,कात्र्या,आप्पेपात्र,बिडाच्या लोंखडाच्या बनविलेले हरएक वस्तु इथेच पहायला मिळते.

तर बाजारांतील एका विशिष्ट भागांत मांसळीचा बाजार असतो.त्यांतील विविध लहान मोठे मासे,सुकी बोंबील,सुका बोंबील मसाला हाही ग्राहकांना खरेदी करता येत असतो.हा पण एक आहे हं बारा महिने मासळी मिळत नसल्याने त्यांच्या हंगामातच विपूल प्रमाणात आलेली दिसते. चोखंदळ ग्राहक आपली खवय्येगिरी सांभाळतांना ह्याचा आंनद घेत असतो.जो तो आपल्या आवडीप्रमाणे आपल्या खिशाला परवडेल अशाच या वस्तुची खरेदी करीत असतो.

नुसती भाजी घ्यायची म्हटली तरी किती विविध प्रकारच्या पालेभाज्या दिसतात.हिरव्यागार ताजी तवानी पालेभाजी पाहिले की, स्त्री वर्ग एकतरी पालेभाजीची पेंडी आपल्या पिशवीत टाकतेच टाकते.पालेभाज्यांत विविधता किती- चुका,चाकवत,आळू,मेथी,पालक,शेंपू,राजगिरा,माठ,तांदळी,करडई,चंदन बटवा,हरभर्‍याची हिरवीगार भाजी,पोकळा,कांद्याची पात,लसूणपात,मुळयाचा पाला,हिरवीगार मनोवेधक कोंथिबीर या सारख्या भाज्या मन वेधून घेत असतात.आहार शास्त्राप्रमाणे आणि वैद्यकीय सल्लयानुसार रोजच्या आहारात थोडयाप्रमाणे फ़रकाने यांचा समावेश असला की,त्यांतील खनीजें,कॅल्शिअम रेषायुक्त (फ़ायबार्स) भाजीपाल्याने शरीराला होणारा फ़ायदाही लक्षात घेउनच आजकालच्या सुशिक्षित,कुशल सुग्रणी ह्या भांज्याच्या खरेदीत रमलेल्या दिसतात,नव्हे नव्हे अट्‍हासाने खरेदी करत असतात.

हल्लीच्या शाळेच्या मुलांच्या डब्यात सुध्दा पोळी भाजीचाच आग्रह असल्याने फ़ळभाज्याही तेव्हढयाच आवडीने आणि आपापल्या निवडीने खरेदी करीत असतात.पन्नाशीनंतर तरी सर्वचजण ह्या स्वागर्ताह आहे नं ही गोष्ट ?

आजकालच्या फ़ास्टफ़ूडच्या जमान्यांत साहजिकच टिव्ही वरील आकर्षक जाहिराती पाहून लहान मुलांच काय तर तरुण मंडळी,आबालवृध्द,मंडळीही एकदा तरी ह्याची चव घेऊन बघत असतात.पण रोजच्या जीवनात यांचा अतिरेक झाल्यास त्यांचे दुष्परिणाम न कळत होत असतात.मग डॉ.कडे वैद्यांकडे धांव घ्यायची अन आपली तक्रार सांगत बसायची,त्यात होणारे दुष्परिणाम म्हणजे अनावश्यक वजन वाढणे,पोटाचा घेर वाढणे,बी,पी (रक्तदाब),डायबेटीस(मधूमेह),यासारखे आजार आप्ल्या शरीरात ठाण मांडून बसतात-अगदी आपल्या न कळत -चोरपावलांनी येतात,म्हणूनच जाणीवपूर्वक ह्या फ़ास्टफ़ूडचा होणारा अतिरेक टाळावा-मोह टाळावा हेच आपल्या आरोग्याच्या द्रुष्टीने महत्तवांच वाटतं,आणि म्हणूनच आपलं महाराष्ट्रीयन जेवण गुजराथी थाळीच कशी योग्य आहे हे ही पतायला हरकत नसावी,असो.

तर विषयांतर होऊ नये म्हणून परत फ़ळभांज्याकडे वळते.फ़ळभाज्यात तरी किती विविधता !

कांदे बटाटे रताळी सोडून बाजारांत दिसणार्‍या फ़ळ्भाज्या आता बघू या. ह्यात भोपळा,दूधीभोपळा,कार्ली,पडवळ,कोबी,फ़्लॉवर,ढब्बू मिरची,फ़रस बी,काकडी ,गाजर,टॅमाटो,मुळा,भेंडी,गवार,मटार,वाळावरच्या किंवा ऊसावरच्या शेंगा,अथवा चपटया शेंगा,वांगी,कच्ची केळी,केळफ़ूल इत्यादी भाज्याचा भरणा असतो.एकच भाजी मग ती पाले भाजी असो किंवा फ़ळभाजी, किती विविध प्रकाराने चविष्ट बनविता येते हे त्या त्या घरच्या सुग्रणीवरच अधिक अचलंबून असतं.प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी आणि न्यारीच असते.मला वाटतं पालेभाज्या फ़ळ्भाज्या आणि फ़ळफ़ळावळ ह्या बद्दल बरचं काही सांगून झालं आहे.तेव्हा आता अठवडे बाजारात इतर आणखी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो ते ही थोडक्यात पाहूया.

ह्यात एका विभागात लहान मुलांचे तयार कपडे,झबली टोप्यांपासून ते शर्ट चड्डी,विजारी पॅट,टी शर्टस,कानटोप्या,डोक्याला बांधयचे रुमाल,हातरुमालांचे पॅकेटस,अथवा सुटे लेडीज अ‍ॅण्ड जेन्टससाठी हात गाडयावर अथवा उलटया करून ठेवलेल्या छत्रीवर लटकवलेले दिसतात.अर्थातच ह्या गोष्टी खेडयातील गोरगरीबच जास्त करुन घेत असतात,थोडया किंमतीत तरी आकर्शक रंगसंगतीत लक्ष वेधून घेत असतात,खेडेगावातील बाजार करायला येणार्‍या ग्राहकांसाठीही सुवर्णसंधीच वाटल्यास नवल नाही,इतकी ती स्वस्त अन मस्त असतात.

आणखी एका कोपर्‍यात अथवा रस्त्यावरून म्हणा हंव तर शेतकरी वर्गाला नित्य नैमितिक लागणार्‍या वस्तु म्हणजे बैलाचा कासरा,लांब लांब दोर,तर काही ठिकाणी तयार कांद्याची रोंप- सणावारी अथवा नेमाने खाणार्‍या लोकांसाठी विडयाची पाने,फ़ुलं,गजरा,वेण्या,लहान मोठे हार,पुष्पगुच्छ,विविध तर्‍हेचे बुके ह्याही गोष्टी आवर्जून बघण्यासारख्या असतात.फ़ुल बाजार - हा फ़ार मोठा बाजार असल्याने त्याचा केवळ उल्लेख करून पुढे जावे लागेल ते कुंभारगल्लीकडे.कुंभार गल्लीतील हा बाजार हा तेवढाच छान अन मोठा बघण्यासारखा असतो.त्यांत गाडगी,मडकी,लहान मोठे माठ,खुजे विविध प्रकारचे,तोटीचे उभे डेरे,पणत्या,दिवाळीत लागणार्‍या विविध प्रकारच्या पणत्या,मातीचेच पण तरीही रंगवलेले पंचदिवे एक ना दोन कितीतरी गोष्टींचा उल्लेख करता येईल.उन्हाळयात माठांची घरोघरी आवश्यकता भासत असल्याने गरीबांचा फ़्रिज म्हणविणारा मोठा माठ,डेरा विपुल प्रमाणात आलेला आपण पहातोच.मध्यवर्गातील लोकांनासुध्दा फ़्रिजमधील पाण्याच्या बाटलीपेक्षा थंडगार माठातील पाणीच अधिक गोड लागते,तहानही भागते.शिवाय पुरेशा थंडाव्याने भरपूर पाणी पोटात जाते.फ़्रिजमधील अति थंडगार पाण्याच्या वापराने शरीरावर होणारे अनिष्ट परिणाम टाळ्ता येतात,तर असा आहे हा कुंभारवाडा. त्यानंतर आठवडे बाजारांतील आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल तो म्हणजे जुना कपडयांचा बाजार,हां, हा बाजार मात्र फ़क्त सांगलीत प्रत्येक शनिवारी भरणार्‍या बाजारांतच दिसत असतो.लहान सहान उपनगरीय भागात भरणार्‍या बाजारांत ह्या बाजाराचा समावेश झालेला अजून तरी मला दिसला नाही, म्हणूनच ह्या जुन्या कपडयांच्या बाजारांत थोडी फ़ार गर्दी आढळते ती खेडयातील ग्राहकांची, गोरगरीब जनतेची या बाजारांत काय नसतं, ’भांडी घ्या म्हणून दारोदार फ़िरणार्‍या कोणटोणी ,बोहारीण जुने कपडे घेऊन नविन भांडीकुडी त्या बदल्यात देत असतात.ह्याच बायका ,पुरुष हे जुने कपडे व्यवस्थित लावत असतात.बाजारात त्यांत जुन्या साडया,लुगडी,पांघरुणं,शर्ट,पॅटस,हाफ़ चडडी,विजारी या सारख्या जुन्या कपडयांचा समावेश असतो.अगदी पाचपंचवीस रुपयापासून पन्नास रुपायांपर्यत वर्गवारी केलेली असते. ह्या जुन्या कपडयांची म्हणूनच गोरगरीब जनता आपल्या आवाक्यांत असेल. त्या त्या कपडयांची खरेदी करीत असतात,हा जुना बाजार सुध्दा सांगलीच्या शनीवारच्या बाजारांतच भरलेला दिसतो.अन्य उपनगरीय बाजारांत ह्याचा अभावानेच अस्तित्व दिसत असेल.कडधान्य ह्या शिवाय धान्य बाजार -सुकी लाल मिरची बाजार,मसाल्याचे पदार्थ,लोणची,पापड बंद पाकिटांमधून अथवा सुटीही मिळवता येतात.

दहा बारा वर्षापूर्वी सांगलीत शनिवारचा बाजार हाच असे.त्यासाठी बस,रिक्षाने जावं लागायचं.आज पेट्रोल,डिझेल महागल्याने बस रिक्षांचा खर्चही मध्यमवर्गीयाच्या खिशाला परवडणारा नाही आहे.मला आठवतं ह्या बाजारांसाठी सांगलीत पुर्वी जातायेता बसचा खर्च रुपया दोन रुपयांपर्यतच असे.आज रिक्षांच भांड प्रत्येक ट्रिपला ५० रुपयांपर्यत पडत असल्याने मध्यम वर्गाला हा ’तुकारामाचा व्यापार ’ परवडेनासा झालाय,म्हणूनच आठवडे बाजाराची,त्या त्या विभांगात भरणारे आठवडे बाजाराची किंमत कळते,शिवाय प्रत्येकाचा वेळ तर अनमोलच आहे ना ? म्हणूनच आज विभागाविभागातून भरवले जाणारे आठवडे बाजार लोकप्रिय ठरुं पहात आहेत. नाही नाही यांची नितांत आवश्यकता होतीच.

जनतेची सोय,वेळेचा अपव्यय,या सार्‍याच गोष्टीचा विचार करतां आठवडे बाजारांची महती अथवा महिमा काय आहे हे लक्षात घेण्यासारखंच आहे, नाही ?