मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय शैक्षणिक सेवाभावी संस्था मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली
मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली पीडीएफ प्रिंट ई-मेल
संस्था परिचय व कार्यविस्ताराच्या भावी दिशा
आकाशवाणी मुंबई, पुणे व सांगली पुरस्कृत विज्ञान संमेलन म्हैसाळ व मिरज येथे २१ व २२ जानेवारी १९८४ रोजी मराठी विज्ञान प्रबोधिनीने भरविले होते.त्यावेळी काढलेल्या स्मरणिकेतील लेख - डॉ. सु. वि. रानडे
तंत्र विज्ञानाची प्रगती भौमितिक श्रेणीने वाढत असून नित्य नवे शोध लागत आहेत. उत्पादनाची नवी साधने व सुखसोयी निर्माण होत असतानाच लोकसंख्या वाढ, शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण या समस्याही वाढीस लागल्या आहेत. प्रगतीचा वेग कायम ठेवून या समस्यांतून मार्ग काढावयाचा असेल तर सुयोग्य अशा विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने विज्ञानातील नव्या पद्धती व तंत्रज्ञानातील संशोधन होण्याची कधी नव्हती एवढी निकड निर्माण झाली आहे.

नेमक्या याच वेळी आपल्या भारतात मात्र बहुसंख्य समाज गरीबी अंधश्रद्धा यांच्या चक्रव्यूहात सापडला आहे आणि कर्ता व जाणता समाज निराशा, अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यांनी ग्रासला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार हा यावर एकमेव उपाय आहे. मानव प्रगती व कल्यान यासाठी विज्ञानच उपयोगी पडणार आहे. असा आत्मविश्वास निर्मान करण्यासाथी विज्ञान प्रसाराची गरज आहे.

महाराष्ट्रात गेली कित्येक वर्षे मराठी विज्ञान परिषद, मराठी विज्ञान महासंघ, लोकविज्ञान संघटना, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यासारख्या संस्था विज्ञानप्रसाराचे कार्य करीत आहेत. सांगली परिसरात मात्र ही चळवळ रुजायला बराच काळ लागला.

सन १९६८ ते ७१ च्या दरम्यान मराठी विज्ञान परिषदेची एक शाखा म्हणून सांगलीत संस्था चालविण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केला पण संघटनात्मक उणीवांमुळे तॊ प्रयत्न अल्पायुषी ठरला असे आता वाटते. य. द. लिमये, श्री. शंकरराव सोमण, सु. वि. रानडे, प्रा ओक, प्रा. फाटक, श्री. वि. ह. केळकर, डॉ. ल. ना. साठे यांनी या संस्थेच्या उभारणीत पुढाकार घेतला होता. मराठी विज्ञान परिषदेने शाखा विसर्जित करून स्वतंत्र संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि सांगलीची शाखा बंद पडली. मात्र अनौपचारिकरीत्या विज्ञानप्रेमी मंडळींच्या परस्पर चर्चा व सहकार्य वाढतच राहिले.

त्यानंतर एकदम १९८० मध्ये ’मराठी विज्ञान परिषद , सांगली विभाग ’ या नावाने संस्थेची पुनर्स्थापना करण्यात आली. मराठी विज्ञान महासंघाचे त्यावेळचे कार्यवाह श्री. आ. मा. लेले यांनी सर्व संबंधितांना एकत्र आणून संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. जामखेड आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळे यांचे हस्ते २७ जुलै ८० रोजी संस्थेचे उद‌घाटन करण्यात आले. मराठी विज्ञान परिषदेचे नाव ठेवून खर्‍या अर्थाने स्वायत्त संस्था म्हणून कार्य करणे अडचणीचे होईल हे लक्षात आल्यावर संस्थेने ’ मराठी विज्ञान प्रबोधिनी’ हे नाव धारण केले व पुढे या नावानेच संस्थेची विशवस्त निधी कायद्यान्वये नोंदणी करण्यात आली.

विज्ञान प्रसार करणार्‍या अशा इतर संस्थाम्च्या कार्यात सहभागी होण्यासाठी ’ मराठी विज्ञान महासंघ’ या फौंडेशन पद्धतीच्या मध्यवर्ती संस्थेशी मराठी विज्ञान प्रबोधिनी संलग्न झाली. अर्थात यामध्ये घटना व कार्याबद्दल कोणतेही बंधन संस्थेवर पदले नाही व इतर जुन्या मोठ्या संस्थाम्च्या बरोबरीने विज्ञान प्रबोधिनीचे कार्य सुरू झाले.

याठिकाणी हे स्पष्ट करणे जरूर आहे की सोयीची व प्रभावी जनसंपर्क भाषा म्हणूनच मराठी भाषेचा समावेश संस्थेच्या नावात केला आहे. हेतु हा की त्यामुळे सर्वसामान्य जनतेस या संस्थेबद्दल आपुलकी व जवळीक वाटावी. यात कोणत्याही प्रकारचा भाषेबद्दल दुराग्रह नाही. शहरी भागात सुशिक्षित वर्गात व कॉलेज विद्यार्थ्यात इंग्रजी भाषेतून विज्ञानप्रसार करणे अधिक सोयीचे ठरू शकेल याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. त्यादृष्टीने इंग्रजीतून कार्य करणारी एक वेगळी शाखा काढण्याचाही संस्थेचा मनोदय आहे. परंतु समाजाच्या ज्या भागापर्यंत विज्ञान पोचणे जरूर आहे त्या ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांची मातृभाषा हीच योग्य संपर्क भाषा ठरू शकेल. ज्या लहान मुलांमधून उद्याचे मोठे तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ निर्माण होणार त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी येथे मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. विज्ञान जाणणारे व विज्ञानाची गरज अस्णारे यांचा समन्वय साधणे हा यात उद्देश आहे.

म्हणूनच संस्थेने शिक्षक, प्राध्यापक, इंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि उद्योजक अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना या कार्यासाठी एकत्र आणण्याचा संकल्प सोडला. ज्या विज्ञानाच्या साहाय्याने व ज्या समाजाच्या पाठिंब्यावर त्यांनी जीवनात मानाचे स्थान मिळवले त्या विज्ञानासाठी व त्या समाजासाठी त्यांनी काही अंशी तरी तन, मन, धन खर्च करावे अशी अपेक्षा संस्थेने त्यांचेपुढे व्यक्त केली. त्यास प्रतिसादही चांगला मिळाला व अजून मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५० विज्ञानप्रेमी व तज्ज्ञ व्यक्तींनी संस्थेचे आजीव सदस्यत्व स्वीकारले असून नगर परिषद, जिल्हा परिषद व इतर संस्थांचेही वाधत्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे.
नोव्हेंबर १९८१ मध्ये मराठी विज्ञान प्रबोधिनीने मराठी विज्ञान महासंघाचे ’अ. भा. मराठी विज्ञान संमेलन’ आयोजित करण्यात पुढाकार घेतला व संमेलन यशस्वी करून दाखविले. पुण्यामुंबईकडच्या नामवंत शास्त्रज्ञ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या विचारांचा लाभ सांगलीकरांना झाला आनि संस्थेस नवे बळ लाभले.

मुलांच्या मनांत जिज्ञासा जागृत करून त्यांच्या कृतीशीलतेला वाव देणे व त्यातून विज्ञान संशोधनाची प्रेरणा देणे हे शहरी भागातल्या विज्ञान प्रसाराचे मुख्य सूत्र होते. याच भूमिकेतून ’खेळणी आणि विज्ञान’ या आकर्षक कार्यक्रमाद्वारे संस्थेच्या प्रा. देशिंगकर, प्रा. भालबा केळकर आणि श्री. लिमये यांनी मुलांना हसत खेळत विज्ञान शिकविले. तसेच त्यांच्याकडून विज्ञानावर आधारित खेळणी करवून घेतली. प्रा. व. बं. काळे यांनी व्याख्याने, लेख आनि आकाशवाणीवर भाषणे याद्वारे जनसामान्यांपर्यंत विज्ञान नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.पर्णसंग्रह स्पर्धेद्वारे संस्थेने विद्यार्थ्यांत निसर्ग निरीक्षणाची आवड उत्पन्न करून संग्रह प्रवृत्तीस वेगळे वळण लावले.

दरवर्षी घेण्यात येणारे विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्वस्पर्धा व कोणतीतरी अभिनव योजना वा स्पर्धा हे संस्थेचे वैशिष्ठ्य बनले आहे. गतवर्षी भरविण्यात आलेल्या ’ सांग्ली एक्स्पो -८३’ प्रदर्शनास सहभाग व प्रेक्षक या दोहोंचा फार चांगला प्रतिसाद मिळाला.

निरनिराळ्या शाळांत व संस्थांत विज्ञान विषयक व्याख्याने, शास्त्रीय चित्रपट प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम सुरू झाले तरी प्रबोधिनीच्या कार्याला मोठी गती मिळाली ती मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागामुळे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्थेबद्दल आपुलकी वाटु लागली आहे. हे त्यांच्या वाढत्या उपस्थितीवरून आणि उत्साहाने कोणतेही काम करण्याच्या तयारीवरुन जसजसे जाणवू लागले तसतसे कार्यक्रमातही बदल व नव्या भावी योजना आखण्याची संस्थेस गरज भासू लागली. विज्ञान छंदगृह, समृद्ध वाचनालय, दृक्‌श्राव्य साधनांनी युक्त फिरती प्रयोगशाळा इत्यादी नव्या योजना आखण्यात आल्या असून त्यासाठी साधनसुविधांची जुळवाजुळव चालू आहे.
ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण आणि आधुनिक विज्ञानाने विकसित केलेल्या पद्धती व साधनांची माहिती करून देणे हे संस्थेने आपले कार्य मानले आहे. त्यासाठी जामखेड, राळेगणशिंदी, पाबळ यासारख्या आदर्श ग्रामप्रकल्पांचा प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात आला व त्याआधारे सांगली परिसरासाठी संस्थेने ग्रामीण आरोग्य सेवा योजनेची आखणी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडक गावी आरोग्य शिक्षण शिबिरे घेणे, प्रदर्शने भरविणे आणि विशिष्ट वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देणे यांचा समावेश केला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार शाह यांनी याबाबतीत स्पृहणीय कार्य केले आहे. जवळपासच्या ग्रामिण भागात प्रबोधिनीतर्फे अनेक दंत आरोग्य शिबिरे घेऊन त्यांनी हजारो मुलांच्या दातांची तपासणी केली. असे कार्य इतरही वैद्यकीय शाखांत करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य आणि वाहन इत्यादी सुविधांची आवश्यकता भासणार आहे.

गावागावात अशी विज्ञानप्रसार मंडळे व्हावीत. शाळांतील विज्ञान मंडळे त्यांच्याशी संलग्न करून अशा विविध केंद्रांचे सुसूत्र व सुसंवादी जाळे विणावे अशी मराठी विज्ञान प्रबोधिनीची मनीषा आहे. ग्राम पंचायती, जिल्हा परिषद आणि आकाशवाणी याबाबतीत फार मोलाचे कार्य करू शकतील.
गतवर्षी मराठी विज्ञान प्रबोधिनीने आकाशवाणीवरुन ’प्रदूषण’ विषयक पाच भाषणांची एक व्याख्यानमाला सादर केली. हे सहकार्य आता विज्ञान संमेलन घेण्य़ाइतके वाढले आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे.

जाती धर्म, भिन्न- भिन्न राजकीय व सामाजिक विचारप्रणाली अशा वेगवेगळ्या गटांत आजचा समाज विस्कळीत झाला आहे. अशावेळी केवळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे मानव कल्याणासाठी विज्ञानाचा वापर व्हावा म्हणून कार्य करण्यासाठी मराठी विज्ञान प्रबोधिनी उभी ठाकली आहे. या विधायक कार्यास सर्वांकडून सहकार्य व सहभागाची संस्था अपेक्षा करीत आहे.