मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य कविता शिवराज्याभिषेक गीत
शिवराज्याभिषेक गीत पीडीएफ प्रिंट ई-मेल
त्रिवार जयजयकार, शिवबा, त्रिवार जयजयकार ।
जयजयकार, जयजयकार, शिवबा, त्रिवार जयजयकार ।
हिंदू स्वराज्या स्थापून केले, कार्य जगी तू महान ॥१॥

शिवनेरीच्या किल्ल्यामधुनी, वीज कडाडे प्रखर होउनी।
जिजामाईच्या पोटी येउनी, धर्म रक्षण्या सज्ज होउनी ।
घेई तू अवतार,शिवबा, त्रिवार जयजयकार ॥ २॥

जिजामाईच्या बाळकडूने, आईभवानी आशिर्वचने ।
मित्र मावळे सहकार्याने, रोहिडेश्वरा वंदन करिशी ।
हिंदू राज्य ललकार,शिवबा, त्रिवार जयजयकार ॥ ३॥

अफझुल्लाचे पोट फाडुनी, शाहिस्त्याची बोटे चाटुनी ।
सिद्दी जोहरा गुंग करोनी, पावनखिंडीत पावन झाले ।
बाजीप्रभूंचे प्राण, शिवबा, त्रिवार जयजयकार ॥४॥

आग्र्यामधली कैद सोसुनी,चातुर्याची चुणुक दाखवुनी ।
पेटारेभर मिठाई वाटुनी, कैदे मधुनी सुटला राजा ।
दक्षिण देशी प्रयाण, शिवबा, त्रिवार जयजयकार ॥५॥

कोंडाण्यावर निशाण हिरवे, सहन न झाले जिजामाईते।
तानाजींच्या बलिदानाने, गड आला पण सिंहच गेला ।
गहिवरले शिवराय, शिवबा, त्रिवार जयजयकार ॥६॥

ज्येष्ट शुध्द त्या त्रयोदशीला,वंदुनी आपुल्या मातॄदेवीला ।
संथ पावले पुढे चालला, सिंहासनी त्या विराज होण्या ।
छत्रपतींचा मान, शिवबा, त्रिवार जयजयकार ॥७॥

ब्राह्मण पंडित खड्या सुरातुनी, वेदमंत्र ते गाती मिळुनी ।
छत्रपतींच्या मुकुटावरती, सुवर्णमुद्रा माता भगिनी ।
करिती हो वर्षाव, शिवबा, त्रिवार जयजयकार ॥७॥
---प्रा. एच. यु. कुलकर्णी
निवेदन व गीत ऎका